मालवण / प्रतिनिधी : वेंगुर्ला-मालवण महामार्गावरील केळुस तिठा येथे गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक तसेच साठवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तिघांना ओरोस येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने प्रत्येकी 50 हजार रुपयांच्या सशर्त जामिनावर मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत.
रामचंद्र विश्राम लुडबे (वय 32, रा. वायरी-लुडबेवाडी, मालवण), प्रफुल दयाळ लुडबे (वय 38, रा. वायरी-लुडबेवाडी, मालवण) आणि संजय लक्ष्मण गोलतकर (वय 56 , रा. भरड, मालवण) अशी जामीन मंजूर झालेल्या संशयितांची नावे आहेत. संशयितांतर्फे ॲड. स्वरुप नारायण पई व ॲड. यतिश खानोलकर यांनी काम पाहिले.
दि.8 ऑगस्ट 2026 रोजी निवती पोलिसांकडून महामार्गावर तपासणी सुरू असताना केळुस तिठा येथे एका चारचाकी वाहनातून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक होत असल्याचे आढळून आले. याप्रकरणी रामचंद्र लुडबे व प्रफुल लुडबे यांच्याविरुद्ध निवती पोलीस ठाण्यात दि. 9ऑगस्ट रोजी भारतीय न्याय संहिता कलम123, 223, 271, 275 तसेच अन्नसुरक्षा व मानके कायद्यातील कलम 59 अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.
दोन्ही संशयितांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, वेंगुर्ला यांच्यासमोर हजर करण्यात आले. सुरुवातीला त्यांना पोलीस कोठडी, त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
तपासादरम्यान गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री मालवण येथील एका व्यक्तीस केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी संजय गोलतकर यांच्या भरड येथील ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत प्रतिबंधित माल आढळून आल्याने गोलतकर यांना दि. 12ऑगस्ट 2036 रोजी अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
न्यायालयीन कोठडी झाल्यानंतर तिन्ही संशयितांच्या वतीने ओरोस येथील जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्यात आला. सुनावणीनंतर न्यायालयाने तिघांनाही प्रत्येकी 50 हजार रुपयांच्या सशर्त जामिनावर मुक्त करण्याचे आदेश दिले.
जामिनाच्या अटींनुसार संशयितांनी भविष्यात अशा प्रकारचा गुन्हा करू नये, तपासात कोणत्याही प्रकारे ढवळाढवळ करू नये, साक्षीदारांवर दबाव आणू नये तसेच तपासासाठी आवश्यकतेनुसार पोलीस ठाण्यात हजेरी लावावी, अशा अटी न्यायालयाने घातल्या आहेत.
