डिजिटल बँकिंगच्या जमान्यात अनेकांचा असा गैरसमज असतो की, जोपर्यंत आपण OTP सांगत नाही तोपर्यंत आपले पैसे सुरक्षित आहेत. मात्र, सायबर गुन्हेगारांनी आता सिम स्वॅपिंग आणि मालवेअरसारख्या अशा 5 अपग्रेड पद्धती शोधल्या आहेत, ज्यामध्ये कोणत्याही पासवर्डशिवाय थेट तुमचे बँक खाते रिकामे केले जाऊ शकते. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया.

आजच्या डिजिटल युगात ऑनलाईन बँकिंग आणि UPI मुळे पैशांचे व्यवहार अत्यंत सोपे झाले आहेत. मात्र, या सोयीसोबतच सायबर गुन्हेगारीचा धोकाही प्रचंड वाढला आहे. अनेक लोकांचा असा गैरसमज असतो की, जोपर्यंत आपण कोणाला आपला वन-टाइम पासवर्ड म्हणजेच OTP सांगत नाही, तोपर्यंत आपले बँक खाते सुरक्षित आहे.
मात्र, सायबर भामट्यांनी आता अशा काही प्रगत तंत्रज्ञानाचा शोध लावला आहे, ज्यामध्ये कोणताही OTP न मागता थेट तुमचे बँक खाते रिकामे केले जाऊ शकते. केंद्रीय गृह मंत्रालयांतर्गत येणाऱ्या ‘राष्ट्रीय सायबर गुन्हे पोर्टल’ आणि बँकिंग सुरक्षा तज्ज्ञांनी युजर्सना सुरक्षित राहण्यासाठी 5 प्रमुख गोष्टींपासून तातडीने सावध राहण्याचा इशारा दिला आहे.
1.सिम स्वॅपिंगचा धोका
हा सध्याचा सर्वात धोकादायक सायबर फ्रॉड आहे. यामध्ये हॅकर्स तुमच्या नावाचे बनावट ओळखपत्र तयार करून मोबाईल कंपनीकडून तुमच्याच नंबरचे दुसरे सिम कार्ड जारी करून घेतात. नवीन सिम कार्ड सुरू होताच तुमच्या मोबाईलमधील नेटवर्क गायब होते आणि बँक खात्याशी संबंधित सर्व OTP आणि मेसेज थेट हॅकर्सच्या नवीन सिमवर जाऊ लागतात. तुम्हाला काही समजण्यापूर्वीच खाते रिकामे होते. त्यामुळे मोबाईलचे नेटवर्क अचानक दीर्घकाळ गायब झाल्यास त्वरित कंपनीशी संपर्क साधा.
2. मालवेअर आणि स्क्रीन शेअरिंग ॲप्स
हॅकर्स अनेकदा लॉटरी, मोफत रिचार्ज किंवा बंपर डिस्काउंटच्या आमिषाने तुम्हाला संशयास्पद लिंक्स पाठवतात. तुम्ही त्या लिंकवर क्लिक करताच मोबाईलमध्ये ‘मालवेअर’ नावाचा धोकादायक व्हायरस किंवा ‘AnyDesk’ आणि ‘TeamViewer’ सारखे स्क्रीन शेअरिंग ॲप्स गुपचूप डाऊनलोड होतात. याद्वारे हॅकर्सला तुमच्या मोबाईल स्क्रीनचा संपूर्ण ॲक्सेस मिळतो. ते तुमच्या नकळत मोबाईलमधील बँक डिटेल्स पाहू शकतात आणि स्क्रीनवरूनच ओटीपी चोरून व्यवहार पूर्ण करतात.
3. AI व्हॉईस क्लोनिंग
आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जमान्यात हॅकर्सने फसवणुकीचा एक नवा मार्ग शोधला आहे. तुमच्या एखाद्या जवळच्या मित्राचा किंवा नातेवाईकाचा आवाज हुबेहूब तयार करून हॅकर्स तुम्हाला फोन करतात आणि “मी मोठ्या संकटात अडकलो आहे, तातडीने पैसे पाठव,” अशी विनवणी करतात. अनेकदा आपण आवाजावर विश्वास ठेवून कोणताही विचार न करता किंवा ओटीपीची वाट न पाहता स्वतःहून पैसे ट्रान्सफर करतो. असा कोणताही संशयास्पद फोन आल्यास आधी त्या नातेवाईकाला दुसऱ्या नंबरवर फोन करून खात्री करा.
4. पब्लिक Wi-Fi
रेल्वे स्टेशन, बस स्टँड, कॅफे किंवा हॉटेलमधील मोफत मिळणारे पब्लिक Wi-Fi वापरून कधीही गुगल पे, फोन पे किंवा नेट बँकिंगचे व्यवहार करू नका. हे ओपन नेटवर्क्स सुरक्षित नसतात. हॅकर्स या नेटवर्कवर पाळत ठेवून असतात आणि तुम्ही पासवर्ड किंवा बँक डिटेल्स टाईप करताच ते ‘मॅन-इन-द-मिडल’ (MITM) हल्ल्याद्वारे तुमचा संपूर्ण डेटा सहज चोरू शकतात. ऑनलाईन आर्थिक व्यवहारांसाठी नेहमी स्वतःचा सुरक्षित मोबाईल डेटाच वापरा.
5. UPI Auto-Debit नियम
अनेकदा आपण विविध ॲप्सचे सबस्क्रिप्शन घेताना किंवा ऑनलाईन खरेदी करताना नकळतपणे ‘ऑटो-डेबिट’ (Auto-Debit) किंवा ‘मँडेट’ (Mandate) सुविधेला मंजुरी देतो. यामध्ये ठराविक कालावधीनंतर तुमच्या खात्यातून पैसे आपोआप कट होतात आणि त्यासाठी कोणत्याही ओटीपीची आवश्यकता भासत नाही. जर तुम्ही एखाद्या अनधिकृत किंवा फसव्या ॲपला चुकून असा ॲक्सेस दिला असेल, तर ते तुमच्या खात्यातून वारंवार पैसे चोरू शकतात. तुमच्या युपीआय ॲपमधील ‘Autopay’ सेक्शनमध्ये जाऊन असे अनधिकृत ॲक्सेस त्वरित ब्लॉक करा.

