Abhishek Sharma News : आयपीएल आणि टी-२० क्रिकेटमध्ये आपल्या आक्रमक फलंदाजीने छाप पाडणाऱ्या अभिषेक शर्माला झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत मात्र मोठा धक्का बसला. मालिकेतील तिन्ही सामन्यांत त्याला एकाच गोलंदाजाने बाद केलं. मुझाराबानीने नेमका कोणता प्लॅन आखला?
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : आपल्या तुफान आणि आक्रमक बॅटिंगसाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिषेक शर्माकडून झिम्बाब्वे दौऱ्यावर भारतीय चाहत्यांना खूप मोठ्या अपेक्षा होत्या. या मालिकेत सुरुवातीला संजू सॅमसन टीममध्ये नसल्यामुळे भारताला फटकेबाजी करत चांगली सुरुवात करून देण्याची सर्व जबाबदारी अभिषेकवरच होती. पण या संपूर्ण मालिकेत अभिषेकला आपली छाप पाडता आली नाही. विशेष म्हणजे, या मालिकेतील तिन्ही सामन्यांमध्ये त्याला एकाच बॉलरने म्हणजे झिम्बाब्वेच्या ब्लेसिंग मुझाराबानीने आऊट केले. मुझाराबानीने अभिषेकविरुद्ध आखलेला प्लॅन एकदम हिट ठरला.
धडाकेबाज फॉर्मला लागला ब्रेक
गेल्या दीड-दोन वर्षांत अभिषेकने आपल्या धडाकेबाज बॅटिंगच्या जोरावर भारतीय टी-२० टीममध्ये स्वतःची जागा पक्की केली आहे. मोठे फटके मारताना अजिबात जास्त ताकद न लावता बॉल सहज बाउंड्रीपार पाठवणे ही त्याची सर्वात मोठी खासियत आहे. याच चांगल्या फॉर्ममुळे त्याने टीम इंडियात आपले स्थान निर्माण केले.
अभिषेकच्या याच वादळी फॉर्ममुळे टी-२० वर्ल्ड कपच्या वेळी टीम निवडीत यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल यांसारख्या मोठ्या खेळाडूंच्या जागेचे गणित बदलले होते. त्यामुळेच झिम्बाब्वेविरुद्धच्या या मालिकेत तो मोठी खेळी करेल, असे सर्वांना वाटत होते. पण मुझाराबानीच्या अचूक बॉलिंगसमोर त्याला धावा काढण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला.
पहिला सामना: मालिकेतील पहिल्या सामन्यात मुझाराबानीने टाकलेल्या उसळत्या बाऊन्स बॉलवर अभिषेकने मोठा शॉट मारायचा प्रयत्न केला. पण बॉल हवेत गेला आणि पॉईंटला उभ्या असलेल्या खेळाडूने सोपा कॅच घेतला. त्या वेळी तो अवघ्या १ धावेवर आऊट झाला.
दुसरा सामना: दुसऱ्या सामन्यातही मुझाराबानीने त्याला आऊट केले. ऑफ स्टम्पच्या रेषेवर टाकलेल्या बॉलवर मोठा शॉट मारण्याच्या नादात अभिषेकने बॅकवर्ड पॉईंटला सोपा कॅच दिला आणि तो ८ धावा करून आऊट झाला.
तिसरा सामना: आज सुरु तिसऱ्या सामन्यात मुझाराबानीने ऑफ स्टम्पच्या बऱ्याच बाहेर बॉल टाकला. अभिषेकने क्रीझ सोडून कव्हर्सच्या वरून बॉल मारायचा प्रयत्न केला, पण बॉल बॅटची कडा घेऊन थेट विकेटकीपरच्या हातात गेला. त्याला अवघ्या २ धावांवरच आऊट व्हावे लागले.
आयपीएलच्या सोप्या आणि सपाट खेळपट्ट्यांवर बॉलरची धुलाई करणाऱ्या अभिषेकला झिम्बाब्वेच्या पिचवर मात्र एका-एका धावेसाठी झगडावे लागले. २५ वर्षांच्या या खेळाडूने आतापर्यंत ५५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १८७.८७ च्या जबरदस्त स्ट्राइक रेटने १६२७ धावा केल्या आहेत. यामध्ये २ शतके आणि ११ अर्धशतकांचा समावेश आहे.
एवढा चांगला रेकॉर्ड पाठीशी असतानाही झिम्बाब्वेच्या मुझाराबानीने त्याच्यावर पूर्णपणे वर्चस्व गाजवले आणि तिन्ही सामन्यांत त्याला स्वस्तात आऊट केले. आता पुढच्या सामन्यांमध्ये या समस्येतून अभिषेक कसा मार्ग काढतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा