Taarini Serial : ‘तारिणी’ मालिकेत नवीन ट्विस्ट येणार असून मालिकेत ज्येष्ठ अभिनेत्याची एन्ट्री होणार आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – मराठी मालिकाविश्वात सध्या ‘ तारिणी ’ या मालिकेची चांगलीच चर्चा आहे. मालिकेला नुकतंच एक वर्ष पूर्ण झालं असून, आता स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं मालिकेत नवीन ट्विस्ट येणार आहे. येत्या १५ ऑगस्टपासून तारिणीसमोर एक मोठी जबाबदारी उभी राहणार असून, या नव्या मिशनचं नाव ‘ऑपरेशन तिरंगा’ असं असणार आहे. तसेच मालिकेमध्ये ज्येष्ठ अभिनेत्याची एन्ट्री होणार आहे.
आतापर्यंत तारिणीनं अंडरकव्हर कॉपच्या भूमिकेत अनेक प्रकरणं सोडवली आहेत. गुन्हेगारांचा शोध घेण्यापासून ते सामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून, तारिणीनं प्रत्येक वेळी आपलं धाडस आणि बुद्धिमत्ता दाखवली आहे. अपहरणाचं प्रकरण, बनावट पनीरच्या घोटाळ्याचा पर्दाफाश किंवा कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सुरू असलेली अमली पदार्थांची तस्करी, प्रत्येक प्रकरणात तारिणीनं आव्हान स्वीकारत सत्य समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. तिच्यासाठी न्याय आणि नागरिकांची सुरक्षा हे नेहमीच महत्वाची असते. विशेष म्हणजे, आपल्या कर्तव्याबरोबरच तारिणीनं वैयक्तिक आयुष्याचाही समतोल साधला आहे. मात्र, आता तारिणीसमोर मोठं आव्हान असणार आहे. देशाच्या सुरक्षेशी संबंधित एका महत्त्वाच्या मोहिमेची जबाबदारी तिच्यावर सोपवण्यात आली आहे. ‘ऑपरेशन तिरंगा’ नेमकं काय आहे? या मोहिमेमागे कोणतं रहस्य दडलं आहे? तारिणीला कोणत्या संकटाचा सामना करावा लागणार? या प्रश्नांची उत्तरं आगामी भागांमध्ये मिळणार आहेत.
या नव्या वळणामुळे मालिकेत ज्येष्ठ अभिनेते उदय टिकेकर यांची एन्ट्री होणार आहे. ‘झी मराठी’नं शेअर केलेल्या ‘तारिणी’ मालिकेच्या प्रोमोमध्ये तारिणी तिचं व्रत पूर्ण करण्यासाठी निघालेली असताना काही माणसं तिला किडनॅप करतात. त्यानंतर तारिणीच्या समोर उदय टिकेकर बसलेले दिसतात. ते तारिणीला म्हणतात, ‘फार कमी लोकांना देशासाठी शहीद होण्याची संधी येते. ‘ऑपरेशन तिरंगा’साठी तू तयार आहेस?’ त्यावर तारिणी लगेच होकार देते.दरम्यान, ‘तारिणी’ मालिकेत उदय टिकेकरांची भूमिका नेमकी काय असेल, याबाबत सध्या गूढ कायम ठेवण्यात आलं आहे. ‘ऑपरेशन तिरंगा’मुळे तारिणीच्या आयुष्यातील हा नवा अध्याय अधिक थरारक होणार असल्याचं दिसत आहे. ही मोहीम तारिणी एकटी पार पाडणार की, तिच्यासोबत आणखी काही खास व्यक्ती असणार, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे.
Onkar Raut Celebrity Corner : टाइमपास ते महाराष्ट्राची हास्यजत्रा…ओंकार राऊतसोबत खास गप्पा
स्वातंत्र्यदिन विशेष आठवड्यात या नव्या मिशनची सुरुवात आणि त्यामागचं रहस्य उलगडणार आहे. त्यामुळे ‘तारिणी’च्या आगामी भागांमध्ये प्रेक्षकांना नेमका कोणता थरार पाहायला मिळतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा