Headlines

ओव्हरहेड केबलना फक्त एक वर्षाची मुदत; धोरणाला स्थायी समितीची मंजुरी


Pune News: पुणे शहरात रस्ते,झाडांवर परवानगीशिवाय टाकण्यात आलेल्या ओव्हरहेड केबलना आता तात्पुरत्या स्वरूपात नियमित करण्याच्या धोरणाला मंजूरी देण्यात आली.

ओव्हरहेड केबल
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा.प्रतिनिधी,पुणे : ओव्हरहेड केबलसाठी आकारण्यात येणारे शुल्क आणि भूमिगत केबल टाकण्यासाठी येणारा खर्च यामध्ये योग्य आर्थिक समतोल असणे आवश्यक आहे. भूमिगत केबलसाठीचा शुल्कदर किंवा खर्च अधिक राहिल्यास कंपन्या ओव्हरहेड केबलच सुरू ठेवण्याचा मार्ग स्वीकारू शकतात. त्यामुळे कंपन्यांनी शुल्क भरावे आणि त्यानंतर एका वर्षाच्या आत भूमिगत जाळ्याकडे वळावे, अशा पद्धतीने दर निश्चित करण्यात आल्याचे स्थायी समितीकडून सांगण्यात आले.

‘एक खिडकी व्यवस्था’ उपलब्ध

भूमिगत केबल टाकण्यासाठी कंपन्यांना महापालिकेकडून ‘एक खिडकी व्यवस्था’ उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे विविध विभागांकडून स्वतंत्र परवानग्या घेण्याची प्रक्रिया सुलभ होण्याची अपेक्षा आहे. शहरात सध्या सुमारे ५०० किलोमीटर केबलसाठी खोदकाम सुरू आहे. त्याचबरोबर महापालिकेचे स्वतःचे सुमारे ७५० किलोमीटरचे इंटरनेट जाळे उभारण्याचे नियोजन आहे. त्यामुळे भविष्यात ओव्हरहेड केबलचे प्रमाण कमी करून भूमिगत केबल नेटवर्क विकसित करण्यावर महापालिकेचा भर राहणार आहे.

महापालिकेच्या धोरणाला स्थायी समितीची मंजुरी

पुणे शहरातील रस्ते, झाडे, इमारती आणि विद्युत खांबांवर परवानगीशिवाय टाकण्यात आलेल्या ओव्हरहेड केबलना आता एका वर्षासाठी तात्पुरत्या स्वरूपात नियमित करण्याच्या महापालिकेच्या धोरणाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. मात्र, या निर्णयामुळे अनधिकृत ओव्हरहेड केबलला एकप्रकारे कायदेशीर संरक्षण मिळणार असल्याची टीका विरोधकांकडून होत आहे.

कंपन्यांनी केबल भूमिगत करणे बंधनकारक

स्थायी समितीच्या मंजूर धोरणानुसार दूरसंचार आणि टेलिकॉम कंपन्यांना ओव्हरहेड केबलसाठी प्रतिकिलोमीटर तीन लाख रुपये वार्षिक शुल्क, तर इंटरनेट आणि ब्रॉडबँड कंपन्यांना प्रतिकिलोमीटर एक लाख रुपये वार्षिक शुल्क भरून केबल वर्षभर ठेवता येणार आहे. या कालावधीत संबंधित कंपन्यांनी केबल भूमिगत करणे बंधनकारक राहणार आहे.

Maharashtra TimesNashik Dengue Cases: नाशिकमध्ये डेंग्यूचा पुन्हा उद्रेक! चौदा दिवसांत 29 रुग्ण; साथीच्या आजारांचे रुग्णही वाढले

‘जीआयएस मॅपिंग’ होणार

शहरातील सर्व ओव्हरहेड केबलचे संयुक्त सर्वेक्षण करून त्यांचे ‘जीआयएस’ मॅपिंग केले जाणार आहे. यामध्ये केबलचा मार्ग, मालकी आणि सद्यस्थितीची नोंद केली जाणार आहे. प्रत्येक केबलवर संबंधित कंपनीचे नाव, २४ तासांचा आपत्कालीन संपर्क क्रमांक, परवानगी किंवा क्यूआर क्रमांकाचे टॅगिंग; तसेच रंगकोडिंग करणे बंधनकारक करण्यात येणार आहे.

Maharashtra TimesChandrashekhar Bawankule :रुग्णांच्या मोबाईलवर रिपोर्ट उपलब्ध करून देणाऱ्या ॲपचे ,महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते लोकार्पण
त्यामुळे कोणती केबल कोणत्या कंपनीची आहे, तिची परवानगी आहे, की नाही आणि ती वापरात आहे, की नाही, याची माहिती महापालिकेला सहज उपलब्ध होणार असल्याचा दावा स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी केला आहे.

कांचन परुळेकर

लेखकाबद्दलकांचन परुळेकरकांचन परुळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कन्सलटंट पदावर कार्यरत आहेत. कांचन स्थानिक बातम्या, पायाभूत सुविधा, बांधकाम आणि विकास प्रकल्प यासाठी लिखाण करतात. त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात ही महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमधून झाली. मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या व्हिडिओ विभागात त्यांनी इंटर्न म्हणून काम केले. सुरुवातीला त्यांनी युट्यूब, फेसबुक आणि इन्स्टाग्रामसाठी कन्टेंट तयार करताना व्हिडिओ आणि लेख लिहिले आहेत. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या आणि क्राइमसह स्पोर्ट्सवर इत्यादी विषयांचे वाचन आणि लेखन करण्याची त्यांना विशेष आवड आहे.

कांचन यांचे संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून झाले असून पत्रकारितेची आवड असल्याने त्यांनी कोकण ते मुंबई असा शैक्षणिक प्रवास केला. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण गावी पूर्ण केले. इकोनॉमिक्स या विषयातून पद्वी घेतली. लिखाणाची आवड, संवाद साधण्याचे कौशल्य आणि पत्रकारितेची आवड समजून घेऊन साठ्ये कॉलेज विलेपार्ले येथे वृत्तपत्रविद्या आणि संवाद या विषयात त्यांनी पद्व्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला.

महाविद्यालयीन काळात कला आणि नाटक विषयात विशेष आवड असल्याने त्यांनी अभिनयदेखील केले आहे. काही नाटक त्यांनी लिहिले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या युथ फेस्टिवलमध्ये त्यांना अभिनयासाठी ब्रॉन्झ आणि सिल्व्हर मेडल देण्यात आले आहेत. कविता आणि लेख लिहिण्याची आवड असल्याने शाळा ,कॉलेज मासिक अंकात त्यांचे लेख देखील प्रसिध्द झाले आहेत.

२०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन सोबत जोडल्या गेल्यानंतर त्यांची पत्रकारितेची आवड अगदी स्पष्ट झाली. बोलण्यातला स्पष्टपणा लिखाणातली पारदर्शकता अधिक नव्याने समजत गेली. तीन महिन्यांच्या इंटर्नशिप नंतर त्या आता कन्सलटंट पदावर म.टा. समुहात सहभागी झाल्या आहेत. पारदर्शकता आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम त्या करत आहेत.आणखी वाचा