![]()
जर तुम्हाला व्यायाम करणे कंटाळवाणे वाटत असेल आणि त्याऐवजी एखादा खेळ निवडणे अधिक उत्तम पर्याय वाटत असेल, तर तुमचा विचार चुकीचा नाही, पण प्रश्न असा पडतो की, कोणता खेळ? युकेचे प्रसिद्ध स्पोर्ट्््स मसाज थेरपिस्ट जेम्स रोश यांच्या मते, तो असा खेळ असावा जो फिटनेसच्या सर्व निकषांवर खरा उतरेल. त्यांच्या मते, खेळ असा असावा ज्यातून हृदय, फुप्फुसे, पायांचे स्नायू आणि शरीराच्या वरच्या भागावर काम होईल. तसेच त्यातून शरीराचा समतोल, चपळता आणि वेग यामध्येही सुधारणा व्हायला हवी. जर तुमचा अंदाज क्रिकेट, फुटबॉल किंवा बास्केटबॉल असा असेल, तर तो थोडा चुकीचा ठरू शकतो. जेम्स यांच्या मते, तो खेळ म्हणजे टेनिस. ‘ब्रिटिश जर्नल ऑफ स्पोर्ट मेडिसिन’च्या संशोधकांनुसार, ज्या लोकांनी एखादा खेळ जोपासला, त्यांची वयाच्या 60 किंवा त्यापुढील काळात एरोबिक फिटनेस अधिक चांगली राहिली, शारीरिक कार्यक्षमतेत सुधारणा झाली आणि मानसिक आरोग्य बळकट झाले. टेनिसमुळे ‘ग्रिप स्ट्रेंथ’सारखी एकूण ताकद वाढते, जे दीर्घायुष्याचे एक प्रमुख लक्षण आहे, कारण याला एकूण स्नायूंच्या आरोग्याचा निकष मानले जाते. त्यांचे असे मत आहे की, टेनिससारखा खेळ नियमित खेळल्यास व्यक्तीच्या आयुष्यात दहा निरोगी वर्षांची भर पडू शकते. त्यांचे संशोधन सांगते की, या सर्व शारीरिक फायद्यांचा अर्थ असा आहे की, टेनिसपटू सामान्य व्यक्तीच्या तुलनेत अधिक काळ फिट राहतात. अर्थात, हा अभ्यास निष्क्रिय लोकांशी तुलना करतो, दुसऱ्या खेळांशी नाही. ‘मायो क्लिनिक प्रोसिडिंग्ज’मध्ये प्रसिद्ध झालेल्या आणि 25 वर्षे चाललेल्या डेन्मार्कमधील एका अभ्यासानुसार, टेनिसपटू हे निष्क्रिय लोकांच्या तुलनेत सरासरी 9.7 वर्षे अधिक जगले. सायकलिंग (3.7 वर्षे), जॉगिंग (3.2 वर्षे) आणि जिमिंग (1.5 वर्षे) यांच्या तुलनेत आयुर्मानात होणारी ही वाढ अधिक आहे. 80 हजार लोकांवर केलेल्या एका वेगळ्या ब्रिटिश संशोधनात असे दिसून आले की, रॅकेट स्पोर्ट््स खेळणाऱ्या लोकांमध्ये हृदयविकारांमुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाले. सायकलपटू, धावपटू आणि फुटबॉलपटूंमध्ये असे दिसून आले नाही. याचे काही इतर फायदे खालीलप्रमाणे आहेत: बौद्धिक क्षमतेत मदत: कोणताही खेळ खेळणे मेंदूच्या ‘प्रीफ्रंटल कॉर्टेक्स’ला आव्हान देते. हा भाग लक्ष केंद्रित करणे आणि समस्या सोडवण्याचे काम नियंत्रित करतो. मात्र, इतर खेळांच्या तुलनेत टेनिसमध्ये शॉट्सचा वेग जास्त असल्याने खेळाडूला त्वरित प्रतिसाद द्यावा लागतो. यामुळे स्मृतिभ्रंशाची (डिमेंशिया) सुरुवात मंदावते. हाडे मजबूत होतात: उड्या मारणे, झटके बसणे आणि शारीरिक हालचालींमुळे हाडे मजबूत होतात. टेनिसमध्ये या हालचाली भरपूर प्रमाणात असतात. हाडांच्या मजबुतीसाठी असा व्यायाम आदर्श असतो, ज्यामध्ये दिशा बदलणे, थोडा प्रतिकार आणि उड्या मारण्याचा समावेश असतो. चिंता कमी होते: रॅकेटवर चेंडू आदळल्याचा आवाजच मेंदूवर ध्यानासारखा परिणाम करतो. ‘चायना वेस्ट नॉर्मल युनिव्हर्सिटी’च्या संशोधकांना असे आढळले की, ज्या लोकांना चार आठवड्यांपर्यंत टेनिस रॅलीचा लयबद्ध आवाज ऐकण्यास सांगितले, त्यांच्या चिंता पातळीत (अँक्झायटी स्कोर) लक्षणीय घट झाली. गुडघे आणि कंबरेच्या खालच्या भागावरील ताण कमी होतो आणि मनगट मजबूत होते: कंबरेच्या खालच्या भागाला आधार देणाऱ्या स्नायूंना मजबूत करण्यासाठी दर आठवड्याला खास व्यायाम करणे महत्त्वाचे असते. टेनिस खेळताना हात-पाय वर-खाली करण्याच्या हालचाली ‘प्लँक’ व्यायामासारखीच मदत करतात. मनगटासोबतच, कंबरेच्या खालच्या भागासाठी हा एक उत्तम व्यायाम आहे. फंडा असा आहे की, जर तुम्ही रोजच्या व्यायामामुळे कंटाळला असाल, तर कोणताही खेळ त्याचा एक चांगला पर्याय ठरू शकतो. आणि टेनिससारखा खेळ तर नक्कीच दीर्घायुष्य देतो. मग सुरुवातीसाठी आठवड्यातून किमान एकदा हा खेळ खेळून पाहायला काय हरकत आहे?
Source link
एन. रघुरामन यांचा कॉलम:दैनंदिन व्यायामाला पर्याय म्हणून कोणता खेळ निवडाल?
