सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पेरू पाण्यात टाकल्यानंतर किड्यासारखे जीव बाहेर येताना दिसत आहेत. हा व्हिडिओ पाहून पेरू खाण्यापूर्वी तो स्वच्छ कसा करावा, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

पेरू फक्त पाण्यात बुडवून ठेवणे पुरेसे आहे का?
पेरू स्वच्छ करण्यासाठी केवळ एका भांड्यात पाणी घेऊन त्यात फळ बुडवून ठेवण्यापेक्षा वाहत्या स्वच्छ पाण्याखाली ते धुणे अधिक योग्य आहे. FSSAIच्या मार्गदर्शक सूचनेनुसार, स्वच्छ वाहत्या पाण्याने फळे आणि भाज्या धुतल्याने त्यांच्या पृष्ठभागावरील कीटकनाशक कमी होण्यास मदत होते. FSSAIच्या मार्गदर्शक माहितीनुसार, पाण्याने धुतल्यावर पृष्ठभागावरील सुमारे 75 ते 80 टक्के pesticide residues कमी होऊ शकतात. मात्र हा आकडा प्रत्येक फळ आणि प्रत्येक कीटकनाशकासाठी सारखा असेलच असे नाही.
भारतीय संशोधनात पेरू धुतल्यावर काय आढळले?
पेरू धुण्याचा कीटकनाशक वर नेमका काय परिणाम होतो, यासाठी भारतातील Indian Journal of Horticulture मध्ये प्रकाशित झालेला अभ्यास महत्त्वाचा आहे.या अभ्यासात dimethoate, lambda-cyhalothrin आणि malathion या तीन कीटकनाशकांच्या पेरूवरील अवशेषांचा अभ्यास करण्यात आला. संशोधकांनी पेरूच्या नमुन्यांमधील residues तपासल्यानंतर धुण्यामुळे त्यात लक्षणीय घट झाल्याचे आढळले.
पेरू स्वच्छ करण्याची योग्य पद्धत
२-३ वेळा धुण्याचा सल्ला का दिला जातो?
पेरू आणि इतर फळांवरील कीटकनाशक कमी करण्यासाठी भारताच्या National Institute of Plant Health Management (NIPHM) कडून उपलब्ध मार्गदर्शनात धुण्याच्या प्रक्रियेचा उल्लेख आहे. पेरूसारख्या फळांसाठी स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, 2-3 वेळा धुतल्याने पेरूवरील सर्व pesticide residues किंवा किडे पूर्णपणे निघून जातील, असा अर्थ या मार्गदर्शनातून काढू नये. धुण्याचा उद्देश पृष्ठभागावरील दूषित घटक आणि काही कीटकनाशक कमी करणे हा आहे.
मीठाच्या पाण्यात पेरू भिजवावा का?
फळे आणि भाज्यांवरील काही खतं कमी करण्यासाठी मीठाच्या पाण्याचा वापर केला जातो. मात्र घरच्या घरी पेरू बराच वेळ मीठाच्या पाण्यात भिजवून ठेवणे ही प्रत्येक प्रकारच्या pesticide किंवा कीटकांसाठी हमखास उपाययोजना आहे, असे वैज्ञानिकदृष्ट्या म्हणता येणार नाही. त्यामुळे सोशल मीडियावर दिसणाऱ्या प्रत्येक घरगुती उपायाची तंतोतंत नक्कल करण्यापेक्षा स्वच्छ वाहत्या पाण्याने पेरू व्यवस्थित धुणे हा सोपा आणि सुरक्षित पर्याय आहे.
पेरूमध्ये किड आहे हे कसं ओळखाल
पेरू खरेदी करतानाच त्याची नीट तपासणी करा. फळावर छिद्र दिसत असल्यास, काही भाग असामान्यपणे मऊ असल्यास किंवा कुजल्यासारखा वास येत असल्यास असे फळ घेणे टाळा.पेरू घरी आणल्यानंतरही तो कापण्यापूर्वी तपासा. कापल्यानंतर आतून अळी, कुजलेला भाग किंवा असामान्य बदल दिसल्यास तो भाग खाऊ नका.

