Headlines

वेतोरे येथे २२ वर्षीय युवकाचा मृत्यू; आत्महत्येची पोलिसांत नोंद; हॉटेल मॅनेजमेंटच्या अंतिम वर्षात शिक्षण; घटनेमागचे कारण अद्याप अस्पष्ट


वेंगुर्ले / प्रतिनिधी : वेंगुर्ले तालुक्यातील वेतोरे-वरचीवाडी येथे २२ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवार, २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी उघडकीस आली. राज गोविंद नाईक (२२) असे मृत युवकाचे नाव आहे. या घटनेमुळे वेतोरे गावावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज नाईक हा आपल्या आई-वडिलांसोबत राहत होता. त्याचे वडील शेती करतात, तर आई कणकवली न्यायालयात नोकरीस आहेत. राज हा मुळदे येथील हॉटेल मॅनेजमेंट महाविद्यालयात अंतिम वर्षाचे शिक्षण घेत होता.

बुधवारी राजची आई नेहमीप्रमाणे कामासाठी गेली होती. सायंकाळी सुमारे ४ वाजता त्याचे वडील गुरांसाठी चारा आणण्यासाठी घराबाहेर गेले होते. सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ते घरी परतल्यानंतर घरातील हॉलमध्ये राज मृतावस्थेत आढळून आला.

घटनेची माहिती मिळताच शेजारील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. या प्रकरणी वेंगुर्ले पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

राज हा वेतोरे येथील गोविंद उर्फ दीपक नाईक यांचा एकुलता एक मुलगा होता. मनमिळाऊ स्वभावाच्या राजच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे कुटुंबीय, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या मृत्यूमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत