Headlines

Lek Ladki Scheme ; सरकारकडून 1.01 लाख रुपये मिळवणे झाले आणखीन सोपे! आता दहा वेळा फॉर्म भरण्याची गरज नाही, समजून घ्या महत्वाचे बदल


महाराष्ट्र शासनाची लेक लाडकी योजना राज्यातील मुलींच्या शिक्षणासाठी फार महत्वाची आहे. मुलींच्या शिक्षणासाठी तसेच सर्वांगीण विकासासाठी टप्प्याटप्प्याने मदत करण्याचे कार्य या योजनेच्या माध्यमातून केले जाते. 1 एप्रिल 2023 पासून ही योजना लागू करण्यात आली. परंतु, ऑगस्ट 2026 मध्ये या योजनेत काही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. हे बदल करण्या मागचा मुख्य हेतु या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आणखीन सोपी करणे आहे. एकंदरीत, करण्यात आलेल्या बदलामुळे योजनेचा लाभ घेणे आता अधिक सोपे होणार आहे.

ही ‘लेक लाडकी योजना’ नक्की आहे तरी काय?

महाराष्ट्र शासनाची ‘लेक लाडकी योजना’ राज्यातील मुलींच्या शिक्षणासाठी केली गेलेली खास तरतूद आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील मुलींना टप्प्याटप्प्याने 1,01,000 रुपयांची मदत केली जाते. एकूण 5 टप्प्यांमध्ये ही मदत देण्यात येते. एकंदरीत, पहिल्या टप्प्यात मुलीच्या जन्मानंतर सरकारकडून मुलीसाठी 5,000 रुपयांची मदत दिली जाते. मुलगी पहिलीच्या वर्गात गेली तर सरकारकडून तिला 6,000 रुपये रोख रक्कम मिळते. सहावीत प्रवेश घेताच मुलीसाठी 7,000 रुपयांची मदत सरकारकडून पुरवण्यात येते. 11वीत प्रवेश मिळताच एकूण 8,000 रुपयांची रक्कम मिळते, तर मुलीचे अठरा वर्षे पूर्ण होताच 75,000 रुपये मुलीच्या खात्यात जमा करण्यात येतात. एकंदरीत, एकूण मुलीच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारकडून पाच टप्प्यांमध्ये 1,01,000 रुपये मदत म्हणून पुरवण्यात येतात.

योजनेत करण्यात आले काही महत्वाचे बदल

घरात मुलगी जन्मली असेल तर राज्यातील जनतेला मुलीच्या विकासासाठी सरकारकडून 1.01,000 रुपयांची रोख रक्कम मदत म्हणून मिळवता येते. परंतु, रक्कम एकदाच मिळत नसून पाच टप्प्यांमध्ये पुरवण्यात येते. योजनेत करण्यात आलेले बदल याच पाच टप्प्यांसंदर्भात आहेत. आधी मदतीची रक्कम मिळवण्यासाठी प्रत्येक टप्प्यावर अर्ज करावे लागत होते. कागदपत्र भरावे लागत होते. पण करण्यात आलेल्या बदलामुळे आता प्रत्येक टप्प्यावर अर्ज करण्याची आणि मोठमोठे फॉर्म भरण्याची गरज भासणार नाहीये. आता अगदी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. नव्या प्रणालीत आधारच्या मदतीने मुलीची तसेच तिच्या कुटुंबाची माहिती घेण्यात येणार आहे. नव्या पद्धतीनुसार, आई-वडिलांना आणि मुलीला ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. या नव्या आणि सोप्या पद्धतीच्या माध्यमातून मदतीची रक्कम थेट बँक खात्यात मिळवता येणार आहे.

एक महत्वाची सूचना!

1 एप्रिल 2023 नंतर जन्माला आलेल्या मुलींसाठी ही योजना असून जर कुणा पालकांनी या तारखेनंतर जन्माला आलेल्या आपल्या मुलीची नोंदणी ‘लेक लाडकी’ योजनेसाठी केली नसेल तर त्यांना 15 ऑगस्ट 2027 पर्यंत मुभा देण्यात आली आहे. जर तुमच्या मुलीचा जन्म 1 एप्रिल 2023 नंतर झाला असेल, तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असाल आणि तुमच्याकडे पिवळा किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात. सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुमचे वार्षिक उत्पन्न 1 लाखांच्या आत असणे बंधनकारक आहे.

या योजनेसाठी अर्ज करताना कुटुंबाकडे मुलीच्या जन्माचा दाखला, आई-वडिलांचा आणि मुलीचा आधार कार्ड, बँकेचा पासबूक, उत्पन्नाचा दाखला, पिवळा किंवा नारंगी रंगाचा रेशन कार्ड आणि संबंधित शाळेकडून मिळालेले प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.

दिवेश चव्हाण

लेखकाबद्दलदिवेश चव्हाणदिवेश दिनेश चव्हाण हे मराठी पत्रकार असून ते सध्या महाराष्ट्र टाइम्स येथे कंटेंट रायटर म्हणून कार्यरत आहेत. ऑगस्ट 2026 पासून ते महाराष्ट्र टाइम्स येथे अर्थ, पर्सनल फायनान्स आणि देश-विदेशातील बातम्यांसंबंधित लेखन करत आहेत. शेअर बाजारातील घडामोडी, बँकिंग, नवे आर्थिक धोरण आणि तांत्रिक नियम अतिशय सोप्या भाषेत आणि सविस्तर पद्धतीने समजावून सांगणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.

यापूर्वी ते नवराष्ट्र या मराठी वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून काम करत होते. या काळात त्यांनी अर्थ, व्यवसाय, करिअर आणि नोकरीसह विविध क्षेत्रातील घडामोडींचे वार्तांकन केले आहे. यासोबतच काल्पनिक कथा लेखन आणि एखाद्या कथेचे स्वारस्यपूर्ण विश्लेषण करण्यातही ते पटाईत आहेत.

त्यांचे शिक्षण ठाणे येथील जोशी बेडेकर महाविद्यालयात झाले. याच ठिकाणी त्यांनी पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केले. त्यांच्याकडे मास्टर ऑफ आर्ट्स इन मल्टीमीडिया अँड मास कम्युनिकेशन ही पदव्युत्तर पदवी आहे. विविध विषयांवर अचूक आणि विश्वासार्ह बातम्या पुरवणे हा त्यांच्या लेखन, पत्रकारितेच्या माध्यमातून वाचकांना दर्जेदार माहिती देऊन त्यांना जागतिक घडामोडींविषयी जागरुक ठेवणे हा त्यांचा हेतु आहे.
जोशी बेडेकर महाविद्यालयात शिक्षण घेत असताना महाविद्यालयीन वार्षिक अंक Rta मध्ये इंग्रजी रिपोर्टींग विभागाचे हेड म्हणून त्यांनी कारोभार सांभाळला आहे.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत