लीज संपल्याने खाली केली जागा
त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव
न्यायालयाच्या आदेशानुसार बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डने अखेर रेल्वेस्टेशनसमोरील जागा खाली केली. मागील अनेक वर्षांपासून संबंधित स्वीटमार्ट चालक व कॅन्टोन्मेंटमध्ये लीजवरून वाद होता. यामुळे न्यायालयातही दाद मागण्यात आली होती. अखेर बुधवारी सकाळी अचानक कॅन्टोन्मेंटच्या कर्मचाऱ्यांनी धडक कारवाई करीत स्वीटमार्टमधील साहित्य बाहेर काढले. तसेच शटरवर नोटीसही चिकटवण्यात आली.
बेळगाव रेल्वेस्थानकाच्या समोरील बाजूस प्रसाद स्वीट मार्ट नावाने मागील अनेक वर्षांपासून एक स्वीटमार्ट होते. 2014 पर्यंत कॅन्टोन्मेंटकडून त्यांना लीजवर जागा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यानंतर मात्र कॅन्टोन्मेंटने नव्या टेंडरनुसार नवीन भाडेकरू ठेवण्याचा प्रस्ताव मांडला. परंतु जुना भाडेकरू न्यायालयात गेल्याने मागील अनेक वर्षांपासून हे प्रकरण न्यायप्रविष्ठ होते.
न्यायालयाच्या निर्देशानुसार बुधवारी सकाळी कॅन्टोन्मेंटच्या कर्मचाऱ्यांनी स्वीटमार्टमधील सर्व साहित्य बाहेर काढण्यास सांगितले. यापूर्वी अनेकवेळा नोटिसा देऊनदेखील जागा खाली करण्यात आली नसल्याने अखेर ही कारवाई करण्यात आली. यावेळी कॅन्टोन्मेंटचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. अखेर शटरवर कॅन्टोन्मेंटची नोटीस लावून सीईओंच्या सूचनेने ही कारवाई करण्यात आल्याचे नोटिसीत स्पष्ट करण्यात आले आहे.
