Nagpur News: अमृत २.० योजने अंतर्गत सुरू असणार्या खोदकामादरम्यान जमिनीखाली नेमकं काय हे माहित नसल्याने वीजवाहिन्या ,दूरसंचार केबल्स,जलवाहिन्यांचे नुकसाण झाल्याने महापालिकेच्या नियोजनक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

यंत्रसामग्रीने खोदकाम त्याचा फटका नागरिकांना
अमृत २.० अंतर्गत शहरात पाणीपुरवठा आणि सांडपाणी व्यवस्थेशी संबंधित सुमारे ९५७ कोटी रुपयांची कामे हाती घेण्यात आली आहेत. या कामांसाठी रस्ते, चौक आणि रहिवासी भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर खोदकाम सुरू आहे. मात्र, अनेक ठिकाणी काम सुरू करण्यापूर्वी भूमिगत युटिलिटींचे मॅपिंग केले जात नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी, जलवाहिनी किंवा वीजवाहिनी नेमकी कुठे आहे, याची माहिती नसताना यंत्रसामग्रीने खोदकाम केले जाते आणि त्याचा फटका नागरिकांना बसतो.
अडचणींचा सामना करावा लागत आहे.
लक्ष्मीनगर, हनुमाननगर, धंतोली आणि नेहरूनगर या झोनमधील नागरिकांना या कामांमुळे अधिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. भूमिगत वीजवाहिनी तुटल्यास परिसरातील वीजपुरवठा खंडित होतो. जलवाहिनीला धक्का लागल्यास मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जाते आणि पाणीपुरवठाही विस्कळित होतो. दूरसंचार केबल्स तुटल्यास इंटरनेट आणि दूरध्वनी सेवांवर परिणाम होतो.
खासगी यंत्रणांच्या अनेक युटिलिटी जमिनीखाली
अशा घटना घडल्यानंतर दुरुस्तीसाठी पुन्हा खोदकाम करावे लागते. त्यामुळे एकाच रस्त्यावर वारंवार खोदकाम होऊन वाहतूक कोंडी, धूळ आणि नागरिकांची गैरसोय वाढते. शहरातील विविध भागांमध्ये सरकारी तसेच खासगी यंत्रणांच्या अनेक युटिलिटी जमिनीखाली आहेत. त्यांचे अचूक स्थान, खोली आणि मार्ग यांची डिजिटल नोंद असणे आवश्यक आहे.
आधुनिक युटिलिटी मॅपिंग मशिनच्या मदतीने प्रत्यक्ष खोदकाम न करता जमिनीखालील वाहिन्यांचा शोध घेता येतो. त्यामुळे अपघाती नुकसान टाळता येऊ शकते, असे नगररचना क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
Ashish Shelar: राहुल गांधी आता कुणाचा राजीनामा मागणार? झारखंड आंदोलनावरुन आशिष शेलार यांची टीका
नियोजन करणे गरजेचे
अलिकडेच झालेल्या आढावा बैठकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही महापालिकेकडे अशी यंत्रणा नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. सोमवारी झालेल्या महापालिकेच्या सभेत महापौरांनीही, खोदलेले रस्ते पूर्ववत करण्याबाबत संबंधितांना इशारा दिला. शहरात मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांची कामे सुरू असताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नियोजन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
ही बाब गंभीर मानली जात आहे
‘स्मार्ट सिटी’कडे वाटचाल करणाऱ्या संत्रानगरीत भूमिगत युटिलिटींचा अद्ययावत नकाशा उपलब्ध नसणे ही बाब गंभीर मानली जात आहे. अमृत २.०सह आगामी सर्व विकासकामांपूर्वी भूमिगत युटिलिटींचे मॅपिंग बंधनकारक करावे, त्यासाठी अत्याधुनिक यंत्रसामग्री तातडीने उपलब्ध करून घ्यावी आणि सर्व युटिलिटींचा डिजिटल डेटाबेस तयार करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

