Headlines

5 लाखांपेक्षा जास्त आकाशगंगा, 50 हजार तारे एकाच फोटोत कैद, 3.2 अब्ज पिक्सेल कॅमेऱ्याचा चमत्कार। Maharashtra Times


चिली येथील रुबिन ऑब्झर्व्हेटरीने 3.2 अब्ज पिक्सेलच्या जगातील सर्वात मोठ्या डिजिटल कॅमेऱ्याच्या साहाय्याने अंतराळ विज्ञानात नवा इतिहास रचला आहे. या कॅमेऱ्याने एकाच फोटोमध्ये 5 लाखांहून अधिक आकाशगंगा (गॅलेक्सी) आणि 50 हजारांपेक्षा जास्त तारे अचूकपणे टिपले आहेत. या ऐतिहासिक आणि सर्वात स्पष्ट फोटोमुळे जगभरातील वैज्ञानिक कमालीचे थक्क झाले आहेत. चला तर मग जाणून घेऊया.

Deep View Galaxies Stars। Maharashtra Times
सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म (आधीचे ट्विटर)
ब्रह्मांड किती अथांग आहे याची झलक दाखवणारा एक अद्भुत फोटो शास्त्रज्ञांनी प्रसिद्ध केला आहे. या एकाच फोटोत अर्ध्याहून अधिक विश्वाचा विहंगम नजराणा पाहायला मिळत आहे. अंतराळाचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि स्पष्ट डिजिटल फोटो असून, यामुळे भविष्यातील अंतराळ संशोधनाला आणि विश्वाची रहस्ये उलगडण्यास कमालीची मोठी मदत होणार आहे. यासंदर्भातलं वृत्त ‘The Times of India’ ने (REF.) दिलं आहे.

3.2 अब्ज पिक्सेलच्या जगातील सर्वात मोठ्या डिजिटल कॅमेऱ्याने 5 लाखांहून अधिक आकाशगंगा आणि 50 हजार तारे एकाच फोटोमध्ये टिपून अंतराळ विज्ञानात एक नवा इतिहास रचला आहे. चिली येथील Vera C. Rubin Observatory या कॅमेऱ्याच्या साहाय्याने ब्रह्मांडचा आतापर्यंतचा सर्वात स्पष्ट आणि सखोल फोटो जाहीर केला आहे.

आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांच्या रिपोर्टनुसार, या फोटोंमुळे अंतराळातील अनेक रहस्ये उलगडण्यास मदत होणार आहे.

3.2 अब्ज पिक्सेलचा चमत्कार आणि ‘COSMOS’ क्षेत्र

‘The Times of India’ च्या (REF.) वृत्तानुसार, रुबीन ऑब्झर्व्हेटरीमधील 8.4 मीटर सिम्योनी सर्वे टेलिस्कोपवर 3.2-गीगापिक्सेलचा (LSST) कॅमेरा बसवण्यात आला आहे. शास्त्रज्ञांनी अंतराळातील सर्वात जास्त अभ्यासल्या गेलेल्या ‘COSMOS’ नावाच्या क्षेत्रावर हा कॅमेरा केंद्रित केला होता.

हा फोटो केवळ एका क्लिकमध्ये काढलेला नसून, शेकडो वैयक्तिक फोटो एकावर एक थर देऊन अत्यंत हुशारीने तयार करण्यात आला आहे. यामुळे अत्यंत दूरवर असलेल्या आकाशगंगांचा अंधुक प्रकाशही या फोटोमध्ये स्पष्टपणे दृश्यमान झाला आहे.

एकाच फ्रेममध्ये गॅलेक्सी आणि ताऱ्यांचा मेळावा

या एकाच फ्रेममध्ये अंतराळातील विविध प्रकारच्या आकाशगंगा पाहायला मिळत आहेत. यात नाजूक हात असलेल्या सर्पिलाकार (Spiral) गॅलेक्सी, गुळगुळीत लंबगोळाकार (Elliptical) गॅलेक्सी आणि एकमेकांवर आदळणाऱ्या (Colliding) गॅलेक्सींचा समावेश आहे.

याशिवाय, सुरुवातीच्या विश्वातील अत्यंत दूर असलेल्या लाल रंगाच्या आकाशगंगा आणि आपल्या आकाशगंगेतील (Milky Way) सुमारे 50,000 चमकणारे तारे अग्रभागी स्पष्ट दिसत आहेत.

10 वर्षांचा ‘कॉस्मिक मूव्ही’ प्रोजेक्ट

‘CNN’ च्या जुन्या रिपोर्टनुसार, चिलीमधील 8,800 फूट उंच असलेल्या ‘सेरो पाशॉन’ डोंगरावर ही अब्जावधी रुपयांची वेरा रुबीन ऑब्झर्व्हेटरी उभारण्यात आली आहे. ही वेधशाळा ‘लिगेसी सर्वे ऑफ स्पेस अँड टाईम’ (LSST) या 10 वर्षांच्या महाकाय प्रकल्पावर काम करत आहे.

हा कॅमेरा पुढील 10 वर्ष रोज रात्री तब्बल 700 सुपर हाय-डेफिनिशन फोटो काढणार आहे. याद्वारे विश्वाचा सतत अपडेट होणारा एक जिवंत आणि गतिमान टाईम-लॅप्स चित्रपट तयार केला जाईल.

डार्क मॅटरचे रहस्य उलगडणार

रुबीन ऑब्झर्व्हेटरीचे संचालक बॉब ब्लम यांनी SLAC नॅशनल ॲक्सिलेटर लॅबोरेटरी च्या प्रकाशनात सांगितले की, हा ऐतिहासिक फोटो म्हणजे केवळ एक सुरुवात आहे. पुढील काळात या क्षेत्रामध्ये सातत्याने होणाऱ्या बदलांमुळे शास्त्रज्ञांना सुपरनोव्हा (तारे फुटणे) सारख्या क्षणभंगुर खगोलीय घटनांचा थेट अभ्यास करता येईल. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश विश्वातील सर्वात मोठे रहस्य असलेल्या ‘डार्क मॅटर’ आणि ‘डार्क एनर्जी’चा शोध घेणे, लघुग्रह ट्रॅक करणे आणि आकाशगंगेचा नकाशा तयार करणे हा आहे.

शुभम कुलकर्णी

लेखकाबद्दलशुभम कुलकर्णीशुभम कुलकर्णी जवळपास 6 वर्षांपासून मराठी माध्यमांमध्ये काम करतोय. आकाशवाणी (छत्रपती संभाजीनगर) पासून माध्यम क्षेत्रात कामाला सुरुवात केली. एका मुखपत्रासह मुंबईतील नामांकित मराठी वृत्तवाहिन्यांमध्ये ‘बुलेटिन प्रोड्यूसर’ म्हणून जबाबदारी सांभाळली. शुभमला राजधानी दिल्लीतही बातमीवर संस्कार करण्याची संधी मिळाली. राजकारण, व्यापार-उद्योग, क्रीडा, तंत्रज्ञान, ऑटो या विषयावर लिहायला त्याला आवडतं. निसर्गाच्या सानिध्यात बसायला, फावल्या वेळेत चित्रपट, वेब सिरीज पाहाण्याचा शुभमचा छंद आहे.आणखी वाचा