Beed News: परळी वैजनाथ येथे होणाऱ्या पशुवैद्यकीय व पशुविज्ञान महाविद्यालयाचा भूमिपूजन सोहळा पार पडला. ६३४ कोटी रुपयांच्या खर्चाने बांधण्यात येणाऱ्या या महाविद्यालयाच्या भूमिपूजन सोहळ्याला बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे व आजी माजी खासदार उपस्थित होते.

पंकजा मुंडे , धनंजय मुंडे यांची़ उपस्थिती
कार्यक्रमास राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, आमदार नमिता मुंदडा, माजी खासदार डॉ. प्रीतम मुंडे, माजी आमदार संजय दौंड, बदामराव पंडित, नगराध्यक्ष पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील, पशुसंवर्धन विभागाचे सचिव डॉ. एन. रामास्वामी, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जतीन रहेमान, पोलिस अधीक्षक नवनीत कावत, अजय मुंडे आणि अक्षय मुंदडा उपस्थित होते.
मराठवाडा ही कष्टाची खाण आहे.
सुनेत्रा पवार म्हणाल्या, ‘महाराष्ट्र हा कष्टकऱ्यांचा राज्य असून, मराठवाडा ही कष्टाची खाण आहे. शेतीला मुख्य आधार देणाऱ्या पशुधनाची काळजी घेणे ही काळाची गरज बनली आहे.या क्षेत्रातील उच्च शिक्षणासाठी मराठवाड्यातील युवक-युवतींना हेआंतरराष्ट्रीय दर्जाचे महाविद्यालय उपलब्ध होत आहे.यामुळे अत्याधुनिक शिक्षण आणि सुविधा मिळतील, ज्याचा फायदा लगतच्या जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांनाही होईल.’
६३४ कोटी रुपयांच्या भरीव तरतुदीतून सुसज्ज इमारत उभारली जाणार
त्या पुढे म्हणाल्या, ‘६३४ कोटी रुपयांच्या भरीव तरतुदीतून सुसज्ज इमारत, वसतिगृह, अत्याधुनिक प्रयोगशाळा आणि संशोधन केंद्र उभारले जाणार आहे. परिणामी, परिसरातील ५० ते १०० गावांतील जनावरांवर आधुनिक उपचार परळी येथेच उपलब्ध होतील; तसेच दुग्धोत्पादन वाढ आणि फायदेशीर शेळीपालनावर विशेष संशोधन केले जाईल.’
स्वावलंबी मराठवाडा
या महाविद्यालयाचे बांधकाम अत्यंत दर्जेदार व विहित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले असून, ‘समृद्ध शेतकरी, सुदृढ जनावरे आणि स्वावलंबी मराठवाडा’ घडवण्याचा संकल्प या वेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बोलून दाखवला.
Chhatrapati Sambhajinagar: मराठवाड्यात पावसाने फिरवली पाठ; पावसाअभावी पिके धोक्यात, शेतकरी चिंतेत
पशुवैद्यकीय महाविद्यालयाला दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच नाव देण्याची मागणी
या प्रसंगी आमदार धनंजय मुंडे यांनी मनोगत व्यक्त करताना, ‘बारामती येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाला दिवंगत अजित पवार यांचे; तर परळी येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाला दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे नाव देण्यात यावे,’ अशी मागणी केली.

