![]()
राज्यातील खासगी दुचाकी किंवा चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असे लिहिणाऱ्यांवर किंवा तशी लाल पाटी लावून फिरणाऱ्यांवर लवकरच कडक कारवाई होणार आहे. वाहतूक विभागाचे अप्पर पोलिस महासंचालक कार्यालयाने यासंदर्भात गांभीर्याने दखल घेतली असून, राज्यातील सर्व पोलीस आयुक्त आणि पोलिस अधीक्षकांना तातडीने कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या खासगी वाहनांवर अशी पाटी लावण्यावर थेट निर्बंध येणार आहेत. अवैध वाहतूक आणि गैरवापराची भीती पोलिस अधिकारी आणि अंमलदार बऱ्याचदा त्यांच्या खासगी वाहनांवर लाल रंगाची ‘पोलिस’ पाटी लावतात. अशा वाहनांवर पोलिसांची पाटी असल्याने तपासणी नाक्यांवर त्यांची फारशी चौकशी किंवा तपासणी केली जात नाही. याच गोष्टीचा गैरफायदा घेत अनेकदा भाडेतत्त्वावर या गाड्यांचा वापर अवैध वस्तूंच्या वाहतुकीसाठी केला जाण्याची दाट शक्यता असते. तसेच, यातून समाजात दहशत निर्माण होण्याची व चुकीच्या कामांना खतपाणी मिळण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाची तीव्र नाराजी खासगी वाहनांवर सर्रासपणे ‘पोलिस’ असे लिहून फिरण्याच्या या वाढत्या प्रकारावर मुंबई उच्च न्यायालयानेही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. न्यायालयाने या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालत, अशा प्रकारे बेकायदेशीररीत्या पाट्या लावून फिरणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. न्यायालयाच्या याच ठाम भूमिकेमुळे आता पोलिस प्रशासनाने या कारवाईला वेग दिला असून नियम कडक केले आहेत. मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रातून कारवाईला गती या संदर्भात सखाराम कुलकर्णी यांनी 27 जून 2026 रोजी राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना एक सविस्तर पत्र पाठवून या गंभीर प्रकाराकडे लक्ष वेधले होते. या पत्राची दखल घेत 28 जुलै 2026 रोजी पोलिस महासंचालक कार्यालयाकडून अप्पर पोलिस महासंचालक (वाहतूक) कार्यालयाला पुढील कारवाईसाठी ईमेल प्राप्त झाला. त्यानुसार आता राज्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना कारवाईचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. मोटार वाहन कायद्यांतर्गत होणार कारवाई प्राप्त झालेल्या आदेशांनुसार, सर्व पोलिस अधीक्षकांनी आपापल्या कार्यक्षेत्रात अशी ‘पोलिस’ पाटी किंवा लाल अक्षरात पोलिस नाव लिहिलेली खासगी वाहने आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशा कडक सूचना देण्यात आल्या आहेत. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 चे कलम 133 (6) आणि मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 177 अन्वये दंडात्मक व कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
Source link
खासगी वाहनांवर 'पोलिस' पाटी लावणे भोवणार!:राज्यभर कडक कारवाईचे आदेश, अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी कठोर पाऊल
