Headlines

Prithviraj Chavan Reaction on Congress Slams Sunetra Pawar


काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर खोचक टीका करण्यात आली आहे. काँग्रेसने सुनेत्रा पवार यांना गुंगी गुडिया असं म्हटलं आहे. या टीकेचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी समर्थन केलं आहे. त्यामुळे राज्यातलं राजकारण तापलं आहे. काँग्रेसच्या टीकेवर पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Prithviraj Chavan And Sunetra Pawar
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : काँग्रेस पक्षाकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर बोचरी टीका करण्यात आली आहे. काँग्रेसने सोशल मीडियावरील पोस्टमध्ये सुनेत्रा पवार यांना गुंगी गुडिया म्हटलं आहे. तसेच सुनेत्रा पवार यांनी गुंगी गुडिया नाही तर दुर्गा असल्याचं सिद्ध करावं, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले आहेत. त्यांच्या या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून सुनेत्रा पवार यांच्यावर करण्यात आलेल्या टीकेवर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी महाराष्ट्र काँग्रेसला सुनेत्रा पवार यांच्यावर केलेल्या टीकेवरुन घरचा आहेर दिला आहे.

पृथ्वीराज चव्हाण नेमकं काय म्हणाले?

“दिल्लीत आज सकाळी सामाजिक कार्यकर्त्या अंजलीताई दमानिया यांचा फोन आला, त्यांनी महाराष्ट्रच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत प्रदेश काँग्रेसच्या सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या ‘गुंगी गुडिया‘ या पोस्टबद्दल आक्षेप नोंदवला. मी त्यांना माहिती घेतो असे सांगितले”, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

पृथ्वीराज चव्हाणांचं परखड मत

“बीडमधील एका पत्रकार परिषदेमध्ये एका पत्रकाराने बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था या विषयावर पालकमंत्री सुनेत्रा पवार यांना प्रश्न विचारला असता त्यांनी काहीही उत्तर न देता पत्रकार परिषद गुंडाळली‌. त्या संदर्भात काँग्रेसच्या सोशल मीडियाची ती टिप्पणी होती, अर्थातच महिलांच्या बाबतीमध्ये असे उद्गार टाळता आले असते, मुळातच महिलांना राजकारणात नगण्य स्थान आहे, एखादी महिला जर राजकारणात सक्रिय काम करत असेल तर तिला प्रोत्साहन दिले पाहिजे”, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

“प्रश्न विचारायचा पत्रकारांचा अधिकार आहे आणि उत्तर न देण्याचा मंत्र्यांचा. पण त्यामुळे बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अनुत्तरीत राहते. त्याला मुख्यमंत्री/गृहमंत्री हे संपूर्णपणे जबाबदार आहेत, त्यांनीच उत्तर दिले पाहिजे”, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

‘सुनेत्रा पवारांबद्दल पातळी सोडून बोलणं योग्य नाही’

“पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पत्रकारांना कधीही उत्तर न देण्याची परंपरा गेली बारा वर्षे अत्यंत काळजीपूर्वक जोपासली आहे. त्यांचे महिलांच्या बद्दलचे उद्गार ‘५० करोड की गर्लफ्रेंड, काँग्रेस की विधवा, किंवा गुजरातच्या महिलांच्याबद्दलचे त्यांचे वक्तव्य जगजाहीर आहेत. पण काँग्रेसची वेगळी परंपरा आहे. काँग्रेसने नेहमीच देशात राजकारणाची पातळी सांभाळायचे काम केले आहे. अशा प्रकारचा शब्दप्रयोग स्वर्गीय राम मनोहर लोहिया यांनी इंदिरा गांधींच्या बाबत केला होता. पण इंदिराजींनी त्यांना कृतीने उत्तर दिले”, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

सुनेत्रा पवार या सक्रिय राजकारणात कार्यरत असून राज्याच्या एका घटनात्मक पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांच्याबद्दल बोलताना पातळी सोडून बोलणे योग्य नाही. अर्थातच त्यांच्याकडूनही कृतीने उत्तर मिळेल अशी अपेक्षा आहे”, अशी स्पष्ट भूमिका पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडली.

“या पोस्टशी माझा कोणताही संबंध नसताना माझ्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. कोणावरही आरोप करण्यापूर्वी करण्यापूर्वी कार्यकर्त्यांनी वस्तुस्थितीची संपूर्ण माहिती घेणे आवश्यक आहे”, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.