Pune Woman dies during Surgery : दुचाकीवरून पडल्यानंतर हाताच्या फ्रॅक्चरवरील शस्त्रक्रियेसाठी खासगी रुग्णालयात दाखल झालेल्या २८ वर्षीय विवाहितेचा ऑपरेशनदरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील शिरुर शहरात घडली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. वृत्तसेवा, पुणे : दुचाकीवरून पडल्यानंतर हाताच्या फ्रॅक्चरवर शस्त्रक्रियेसाठी खासगी रुग्णालयात दाखल झालेल्या २८ वर्षीय विवाहितेचा शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील शिरुर शहरातील बाबूरावनगर परिसरात घडली. पूजा राहुल गई असे मृत महिलेचे नाव आहे. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळेच पत्नीचा मृत्यू झाल्याचा आरोप पती राहुल गई यांनी केला आहे.
दुचाकीवरुन पडल्याने उजव्या हाताला दुखापत
मंगळवारी (चार ऑगस्ट) दुचाकीवरून जात असताना पडल्याने पूजा यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना बाबूरावनगर येथील एका मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तपासणीनंतर त्यांच्या हाताचे हाड फ्रॅक्चर झाल्याचे निदान झाले.
त्यानुसार डॉक्टरांनी हातावर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. गुरुवारी (सहा ऑगस्ट) सकाळी सुमारे ११ वाजता त्यांना ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले. सुमारे तीन तासांनी डॉक्टरांनी बाहेर येऊन पूजा यांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. शिरूर पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
मृत्यूचे नेमके कारण समजण्यासाठी पूजाची बॉडी ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आली आहे. वैद्यकीय निष्काळजीपणा झाल्याचे शवविच्छेदन व अन्य तपासणीतून निष्पन्न झाल्यास संबंधित डॉक्टरांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी मृत महिलेच्या कुटुंबीयांनी केली आहे.
दुसरीकडे, सर्पदंशाने ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना नागपुरातील वाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आठवा मैल परिसरातील गणेशनगर झोपडपट्टी येथे घडली. नारायण गोविंदराव सावंत (वय ६०) असे मृताचे नाव आहे. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, नारायण हे गणेशनगर झोपडपट्टीतील मोकळ्या जागेत तंबू टाकून राहायचे. ४ ऑगस्टला सापाने त्यांना चावा घेतला. नारायण यांना मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी वाडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा