Headlines

18 वर्षांच्या अनाहत सिंहने रचला इतिहास! 15 वर्षांचा इजिप्तचा दबदबा मोडत जिंकले गोल्ड; पंतप्रधान मोदींकडून कौतुक


Anahat Singh News : भारताच्या अनाहत सिंहने वर्ल्ड ज्युनिअर स्क्वॅश इंडिव्हिज्युअल चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. ही स्पर्धा जिंकणारी ती पहिली भारतीय स्क्वॅश खेळाडू ठरली आहे.

Anahat Singh World Junior Squash Championship
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारताची १८ वर्षांची स्टार खेळाडू अनाहत सिंह हिने कॅनडातील ओंटारिओ येथे पार पडलेल्या ‘वर्ल्ड स्क्वॅश ज्युनिअर इंडिव्हिज्युअल चॅम्पियनशिप’मध्ये सुवर्णपदक (गोल्ड मेडल) जिंकून इतिहास रचला आहे. हे मानाचे विजेतेपद पटकावणारी ती पहिली भारतीय स्क्वॅश खेळाडू ठरली आहे. तिच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत तिचे कौतुक केले आहे.

पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

अनाहत सिंहचे अभिनंदन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिले की, “२०२६ च्या वर्ल्ड ज्युनिअर स्क्वॅश चॅम्पियनशिपमधील ही एक ऐतिहासिक कामगिरी आहे. अनाहत सिंहने सुवर्णपदक जिंकल्याचा आणि वर्ल्ड ज्युनिअर चॅम्पियनशिप जिंकणारी ती पहिली भारतीय स्क्वॅश खेळाडू ठरल्याचा संपूर्ण देशाला अभिमान आहे. तिच्या या यशामुळे तरुण मुलांमध्ये स्क्वॅश हा खेळ आणखी लोकप्रिय होईल.”

इजिप्तचा १५ वर्षांचा दबदबा मोडून काढला

जागतिक क्रमवारीत २० व्या क्रमांकावर असलेल्या अनाहत सिंहने महिलांच्या अंतिम सामन्यात इजिप्तच्या दुसऱ्या मानांकित रुकैया सलेम हिचा ११-३, ११-७, ११-९ असा एकतर्फी पराभव केला आणि आपल्या कारकिर्दीतील सर्वात मोठी ट्रॉफी जिंकली. या विजयासह अनाहतने २०११ पासून चालत आलेला इजिप्तच्या खेळाडूंचा १५ वर्षांचा एकछत्री प्रभाव संपवला आहे. २०१० नंतर ही ट्रॉफी जिंकणारी ती पहिली इजिप्त बाहेरील खेळाडू ठरली आहे.

असा होता फायनलपर्यंतचा प्रवास

गेल्या वर्षी या स्पर्धेत कांस्यपदक जिंकणाऱ्या अनाहतने यंदा उत्कृष्ट खेळ केला. शुक्रवारी झालेल्या उपांत्य सामन्यात तिने इजिप्तच्याच बारब सामेहचा पराभव करत तब्बल २१ वर्षांनंतर कोणत्याही भारतीय खेळाडूला फायनलमध्ये पोहोचवले होते. सेमीफायनलमधील विजयावर बोलताना अनाहतने म्हटले होते की, “वर्ल्ड ज्युनिअर स्पर्धेत अनेकदा आलेल्या अपयशानंतर फायनलमध्ये पोहोचणे आणि देशासाठी खेळणे हा माझ्यासाठी खूप मोठा आणि खास क्षण आहे.”

अनाहतच्या या ऐतिहासिक विजयामुळे संपूर्ण भारतीय क्रीडा जगतातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, आगामी काळातही तिच्याकडून अशाच धमाकेदार कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.