Wadala to Kasarvadavli Metro: मुंबई आणि ठाण्याला जोडणाऱ्या मेट्रोसाठी कारशेडचा मार्ग मोकळा झाला आहे. मेट्रो लाइन ४ वर ३२ तर ४अ वर २ स्थानकं आहेत. कासारवडवली ते गायमुखपर्यंत मेट्रो ४अ चा विस्तार केला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई: वडाळा- मुलुंड- ठाणे- कासारवडवली- गायमुख मेट्रो-४ आणि ४ए मार्गासाठी मोघरपाडा येथील कार डेपोला जोडणारा रस्ता व जोड मार्गिका (स्पर लाईन) बांधण्यासाठी आवश्यक ०.३९ हेक्टर खारफुटी वनक्षेत्र एमएमआरडीएकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय महसूल व वन विभागाने घेतला आहे. या प्रस्तावाला केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाच्या नागपूर प्रादेशिक कार्यालयाकडून यापूर्वी तत्त्वतः मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर आवश्यक अटींची पूर्तता झाल्याचा अहवाल सादर केल्यानंतर अंतिम मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे मेट्रो कारशेडकडे ये-जा करण्यासाठी आवश्यक रस्त्याच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे.
भूसंपादन प्रक्रिया पूर्ण
ठाणे मेट्रो प्रकल्पासाठी मोघरपाडा येथे मेट्रो कारशेड उभारण्यासाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या कार डेपोपर्यंत पोहोचण्यासाठी ६५ मीटर लांबीचा अ ॅप्रोच रोड, जोड मार्गिका तसेच, संबंधित बांधकाम विकसित केले जाईल. ही जमीन एमएमआरडीएच्या माध्यमातून वापरण्यात येणार असून तिचे हस्तांतरण आवश्यक होते. मात्र, या परिसरात कांदळवन असल्याने वनविभागाकडूनच ही जमीन हस्तांतरित करावी लागली. केंद्र सरकारकडून मिळालेल्या तत्त्वतः आणि अंतिम मंजुरीतील सर्व अटींचे पालन करण्याच्या तसेच खारफुटी कक्षाकडून नियमित देखरेख ठेवण्याच्या अटीवर हे हस्तांतरण झाले.
मुंबईला ठाणे शहराशी जोडणारी मेट्रो मार्गिका ४ ३२.३२ किमी लांब आहे. ग्रीन लाइनमुळे शहरातील पूर्वीतील उपनगरांना जोडणी मिळणार आहे. वडाळा ते कासारवडवलीपर्यंत जोडणाऱ्या या मार्गिकेमुळे एलबीएल मार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्गावरील वाहतूककोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. कासारवडवलीपासून गायमुखपर्यंत मेट्रो मार्गिका ४अ तयार केली असेल. मेट्रो मार्ग ४ अ काम पूर्ण होत आलं असून ४ ब चं बांधकाम सुरू होणार आहे. ऑगस्ट २०२६ पर्यंत हा मार्ग खुला होण्याची शक्यता आहे. गायमुखपर्यंत मार्ग २०२९ /२०३० पर्यंत प्रवासासाठी खुला होण्याची शक्यता आहे.
मेट्रो मार्गिका ४ वर एकूण ३२ स्थानकं आहेत. भक्ती पार्क मेट्रो, वडाळा टीटी, अनिकनगर बस डेपो, समुन नगर, सिद्धार्थ कॉलनी, अमर महाल जंक्शन, गरोदिया नगर, पंत नगर, लक्ष्मी नगर, श्रेयस सिनेमा, गोद्रेज कंपनी, विक्रोळी मेट्रो, सूर्य नगर,गांधी नगर, नॅवल हाऊसिंग, कांजुरमार्ग पश्चिम, भांडुप पश्चिम, शंग्रिला, सोनापूर, मुलुंड अग्निशमन केंद्र, मुलुंड नाका, तीन हात नाका, ठाणे आरटीओ, महापालिका मार्ग, कॅडबरी जंक्शन, माजिवाडा, कापुरबावडी, मानपाडा, टिकूजी-नी-वाडी, डोंगरीपाडा, कासारवडवली या स्थानकांचा समावेश आहे. मेट्रो मार्ग ४ अ वर गोवणीवाडा आणि गायमुख हे दोन स्थानकं असतील.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा