![]()
ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा समारोप सोहळा हा भारतासाठी एकाच वेळी सांगता; तसेच सुरुवात होता. समारोप अशासाठी, की केवळ दहा खेळांची स्पर्धा असूनही भारताने राष्ट्रकुल क्रीडा पदक क्रमवारीतील चौथे स्थान राखले होते. सुरुवात त्याहूनही महत्त्वाची होती. आता सर्व लक्ष अहमदाबाद येथे चार वर्षांनी होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या तयारीकडे लागले. ग्लासगोमध्ये पदके किती जिंकली, त्याचबरोबर भारताची ताकद नसलेल्या खेळांत काय प्रगती झाली, काय पीछेहाट झाली, याचे उत्तर मिळाले; तसेच आता भारतातील स्पर्धा संयोजनाची प्रतिमा उंचावण्याचेही आव्हान असेल.
भारताची ३९ पदके नक्कीच यापूर्वीच्या स्पर्धांच्या तुलनेत कमी आहेत; मात्र ग्लासगोतील स्पर्धा ही केवळ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा सुरू राहण्यासाठी पार पाडलेली एक औपचारिकता म्हणता येईल. मूळ कार्यक्रमानुसार व्हिक्टोरियात ही स्पर्धा होती. त्यांनी संयोजनाचा खर्च आवाक्याबाहेर जात आहे हे पाहून माघार घेतली. स्पर्धा होणारच नाही, असे वाटत असताना ग्लासगोला तयार करण्यात आले. त्यांनी अंदाजे दहा-बारा किलोमीटर परिघात असलेल्या तयार स्टेडियममध्ये स्पर्धा घेतली. त्यामुळे खेळ कमी झाले. टेबल टेनिस, बॅडमिंटन, कुस्ती, हॉकीला वगळले गेले. या परिस्थितीत आशा राष्ट्रकुलात भारतास फारसे आव्हान लाभत नसलेल्या बॉक्सिंग आणि ॲथलेटिक्समध्ये होत्या. बॉक्सरनी अपेक्षा पूर्ण केल्या, वेटलिफ्टिंगमध्ये पदके कमी झाली आणि ॲथलेटिक्समध्ये आश्वासक कामगिरी झाली.
अर्धशतक दुरावले तरीही…
नव्या सहस्रकातील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील भारताच्या कामगिरीवर नजर टाकल्यास ग्लासगो स्पर्धेत भारताने प्रथमच अर्धशतक पार न केल्याचे दिसते; मात्र आकडेवारी कायम खरे चित्र दाखवतेच असे नाही. यंदाच्या स्पर्धेत कुस्ती, बॅडमिंटन, टेबल टेनिस, हॉकी या खेळांचा समावेश नव्हता. भारताने गतस्पर्धेत या चार क्रीडा प्रकारांत १३ सुवर्णपदकांसह एकूण २७ पदके जिंकली होती. म्हणजेच स्पर्धा सुरू होण्यापूर्वी भारताची निम्मी पदके कमी झाली होती. त्यानंतर पदक क्रमवारीत चौथे येताना भारताने यजमान स्कॉटलंडला मागे टाकले. भारतीयांनी दहा खेळांची स्पर्धा असूनही ३९ पदके जिंकली, हे विशेष.
अंतिम टप्पा दूर
‘राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील बॉक्सिंगचे यश आल्हाददायक असले, तरी अजून खूप मजल मारायची आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत फारशा आशा न बाळगणे योग्य होईल. चीन, मंगोलिया, तैवान, फिलिपिन्सचे जागतिक स्तरावर दबदबा राखलेले बॉक्सर असतील,’ याकडे भारतीय बॉक्सिंग महासंघाचे माजी सचिव जय कवळी लक्ष वेधतात. राष्ट्रकुलातील यश हा एक टप्पा मानण्याचा सल्ला कवळी यांनी दिला आहे. अर्थातच ते सचिव असताना सुरू केलेल्या योजनांना फळ लाभत आहे, याचा त्यांना आनंद आहे.
ॲथलेटिक्समध्ये नक्कीच आफ्रिकेच्या स्पर्धकांना दिलेले आव्हान, त्यांच्यावर राखलेले वर्चस्व नक्कीच मोलाचे आहे. त्यांच्याकडून नक्कीच आशियाई क्रीडा स्पर्धेत जास्त आशा असेल. आशियाई क्रीडा स्पर्धेचे जास्तीचे महत्त्व भारतीय खेळाडू जाणतात. त्यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा हा त्या वाटचालीतील एक टप्पा आहे, याकडेच जास्त लक्ष दिले. `या स्पर्धेने आपल्या पुरुष अॅथलीटचीही ताकद वाढत असल्याचे दिसले. उडीच्या तसेच फेकीच्या स्पर्धांबरोबरच मध्यम आणि दीर्घ पल्ल्याच्या शर्यतीत चांगली कामगिरी झाली आहे. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर ते आशियाई क्रीडा स्पर्धेसाठीची पूर्वतयारी सुरू करतील. ग्लासगोतील हवामान कमालीचे लहरी होते. त्याचा कामगिरीवर नक्कीच परिणाम झाला. आशियाई क्रीडा स्पर्धेच्यावेळी असलेले वातावरण भारतीयांसाठी जास्त जवळचे असेल, त्याचाही फायदा होऊन गेल्या काही स्पर्धांपेक्षा नक्कीच सरस कामगिरी होऊ शकते,’ असा विश्वास भारतीय अॅथलेटिक्स महासंघाचे हाय परफॉर्मन्स सल्लागार राहुल पवार यांनी व्यक्त केला.
पॅरा खेळाडूंचे यश
सक्षम आणि पॅरा खेळाडूंची एकत्रित स्पर्धा म्हणजे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा असे म्हणता येईल. भारतीय पॅरा क्रीडापटू क्वचितच भारताच्या यशात मोलाचा सहभाग उचलत होते; मात्र ग्लासगोत वेगळेच घडले. भारताने २८ पॅरा क्रीडापटूंची निवड केली होती. त्यांनी तीन सुवर्ण, दोन रौप्य आणि दोन ब्राँझ अशी सात पदके जिंकून दिली. भारतीय पॅरा क्रीडापटूंनी यापूर्वीच्या स्पर्धेत जिंकलेल्या एकत्रित यशापेक्षा हे यश जास्त आहे. देशाच्या सीमेचे रक्षण करताना भूसुरुंग स्फोटामुळे आलेले अपंगत्व, मोटारसायकलचा अपघात, बालपणात पोलिओचे डोस न मिळाल्याचा परिणाम किंवा सोळा वर्षीय मुलीने उसनी सायकल घेऊन केलेले प्रयत्न, सर्व काही संघर्षावर मात करण्याच्या कहाण्या आहेत. २००२मध्ये पॅरा क्रीडापटू खेळाचा भाग झाल्यानंतरही ग्लासगोपूर्वी त्यांची एकत्रित कमाई एक सुवर्ण, दोन रौप्य आणि दोन ब्राँझ होती. यंदाची पॅरा खेळाडूंची सात पदके या सात खडतर संघर्षाच्या, स्वत:ला सिद्ध करण्यासाठी घेतलेल्या परिश्रमाच्या प्रेरक कहाणी आहेत. त्याचबरोबर या खेळाडूंकडे बघणारा दृष्टिकोन बदलण्यास भाग पाडणारेही हे यश आहे.
हे इशारेही
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील यशात ज्युदो स्पर्धेतील यशही मोलाचे आहे. प्रथमच जिंकलेली दोन सुवर्णपदके भारतीय क्रीडापटू जास्त खेळांत यशस्वी होत असल्याच्या आशा नक्कीच निर्माण करते; मात्र या स्पर्धेपूर्वी एक ज्यूदो खेळाडू उत्तेजक चाचणीत दोषी ठरला होता, हे विसरून चालणार नाही. प्रत्येक प्रमुख स्पर्धेपूर्वीच्या उत्तेजक चाचणीत भारतीय खेळाडू दोषी आढळतात, हे सुखावणारे चित्र नव्हे. यामुळे प्रत्येक यश संशयाच्या भोवऱ्यात येते, हे लक्षात घेऊन कठोर उपाय अमलात आणणे गरजेचे आहे.
चार वर्षांनी भारतात स्पर्धा होत असताना लक्ष्य असायला हवे ते दिल्लीपेक्षा सरस होण्याचे. २०१०च्या भारताच्या राजधानीतील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारत ३८ सुवर्णपदकांसह १०१ पदके जिंकून दुसरा आला होता. दिल्लीतील या स्पर्धेनंतर किंवा काही वर्षांत भारतीय खेळाडू जास्त व्यावसायिक झाले आहेत. आता आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करीत असताना आर्थिक प्रश्न त्यांच्यासमोर फारसे नसतात. परदेशातील सराव अनेकांसाठी नित्याचाच झाला आहे. किंबहुना अनेक खेळाडू जास्त सराव परदेशात करतात. भारतातही अनेक खेळांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षक आहेत. अनेक ठिकाणी जागतिक दर्जाच्या सुविधा आहेत. आता पूर्वीसारखे आंतरराष्ट्रीय यश क्वचित लाभत नाही; मात्र त्याच वेळी या सुविधांचा फायदा कामगिरीत दिसेल, याकडे खेळाडूंनीही लक्ष द्यायला हवे. जलतरण, बोल्स, सायकलिंगमधील अपयश हेच तर सांगत आहे. त्यामुळे २०१०पेक्षा सरस कामगिरी झाली नाही तर ते अपयश असे समजून तयारी हवी.
एक मात्र खरे आहे, २०१०ची स्पर्धा मैदानावरील कामगिरीपेक्षा स्पर्धापूर्व घडामोडींनी जास्त गाजली. संयोजनाचा सातत्याने वाढणारा खर्च, स्टेडियम उभारणीत झालेला कमालीचा विलंब, त्यातील भ्रष्टाचाराचे आरोप, जास्तच चर्चेत राहिले. अहमदाबादला स्पर्धा होताना याची पुनरावृत्ती टाळण्याकडे जास्त लक्ष असायला हवे. त्या स्पर्धेची स्टेडियम, स्पर्धेची पूर्वतयारी वेळेत होईल, त्यात पारदर्शकता असेल तरच भारताच्या पदकांना झळाळी लाभेल आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या संयोजनाद्वारे ऑलिम्पिकची तयारी दाखवता येईल.
एक अधुरा लढा
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा म्हणजे ब्रिटिशांच्या वसाहती जिथे होत्या, ते मान्य करणाऱ्या देशातील स्पर्धा. अर्थातच ब्रिटन आपल्या तालावर ही स्पर्धा नाचवत असल्याचे चित्र आहे. १९९८मध्ये क्वालांलंपूरला १६वी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा होईपर्यंत ही स्पर्धा ऑस्ट्रेलिया खंड तसेच ब्रिटन, कॅनडाबाहेर घेण्याची तयारी नव्हती. या स्पर्धेपर्यंत केवळ वैयक्तिक खेळांच्याच स्पर्धा होत असत. जणू काही इंग्लंड, ऑस्ट्रेलियाला आपले वर्चस्व दाखवण्यासाठी ही स्पर्धा हवी असे. भारतीय खेळाडूंनी प्रगती करायला सुरुवात केली. भारतीय नेमबाज, तिरंदाज, कुस्तीगीर यश मिळवू लागले. भारताचे स्थान उंचावण्यास सुरुवात झाली. २०१०च्या दिल्ली स्पर्धेत भारताने इंग्लंडला मागे टाकत पदक क्रमवारीत दुसरे स्थान मिळवले आणि भारतीय खेळांच्या गळ्याला नख लावण्यास सुरुवात झाली. २०२२च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील खेळ ठरले, भारतीय वर्चस्वाच्या खेळांचे गळे आवळण्यास सुरुवात झाली आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे तत्कालीन अध्यक्ष नरींदर बत्रा यांनी थेट स्पर्धा बहिष्काराचा ईशारा दिला. राष्ट्रकुलातील देशांच्या एकूण लोकसंख्येत भारताचा वाटा जवळपास पन्नास टक्के. त्यानंतरही निर्णय प्रक्रियेत भारत नाही. या परिस्थितीत ब्रिटिश वसाहतींमधील देशांत होणाऱ्या स्पर्धेत कशाला खेळायचे अशी संतप्त विचारणा केली. भारताचा इशारा पाहून राष्ट्रकुल क्रीडा महासंघ धास्तावले. त्यांनी भारताचे मन वळवण्याचा प्रयत्न सुरू केला. अखेर चंडीगढला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील तिरंदाजी तसेच नेमबाजीची स्पर्धा होईल असा निर्णय जवळपास झाला. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे उद््घाटन होण्यापूर्वी स्पर्धा कशा होणार, पदक तालिकेत पदके कधी दाखवणार, अशा चाली – प्रतिचाली होत असतानाच करोनाची लाट आली. बत्राही भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदावरून दूर झाले आणि सगळेच बारगळले. प्रथम तिरंदाजी, त्यानंतर नेमबाजी… त्यापाठोपाठ कुस्ती, टेबल टेनिस, बॅडमिंटन अशी गळतीची माळच लागली आणि भारतीय ज्या खेळात आघाडीपासून खूप दूर आहेत असे बोल्स, सायकलींग. जिम्नॅस्टिक, थ्री बाय थ्री बास्केटबॉल या खेळांच्या स्पर्धा झाल्या.
महाराष्ट्राचा वाटा दोन पदकांचा
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र सातत्याने सर्वांगीण विजेता होत असेल; पण राज्याच्या खेळाडूंनी देशाच्या यशात मोलाचा वाटा उचलल्याचे क्वचितच दिसते. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रातील खेळाडूंनी दोन पदके जिंकली. त्यात दिलीप गावितचे सुवर्ण आणि सर्वेश कुशारेचे रौप्य. महाराष्ट्रापेक्षा जास्त पदके हरियाणा, मणिपूर, तमिळनाडूच्या खेळाडूंनी जिंकली. हरियाणाचा वाटा तर सात सुवर्ण, दोन रौप्य आणि दोन ब्राँझ इतका मोठा आहे. मणिपूरने एका सुवर्णपदकाबरोबरच एक रौप्य आणि दोन ब्राँझ जिंकली. सुवर्णपदके हरियाणा, मणिपूर आणि महाराष्ट्राबरोबरच बिहार, दिल्ली, त्रिपुरा आणि राजस्थानमधील खेळाडूंनी जिंकली.
लक्षवेधक यश
– ज्ञानेश्वरी यादवने ५३किलो गटात रौप्यपदक जिंकताना १९९ किलो वजन पेलले. ही तिची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी. हे करणारी ती यंदाया राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील एकमेव भारतीय वेटलिफ्टर.
– भारतीय बॉक्सरची सात सुवर्णांसह दहा पदके. एका राष्ट्रकुल क्रीडा बॉक्सिंग स्पर्धेतील भारताची सर्वोत्तम कामगिरी. भारतीय बॉक्सिंग संघात १४ जण होते.
– भारतीय वेटलिफ्टर्सची आठ पदके, गतस्पर्धेपेक्षा कमी.
– महिलांच्या थाळीफेकीत २१व्या शतकांत भारताची पाच पदके. त्यातील चार पदके सीमाची. सीमा पुनिया २००६ ते २०१८ आणि या वेळी सीमा कालिरमणा
– पाच क्रीडा प्रकारांत भारताचे दुहेरी यश. ते क्रीडा प्रकार पुरुष १०० मीटर (टी-४), पुरुष गोळाफेक (एफ-५७:, महिला गोळाफेक (एफ ५७), पुरुषांची भालाफेक आणि पुरुषांची तिहेरी उडी.
– ग्लासगोपूर्वी राष्ट्रकुल क्रीडा ज्यूदो स्पर्धेत भारताचे एकही सुवर्ण नव्हते, यंदा दोन सुवर्णपदके
– ॲथलेटिक्समधील तीन प्रकारांत भारताचे प्रथमच पदक. त्यात पाच हजार मीटर, दहा हजार मीटर (दोन्ही गुलवीर); तसेच डेकथलॉन (तेजस्विन शंकर)
– भारताच्या ३८ पदक विजेत्यांपैकी ३१ खेळाडूंनी प्रथमच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक जिंकले. याचबरोबर १२६ खेळाडूंची ३९ पदके, म्हणजेच ३१ टक्के यश
पदकामुळे मिळणाऱ्या बक्षिसासाठी
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे महत्त्व जागतिक क्रीडा स्पर्धांचा किंवा ऑलिम्पिकचा विचार केल्यास काहीही नाही. या स्पर्धेतील कामगिरी ना ऑलिम्पिकमधील प्रवेशास साह्य करते ना जागतिक स्पर्धेची पात्रता देण्यास. या स्पर्धेतील कामगिरी फार तर जागतिक मानांकन उंचावण्यास मदत करते. एक लक्षात घ्यायला हवे, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी संघ संबंधित देशांची राष्ट्रीय ऑलिम्पिक संघटना पाठवत नाही. प्रत्येक देशांत राष्ट्रीय राष्ट्रकुल क्रीडा संघटना असते. अगदी भारतातही आहे. त्यातील खेळांच्या संघटना या स्पर्धेसाठी पात्रता निकष निश्चित करतात आणि त्यानुसार संघनिवड होते. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा लक्षात घेऊन कोणत्याही खेळाच्या जागतिक किंवा आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात बदल होत नाही. उदाहरणच द्यायचे झाले तर २०१८च्या गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेपाठोपाठ वर्ल्ड कप नेमबाजी स्पर्धा सहा दिवसांत सुरू झाली. भारतीय खेळाडूंसह अनौपचारीक गप्पा मारल्यास या स्पर्धेचे त्यांच्यासाठी असलेले खरे महत्त्व लक्षात येते. आशियाई क्रीडा स्पर्धेतील अनेक खेळात आता ऑलिम्पिक दर्जाचीच स्पर्धा होते. नेमबाजी, तिरंदाजी, बॅडमिंटन, टेबल टेनिस या खेळात जागतिक; तसेच ऑलिम्पिक स्पर्धांत आशियाई देशांचे वर्चस्व आहे. त्यातुलनेत राष्ट्रकुलातील आव्हान सोपे आहे. त्यातील पदक, त्यामुळे होणाऱ्या बक्षिस रकमेचा उपयोग आशियाई, ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या पूर्वतयारीस होतो. त्यापेक्षाही या स्पर्धांतील पदक क्रीडा पुरस्काराच्या स्पर्धेत गुणही वाढवते ते वेगळेच.
