नाशिक शहरातील रस्त्यांवरील खड्डे, महापालिकेतील कथित गैरव्यवहार आणि आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असताना भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला
.
नाशिकचे खड्डे बुजवण्याची जबाबदारी फडणवीस-महाजनांची
नवनाथ बन म्हणाले की, नाशिकमधील खड्डे बुजवण्यासाठी नाशिक महापालिका आणि जिल्हा प्रशासन सक्षम असून हे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकच्या विकासाची जबाबदारी घेतली आहे, असा दावा त्यांनी केला. त्याचवेळी राऊत यांच्यावर टीका करताना बन यांनी, “नाशिकमध्ये जाऊन नौटंकी करण्यापेक्षा आधी आपल्या पक्षाची अवस्था पाहा. ठाकरे गटात मोठा खड्डा पडला आहे. अख्खा पक्ष खड्ड्यात गेला आहे. आधी तो पक्ष वाचवण्याचा प्रयत्न करा आणि मग इतरांवर टीका करा,” असा टोला लगावला.
मुंबईतील 25 वर्षांच्या कारभाराचा हिशोब द्या
नाशिकमधील कथित शौचालय घोटाळ्याच्या आरोपांवरूनही भाजपने शिवसेना ठाकरे गटाला घेरले. “टॉयलेटमध्ये पैसे खाल्ले की नाही, हे शोधण्यापेक्षा मुंबईतील गटारांमध्ये किती पैसे खाल्ले याचा हिशोब द्या,” अशा शब्दांत बन यांनी राऊतांवर निशाणा साधला. मुंबईतील नालेसफाई, मिठी नदीतील गाळ काढण्याचे काम आणि इतर महापालिका कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र, नाशिकमधील कथित घोटाळ्याबाबत ठाकरे गटाकडे पुरावे किंवा कागदपत्रे नसल्याचा दावा बन यांनी केला. “मुंबई महापालिकेतील कथित कमिशनखोरीचे पुरावे आहेत, काही लोकांना अटकही झाली आहे,” असा दावा करत त्यांनी ठाकरे गटाला मुंबईतील २५ वर्षांच्या कारभाराचा हिशोब देण्याचे आव्हान दिले.

‘जामनेर पॅटर्न’वरूनही राऊतांना प्रत्युत्तर
नाशिकमधील विकासकामांच्या निविदांवरून संजय राऊत यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांनाही नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिले. राऊतांकडून ‘जामनेर पॅटर्न’चा उल्लेख केला जात असेल, तर आधी ‘मातोश्री पॅटर्न’ काय होता, हे महाराष्ट्राला सांगा, असे आव्हान त्यांनी दिले. बन यांनी ठाकरे गटावर 25 टक्के कमिशनखोरीचे गंभीर आरोप केले. “कमिशनखोरी आणि खंडणी वसूल करणे ही तुमची परंपरा आहे,” असा आरोप करत बन यांनी या मुद्द्यावरून ठाकरे गटाला बचावाच्या पवित्र्यात आणण्याचा प्रयत्न केला.
कुंभमेळ्यावरूनही भाजपचा ठाकरे गटावर निशाणा
नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरही नवनाथ बन यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली. कुंभमेळ्यात देशभरातून साधू-संत आणि लाखो भाविक नाशिकमध्ये येणार असून या धार्मिक आयोजनाला बदनाम करण्याचे षडयंत्र सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. कुंभमेळ्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर भाविक एकत्र येणार असल्याने हिंदू समाज एकत्र येण्याची भीती विरोधकांना वाटत असल्याचा दावा बन यांनी केला. “हिंदू सारा एक हा मंत्र कुंभमेळ्यातून जाईल,” असे ते म्हणाले. या वक्तव्यामुळे नाशिकच्या स्थानिक प्रश्नाला आता धार्मिक आणि राजकीय रंग देण्याचा प्रयत्न होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे आगामी काळात कुंभमेळ्याच्या तयारीबरोबरच त्यावरून होणारे राजकीय आरोप-प्रत्यारोपही वाढण्याची शक्यता आहे.
‘मुख्यमंत्री कुणाच्या खिशात?’ या प्रश्नावरून पलटवार
संजय राऊत यांनी सरकारच्या निर्णयांवर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारभारावर केलेल्या टीकेलाही बन यांनी प्रत्युत्तर दिले. मुख्यमंत्री कोणाच्या खिशात आहेत, असा सवाल करण्यापेक्षा संजय राऊत स्वतः कोणाच्या खिशात आहेत, हे त्यांनी सांगावे, असे बन म्हणाले. राऊत हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या प्रभावाखाली असल्याचा आरोप करत बन यांनी त्यांच्या राजकीय भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सत्ता गेल्यामुळे ठाकरे गटाचा जळफळाट होत असल्याचा दावाही त्यांनी केला.
नाशिकच्या खड्ड्यांवरून सुरू झालेला वाद आता मुंबईपर्यंत
या संपूर्ण वादाचा केंद्रबिंदू नाशिकमधील रस्त्यांची दुरवस्था आहे. पावसाळ्यात शहरातील अनेक रस्त्यांवर खड्डे पडल्याने नागरिकांना त्रास होत आहे. विरोधकांकडून याच मुद्द्यावरून सरकार आणि महापालिकेला लक्ष्य केले जात आहे. भाजप मात्र रस्त्यांची कामे सुरू असून परिस्थिती सुधारत असल्याचा दावा करत आहे. त्यामुळे ‘नाशिकचे खड्डे’ हा स्थानिक नागरी प्रश्न आता थेट भाजप विरुद्ध ठाकरे गटाच्या राजकीय संघर्षाचा मुद्दा बनला आहे. एकीकडे रस्ते, नाले आणि महापालिकेतील कथित गैरव्यवहारावरून विरोधक सरकारला घेरत आहेत; तर दुसरीकडे भाजप जुन्या मुंबई महापालिका कारभाराचा मुद्दा उपस्थित करून ठाकरे गटाला प्रत्युत्तर देत आहे. आगामी कुंभमेळा, नाशिक महापालिकेच्या निवडणुकीची तयारी आणि शहरातील विकासकामे या पार्श्वभूमीवर नाशिकचा राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे रस्त्यांवरील खड्ड्यांपासून सुरू झालेला हा वाद आता महापालिका कारभार, कथित भ्रष्टाचार, कुंभमेळा आणि हिंदुत्वाच्या राजकारणापर्यंत पोहोचला आहे.
हेही वाचा…
नाशिकमधील खड्ड्यांवरून शिवसेना ठाकरे गट आक्रमक: मनमानी केल्यास महापालिकेचे गेट तोडून घुसू, संजय राऊतांचा प्रशासनाला इशारा

नाशिक शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या प्रश्नावरून आक्रमक झालेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली नाशिक महानगरपालिकेवर ‘जनआक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी नाशिकमधील ठाकरे गटाच्या शिवसेना कार्यालयाबाहेर शिवसैनिकांसह सामान्य नागरिकांनीही मोठ्या संख्येने गर्दी केली असून, जनतेचा रोष व्यक्त करणारा हा मोर्चा आता थेट महानगरपालिकेवर धडकला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
भाजपचे 80 नगरसेवक टाकता येतील एवढे मोठे खड्डे!: नाशिकच्या दुर्दशेवरून संजय राऊतांचे सरकारला सवाल- नाशिक हे चंद्रावरचे शहर आहे का?

नाशिक शहरातील रस्त्यांची दुर्दशा आणि खड्ड्यांमध्ये पडून झालेल्या मृत्यूंच्या सत्रावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी राज्य सरकार, स्थानिक प्रशासन आणि कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर सडकून टीका केली आहे. “नाशिक शहरात प्रशासनाने लोकांना रस्त्यावरच ‘स्विमिंग पूल’ निर्माण करून दिले आहेत. मी असे काही खड्डे पाहिलेत, ज्यात भाजपचे 80 नगरसेवक आणि शिंदे गटाचे आमदार एकत्र टाकता येतील,” असा शेलक्या शब्दांतील टोला राऊत यांनी लगावला. नाशिक दौऱ्यावर असताना संजय राऊत यांनी मखमलाबादसह इतर भागांतील रस्त्यांची पाहणी केली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी खड्ड्यांच्या प्रश्नावरून आणि कुंभमेळ्यातील कथित भ्रष्टाचारावरून सरकारवर हल्लाबोल केला. येथे वाचा संपूर्ण बातमी
