शहापूर पोलिसांकडून कारवाई : न्यायालयासमोर केले हजर, ,
त. भा. प्रतिनिधी
बेळगाव : धामणे, ता. बेळगाव येथील युवकाच्या आत्महत्या प्रकरणी शहापूर पोलिसांनी दोघा जणांना अटक केली आहे. आपण कशासाठी आत्महत्या करीत आहोत? कोणामुळे आपल्यावर ही वेळ आली? याविषयी सविस्तर व्हिडिओ करून आपल्या परिचितांना तो व्हिडिओ पाठवून त्या युवकाने शहापूर येथे आत्महत्या केली होती.
राजू बडीगेर (वय 36), डॉ. संजय पवार (वय 40) दोघेही राहणार धामणे अशी त्यांची नावे आहेत. शहापूरचे पोलीस निरीक्षक एस. एस. सीमानी व त्यांच्या सहकाऱ्यांनी या दोघा जणांना अटक केली आहे. त्यांना येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी तृतीय न्यायाधीशांसमोर हजर करण्यात आले. न्यायालयाच्या आदेशावरून त्यांची रवानगी हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.
निंगाप्पा सद्याप्पा हंपण्णावर (वय 41) या युवकाने शहापूर येथील बी. एम. कंकणवाडी आयुर्वेद महाविद्यालयाजवळील पाण्याच्या टाकीनजीक शनिवार दि. 8 ऑगस्ट रोजी सकाळी 8.30 ते 8.45 या वेळेत गळफास घेऊन आपले जीवन संपविले आहे. राजू व डॉ. संजय बरोबरच धामणे येथील दीपा मुलीमनी यांच्यामुळे आपल्यावर आत्महत्येची वेळ येऊन ठेपली आहे, असा आरोप निंगाप्पाने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या संपर्कातील व्यक्तींना पाठविलेल्या व्हिडिओत केला आहे.
निंगाप्पाची पत्नी अश्विनी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिघा जणांवर एफआयआर दाखल करून पोलिसांनी दोघा जणांना अटक केली आहे. व्हिडिओमधील आरोप लक्षात घेता हे प्रकरण गंभीर असल्याचे दिसून येते. निंगाप्पाला शुक्रवार दि. 7 ऑगस्ट रोजी रात्री त्याच्या घरासमोरच मारहाण करून तू स्वत: मर नाहीतर आम्ही तुला संपवू, असे धमकावले आहे. त्यांच्या हातून यातनादायक मरण पत्करण्यापेक्षा स्वत: आत्महत्या केलेली बरी म्हणून आपण गळफास घेत असल्याचे निंगाप्पाने व्हिडिओत म्हटले आहे.
दीपा व आपली मैत्री, घर विक्रीतून आलेल्या पैशांचा व्यवहार, राजू बडीगेर व डॉ. संजय पवार यांची भूमिका यासंबंधी सविस्तर माहिती देतानाच हे लोक बलाढ्या आहेत. ते काही करू शकतात. पोलिसांनी त्यांचे ऐकून आपल्यावर अन्याय करू नये, आपल्याला न्याय द्यावा, या तिघा जणांना शिक्षा व्हावी, मृत्यूनंतर आपल्याला न्याय मिळावा म्हणून आपण आपल्या संपर्कातील प्रत्येकाला हा व्हिडिओ पाठवत आहे. जरी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला तरी कोणी तरी आवाज उठवेल, अशी अपेक्षाही आत्महत्या करण्यापूर्वी निंगाप्पाने व्यक्त केली आहे. शहापूर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून एकूण पाचहून अधिक व्हिडिओ ताब्यात घेऊन आत्महत्या करण्यापूर्वी निंगाप्पाने केलेल्या आरोपांची चौकशी करण्यात येत आहे.
