Melghat Ashram School: मेळघाटसारख्या दुर्गम भागात अशा घटना घडल्यास त्याभोवती अंधश्रद्धेचे वलय निर्माण होण्याची मोठी शक्यता असते. डोमातही असा प्रकार घडला.

मास हिस्टेरिया ही मानसिक अवस्था असली तरी, हा ताणतणाव सहजासहजी निर्माण होत नाही. एकाच ठिकाणी अनेक विद्यार्थिनींना रडणे, हसणे, ओरडणे, शांत राहणे किंवा प्रतिसाद न देणे अशी लक्षणे जाणवली असतील, तर त्यामागे सामूहिक तणावाची शक्यता वैद्यकीय अधिकारी व्यक्त करतात. त्यामुळे डोमा आश्रमशाळेत ‘नेमके काय झाले?’ यापेक्षा ‘असा तणाव निर्माण होण्यामागे कोणते घटक होते?’ याचा शोध आता अधिक महत्त्वाचा ठरत आहे.
Gadchiroli News : साखरझोपेत असताना आक्रित घडलं, तीन विद्यार्थिनींचा सर्पदंशाने करुण अंत; कुटुंबीयांचा आक्रोशआश्रमशाळेतील अपुऱ्या खोल्या, एकाच ठिकाणी क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा वावर, आहारातील अनियमितता व गुणवत्ता तसेच स्वच्छतेचा अभाव यासारख्या बाबी विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम घडवून आणतात. घरापासून दूर राहणाऱ्या लहान बालकांना जेव्हा सातत्याने गुदमरल्यासारख्या वातावरणाचा सामना करावा लागतो, तेव्हा असा सामूहिक मानसिक तणाव निर्माण होण्याची शक्यता अधिक बळावते. डोमा येथील घटनेतही याच घटकांची पार्श्वभूमी लाभल्याचे संकेत प्रशासकीय सूत्रांकडून मिळत आहेत. विद्यार्थ्यांसाठी नियमित समुपदेशन व आनंददायी वातावरणाचा अभाव, परिसर आणि व्यक्तिगत स्वच्छतेबाबत सातत्यपूर्ण मार्गदर्शनाची वानवा हीसुद्धा या गंभीर प्रकारामागील प्रमुख कारणे असल्याचे बोलले जात आहे. पहिली घटना घडल्यानंतर तत्काळ उपाययोजना न झाल्याने आश्रमशाळेतील विद्यार्थिनींमध्ये भीती वाढल्याचा निष्कर्ष तज्ज्ञांकडून काढला जात आहे.
अशाप्रसंगी केवळ वैद्यकीय उपचारापुरते मर्यादित न राहता, आश्रमशाळांमध्ये मोकळे, तणावमुक्त, सुरक्षित आणि बालस्नेही वातावरण तयार करणे हे आव्हान ठरत आहे.
Gadchiroli News: आश्रमशाळांचे ‘थर्ड पार्टी ऑडिट’; सर्पदंशाने 3 विद्यार्थिनींनी जीव गमावल्यानंतर आदिवासी विकास मंत्री उईकेंची घोषणा
घटनेचे गांभीर्य लक्षात घेत आदिवासी विकास विभागाच्या मुख्य आयुक्त लीना बनसोड यांनी डोमासह जारिदा व सलोना आश्रमशाळांना भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. या भागात केंद्रीय स्वयंपाकगृह सुरू करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात असून, घडल्या प्रकाराची चौकशी करून योग्य त्या कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत. मात्र, अशा प्रकारची आपत्कालीन परिस्थिती उद्भवण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाययोजना का राबविल्या जात नाहीत, असा सवाल शिक्षण व सामाजिक वर्तुळातून उपस्थित केला जात आहे.
मेळघाटात व्यापक प्रबोधनाची गरज
डोमा आश्रमशाळेतील प्रकार हा एका शाळेपुरता मर्यादित नसून मेळघाटात याबाबत व्यापक जनजागृतीची आवश्यकता अधोरेखित करतो. या घटनेची दखल घेऊन अंधश्रद्धा निर्मूलन आणि वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी जादूटोणाविरोधी समितीचे अध्यक्ष असलेले जिल्हाधिकारी, तसेच समाजकल्याण विभागाचे सहसंचालक यांच्याशी तातडीने पत्रवार्ता करून विशेष उपक्रम हाती घेतला जाईल, असे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यकारिणी सदस्य अॅड. गणेश हलकारे यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले.

