सावंतवाडी प्रतिनिधी : सावंतवाडी शहरातील नगरपालिका हद्दीतील जीर्ण व धोकादायक झाडांची तात्काळ पाहणी करून त्यांची छाटणी अथवा आवश्यकतेनुसार ती हटविण्यात यावीत, अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने केली. याबाबतचे निवेदन आज पालिकेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांना देण्यात आले.
यावेळी शिवसेना महिला जिल्हाप्रमुख ॲड. नीता सावंत-कविटकर, शर्वरी धारगळकर, स्नेहा नाईक, ॲड. सायली दुभाषी, शिवानी पाटकर, सुप्रिता धारगळकर आदी उपस्थित होत्या.
निवेदनात म्हटले आहे की, नगरपालिका हद्दीतील सार्वजनिक रस्त्यालगत अनेक झाडे जीर्ण व धोकादायक अवस्थेत उभी आहेत. नुकतीच जुना बाजार परिसरात पिंपळाच्या झाडाची फांदी तुटून डॉ. मसूरकर यांच्या घरावर पडल्याने मालमत्तेचे नुकसान झाले. तसेच, आत्मेश्वर मंदिरालगत आंब्याचे झाड कोसळून एका वाहनाचे नुकसान झाले.
या घटनांवरून धोकादायक झाडांमुळे नागरिकांच्या जीवितासह मालमत्तेलाही गंभीर धोका निर्माण झाला असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे सावंतवाडी शहराचा संपूर्ण सर्व्हे करून जीर्ण व धोकादायक झाडांची छाटणी करावी किंवा आवश्यकतेनुसार ती हटविण्यात यावीत, जेणेकरून भविष्यात कोणतीही जीवित अथवा वित्तहानी होणार नाही, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, महाराष्ट्र (शहरी क्षेत्र) वृक्ष संरक्षण व जतन अधिनियम, १९७५ नुसार वृक्षांचे संरक्षण, देखभाल तसेच धोकादायक झाडांची आवश्यक छाटणी किंवा त्यांचे निर्मूलन करण्याची जबाबदारी वृक्ष प्राधिकरण व नगरपालिकेवर आहे. त्यामुळे या प्रकरणी तातडीने योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली.
