Nagpur News: नेपाळमध्ये भीषण महापूराची घटना घडली. यावेळी नेपाळमध्ये पर्यटनासाठी नागपूरातील १०६ नागरिक गेले होते. ते सुखरूप असून त्यांना परत आणण्यासाठी राज्य सरकारकडून हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
म.टा.प्रतिनिधी,नागपूर:नेपाळमध्ये पर्यटनासाठी गेलेले नागपुरातील १०६ नागरिक सुखरूप असून त्यांना परत आणण्यासाठी राज्य सरकारकडून हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेपाळचे खासदार संदीप राणा यांच्याशी संवाद साधून पर्यटकांच्या परतीसाठी व्यवस्था करण्याबाबत चर्चा केली. या नागरिकांसाठी चार मिनी बसची व्यवस्था करण्यात आली असून शुक्रवारी ते बिहारमधील जनकपूर सीमेवर पोहोचतील, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
महापुरामुळे मोठी जीवित व वित्तहानी झाली
तिबेटलगतच्या मध्य नेपाळमधील दोन जिल्ह्यांत बुधवारी पहाटे आलेल्या महापुरामुळे मोठी जीवित व वित्तहानी झाली. नदीकाठच्या वस्त्यांचे मोठे नुकसान झाले. याच काळात नागपुरातील १०६ पर्यटक श्री स्वामी महाराज यांच्या समूहासोबत नेपाळमध्ये होते. हे सर्वजण २२ ऑगस्ट रोजी काठमांडू येथे पर्यटनासाठी गेले होते. त्यांनी धार्मिक स्थळांनाही भेटी दिल्या.
मात्र, महापुराची माहिती मिळताच त्यांनी परतीचा प्रवास सुरू करण्याचा निर्णय घेतला. सध्या हे सर्व नागरिक काठमांडू येथील माहेश्वरी समाज भवनात सुरक्षित आहेत. नेपाळ प्रशासनाकडून आवश्यक मदत मिळत असून सहकार्य केले जात असल्याचे पर्यटकांनी सांगितले. महाराष्ट्र शासनाच्या मध्यस्थीने परतीची व्यवस्था झाल्याने पर्यटकांनी समाधान व्यक्त केले. जनकपूर सीमेवरून पुढे दानापूरपर्यंत बसने आणि त्यानंतर रेल्वेने त्यांना नागपुरात आणण्याचे नियोजन असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
‘मी आठ वर्षे नेपाळ येथे एका कंपनीत काम केले. तिथे मित्रही बनले. काही कार्यालयीन कामानिमित्त १३ ऑगस्ट रोजी मी नेपाळ येथील बुटवॉल येथे गेलो. तेव्हा नेपाळमद्ये आल्हाददायी वातावरण होते. सर्वत्र शांतता होती. जगाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यांतून आलेले पर्यटक निसर्ग सौंदर्याचा आनंद घेत होते. निसर्गाने नेपाळला भरभरून दिले. मीही हा निसर्ग अनुभवला. त्यानंतर परतीचा प्रवास धरला आणि २५ ऑगस्टला घरी परतलो. दुसऱ्याच दिवशी नेपाळमध्ये महापूर आल्याची बातमी वाचली. धक्काच बसला. यात अनेकांना प्राण गमवावे लागले. लवकर नेपाळची परिस्थीती चांगली व्हावी, अशी प्रार्थना देवाकडे केली आहे’, अशी भावना विदर्भातील अक्षय कान्हेरकर यांनी ‘मटा’शी बोलताना व्यक्त केली.
लेखकाबद्दलकांचन परुळेकरकांचन परुळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कन्सलटंट पदावर कार्यरत आहेत. कांचन स्थानिक बातम्या, पायाभूत सुविधा, बांधकाम आणि विकास प्रकल्प यासाठी लिखाण करतात. त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात ही महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमधून झाली. मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या व्हिडिओ विभागात त्यांनी इंटर्न म्हणून काम केले. सुरुवातीला त्यांनी युट्यूब, फेसबुक आणि इन्स्टाग्रामसाठी कन्टेंट तयार करताना व्हिडिओ आणि लेख लिहिले आहेत. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या आणि क्राइमसह स्पोर्ट्सवर इत्यादी विषयांचे वाचन आणि लेखन करण्याची त्यांना विशेष आवड आहे.
कांचन यांचे संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून झाले असून पत्रकारितेची आवड असल्याने त्यांनी कोकण ते मुंबई असा शैक्षणिक प्रवास केला. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण गावी पूर्ण केले. इकोनॉमिक्स या विषयातून पद्वी घेतली. लिखाणाची आवड, संवाद साधण्याचे कौशल्य आणि पत्रकारितेची आवड समजून घेऊन साठ्ये कॉलेज विलेपार्ले येथे वृत्तपत्रविद्या आणि संवाद या विषयात त्यांनी पद्व्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला.
महाविद्यालयीन काळात कला आणि नाटक विषयात विशेष आवड असल्याने त्यांनी अभिनयदेखील केले आहे. काही नाटक त्यांनी लिहिले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या युथ फेस्टिवलमध्ये त्यांना अभिनयासाठी ब्रॉन्झ आणि सिल्व्हर मेडल देण्यात आले आहेत. कविता आणि लेख लिहिण्याची आवड असल्याने शाळा ,कॉलेज मासिक अंकात त्यांचे लेख देखील प्रसिध्द झाले आहेत.
२०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन सोबत जोडल्या गेल्यानंतर त्यांची पत्रकारितेची आवड अगदी स्पष्ट झाली. बोलण्यातला स्पष्टपणा लिखाणातली पारदर्शकता अधिक नव्याने समजत गेली. तीन महिन्यांच्या इंटर्नशिप नंतर त्या आता कन्सलटंट पदावर म.टा. समुहात सहभागी झाल्या आहेत. पारदर्शकता आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम त्या करत आहेत.… आणखी वाचा