मंगळ ग्रहावर कधीकाळी प्रगत जीवसृष्टी किंवा सभ्यता अस्तित्वात होती का? नासाच्या क्युरिओसिटी रोव्हरने (Curiosity Rover) पाठवलेल्या एका नवीन फोटोमुळे हा प्रश्न जागतिक स्तरावर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. जुलै 2026 च्या शेवटी या रोव्हरने मंगळावरील ‘माउंट शार्प’ या दुर्गम भागातील अनेक हाय-रेझोल्यूशन फोटो टिपले होते.
शास्त्रज्ञांनी नंतर हे वेगवेगळे फोटो एकत्र जोडून एक विस्तृत पॅनोरमा तयार केली. या मुख्य फोटोमध्येएका मोठ्या खडकाच्या मध्यभागी गडद काळ्या रंगाची एक अनोखी आकृती दिसून आली, जी हुबेहूब मानवनिर्मित ‘प्रवेशद्वारासारखी’ दिसत आहे
हा फोटो समोर येताच सोशल मीडिया आणि इंटरनेटवर परग्रहवासीयांच्या अस्तित्वाबाबत आणि त्यांच्या गुप्त तळांविषयी तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. अनेक नेटकऱ्यांनी हा एलियन्सच्या ऐतिहासिक वास्तूचा भाग असल्याचा दावा केला आहे.
मात्र, अमेरिकन अंतराळ संस्था ‘नासा’ने अद्याप अशा कोणत्याही दाव्याची पुष्टी केलेली नाही. वैज्ञानिकांच्या प्राथमिक अंदाजानुसार, हा केवळ खडकांच्या नैसर्गिक झीजेमुळे आणि भूगर्भीय हालचालींमुळे निर्माण झालेला एक भौगोलिक आकार असण्याची दाट शक्यता आहे.
नेमका दावा काय?
UFO आणि परग्रहवासीयांबद्दल दावे करण्यासाठी प्रसिद्ध असलेले स्कॉट सी. वारिंग यांच्या मते, या फोटोत दिसणारा आकार हुबेहूब एखाद्या दरवाजासारखाच आहे. त्यांचा असा दावा आहे की हा दरवाजा सुमारे 6.6 फूट उंच आणि 3.3 फूट रुंद असू शकतो. परंतु, त्यांनी हे मोजमाप नेमके कसे काढले, याचे कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. केवळ एखादा फोटो पाहून कोणत्याही वस्तूच्या अचूक आकाराचा अंदाज लावणे शास्त्रोक्त पद्धतीने अशक्य असते.
शास्त्रज्ञांचे काय मत?
अमेरिकन अंतराळ संस्था ‘नासा’ने स्पष्ट केले आहे की, मंगळ ग्रहावर एलियन्स किंवा कोणत्याही प्राचीन संस्कृतीचे अस्तित्व असल्याचा कोणताही ठोस पुरावा अद्याप मिळालेला नाही. वैज्ञानिकांच्या मते, हा आकार खडकांना गेलेले तडे, पडलेल्या भेगा आणि हजारो वर्षांपासून झालेल्या नैसर्गिक झीजेमुळे तयार झाला आहे. अशा प्रकारच्या नैसर्गिक आकृत्या पृथ्वीवरही अनेक ठिकाणी पाहायला मिळतात.
यापूर्वीही असेच घडले
यापूर्वी 2022 मध्येही क्युरिओसिटी रोव्हरने पाठवलेल्या एका फोटोमध्ये अशाच प्रकारची दरवाजासारखी आकृती दिसली होती. मात्र, नंतर सखोल तपासणीअंती असे समोर आले की, तो केवळ 12 इंच उंच आणि 16 इंच रुंद असलेला खडकातील एक लहानसा नैसर्गिक खड्डा होता. खडकांवर पडणारा अंतर्गत ताण आणि त्यांच्या तुटण्यामुळे अशा नैसर्गिक आकृत्या तयार होतात, असे शास्त्रज्ञांनी तेव्हा स्पष्ट केले होते.
(Disclaimer: प्रस्तुत वृत्त केवळ उपलब्ध माहिती आणि सर्वसामान्य संदर्भांच्या आधारावर तयार करण्यात आले आहे. या वृत्तातील माहितीची अचूकता, पूर्णता किंवा विश्वासार्हतेबाबत ‘मटा’ (महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन) कोणताही दावा करत नाही किंवा त्याची पुष्टी करत नाही.)

