Headlines

Mulund Dumping Ground Land to Gautam Adani led Navbharat Mega Developers for Dharavi Redevelopment; मुलुंड डम्पिंग ग्राऊंडवरील १५ एकर जागा ‘अदानी’ कंपनीला, 98 कोटींना पाच वर्षांसाठी भाडेतत्त्वावर मंजुरी


Mulund Dumping Ground Land to Adani : मुलुंडमधील ही १५ एकर जागा पाच वर्षांसाठी रेडीरेकनर दराने प्रति चौरस मीटर ४७ हजार ८०० रुपये या दरानुसार १८१ कोटी ३५ लाख २ हजार १२५ रुपयांना देण्यात येणार होती. मात्र, आता तीच जागा ९८ कोटी ४६ लाख ८३ हजार रुपयांना देण्यात येणार आहे.

Mulund Dumping Ground Gautam Adani Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : मुलुंड डम्पिंग ग्राऊंडवरील १५ एकर जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या विशेष हेतू कंपनी ‘नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रा. लिमिटेड’ला, म्हणजेच अदानी कंपनीला, पाच वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहे. या संदर्भातील प्रस्तावाला शुक्रवारी सुधार समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. ही जागा देण्यास शिवसेना उबाठा आणि काँग्रेसने तीव्र विरोध केला. मात्र, विरोधकांचा आक्षेप नोंदवून सुधार समिती अध्यक्ष संध्या दोशी यांनी हा प्रस्ताव मंजूर केला.

भाडेतत्त्वावरील घरे बांधणार

धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत विशेष हेतू कंपनी नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रा. लिमिटेडकडून पात्र रहिवाशांसाठी मोफत घरे, तसेच सुमारे साडेतीन ते चार लाख अपात्र रहिवाशांसाठी परवडणारी भाडेतत्त्वावरील घरे बांधली जाणार आहेत. धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या कामासाठी आवश्यक असलेल्या कास्टिंग यार्ड, रेडीमिक्स काँक्रिट प्लांट आणि इतर संबंधित कामांसाठी मुलुंड डम्पिंग ग्राऊंडमधील १५ एकर जागा भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहे.

Maharashtra TimesE Challan : वाहतूक नियम मोडल्याचं चालान आल्यास घाई करा, हरकतीस केवळ 45 दिवसांची मुदत, दुर्लक्ष केल्यास दंड अनिवार्य

पाच वर्षांसाठी ९८ कोटी

याआधी ही १५ एकर जागा पाच वर्षांसाठी रेडीरेकनर दराने प्रति चौरस मीटर ४७ हजार ८०० रुपये या दरानुसार १८१ कोटी ३५ लाख २ हजार १२५ रुपयांना देण्यात येणार होती. मात्र, आता हीच जागा ९८ कोटी ४६ लाख ८३ हजार रुपयांना देण्यात येणार आहे. भाडेतत्त्वावर देण्यात येणाऱ्या या जागेसंदर्भातील प्रस्ताव शुक्रवारी सुधार समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी सादर करण्यात आला. यावेळी शिवसेना उबाठा आणि काँग्रेसच्या सदस्यांनी या प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शविला.

ठाकरेसेनेचा विरोध

शिवसेना उबाठा पक्षाच्या नगरसेविका विशाखा राऊत यांनी या प्रस्तावावर आक्षेप घेतला. ‘कास्टिंग यार्ड आणि रेडीमिक्स प्लांटसाठी धारावीतच जागा का दिली जात नाही’, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ‘मुलुंडकरांचा विरोध असतानाही मुलुंड डम्पिंग ग्राऊंडवरील जागा भाडेतत्त्वावर देण्याचा घाट का घातला जात आहे’, असा प्रश्न त्यांनी प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांना केला.

Maharashtra TimesTukaram Mundhe : तुकाराम मुंढेंना 10-15 वर्ष तर FDA मध्ये ठेवू शकत नाही, योगेश कदमांची खंत, आयुक्तांच्या बदलीच्या चर्चांवर मोठं भाष्य

काँग्रेसकडूनही आडकाठी

काँग्रेसचे महापालिका गटनेते अशरफ आजमी यांनीही या प्रस्तावाला विरोध केला. ‘या कामासाठी कोणतीही निविदा काढण्यात आलेली नाही. त्यामुळे हे काम केवळ एका विशिष्ट कंपनीलाच देण्याचा हेतू असल्याचे स्पष्ट होते’, असा आरोप आजमी यांनी केला. मात्र, भाजपचे नगरसेवक प्रकाश गंगाधरे, स्वप्ना म्हात्रे आदींनी धारावीच्या विकासाच्या दृष्टीने या प्रकल्पात कोणताही अडथळा आणू नये, अशी भूमिका मांडली. ‘धारावी पुनर्विकास प्रकल्प हा मोठा आणि महत्त्वाचा प्रकल्प असून त्यासाठी आवश्यक सुविधा निर्माण करणे गरजेचे आहे’, असे सत्ताधारी सदस्यांनी म्हटले. त्यानंतर सुधार समिती अध्यक्षांनी यांनी हा प्रस्ताव मंजूर केला.