How to care for jasmine plant to induce blooming : मोगरा हे भारतीय घरांमध्ये आवर्जून लावले जाणारे सुगंधी फुलझाड आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत मोगऱ्याच्या पांढऱ्याशुभ्र फुलांचा दरवळ संपूर्ण वातावरण प्रसन्न करून टाकतो. अनेकजण बाल्कनी, टेरेस किंवा घराच्या बागेत मोगऱ्याची लागवड करतात. मात्र अनेकदा अशी तक्रार ऐकायला मिळते की झाडाला भरपूर पाने येतात, वाढ चांगली होते, पण फुले मात्र येत नाहीत. अशा वेळी योग्य काळजी आणि काही घरगुती उपाय केल्यास मोगऱ्याला भरपूर फुलांचा बहर येऊ शकतो.

मोगऱ्याला भरपूर फुले यावीत यासाठी झाडाला दररोज किमान चार ते सहा तास सूर्यप्रकाश मिळणे आवश्यक असते. तसेच माती भुसभुशीत आणि पाण्याचा योग्य निचरा होणारी असावी. झाडाच्या मुळांपर्यंत पुरेसा ऑक्सिजन पोहोचला तर त्याची वाढ जोमदार होते आणि नवीन कळ्या तयार होण्यास मदत होते.सेंद्रिय खतांचा वापर केल्यास झाडाला फुलधारणा वाढते.योग्य काळजीबरोबरच काही सोपे घरगुती उपाय देखील मोगऱ्याच्या बहरासाठी प्रभावी ठरतात. हळद, मेथी दाण्यांची पावडर आणि निमखली यांसारख्या नैसर्गिक घटकांमुळे मातीची सुपीकता वाढते, मुळांचे आरोग्य सुधारते आणि झाडाची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. त्यामुळे मोगऱ्याचे झाड निरोगी राहून अधिक प्रमाणात फुलांची निर्मिती करते. (फोटो सौजन्य :- @iStock)
मोगऱ्याला फुले का येत नाहीत?
मोगऱ्याला फुले न येण्यामागे अनेक कारणे असू शकतात. जास्त पाणी देणे, सूर्यप्रकाशाची कमतरता, माती घट्ट होणे, आवश्यक पोषक घटकांचा अभाव किंवा मुळांभोवती बुरशीजन्य संसर्ग होणे ही काही प्रमुख कारणे आहेत. त्यामुळे सर्वप्रथम झाडाच्या वाढीचे निरीक्षण करून त्याची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.
माती सौल करणे आवश्याक
हिवाळ्याच्या दिवसांमध्ये मोगऱ्याच्या कुंडीतील माती अनेकदा घट्ट होते. वरून माती कोरडी दिसत असली तरी आतमध्ये ओलावा टिकून राहतो. अशा वेळी माती हलक्या हाताने सैल करणे गरजेचे असते. यामुळे मुळांपर्यंत हवा पोहोचते आणि त्यांची वाढ चांगली होते.माती सैल करताना मुळांना इजा होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी. फक्त वरचा घट्ट थर हलका करून माती भुसभुशीत करावी. यामुळे झाडाची वाढ सुधारते आणि फुलधारणेसाठी योग्य वातावरण तयार होते.
पाण्याचे योग्य व्यवस्थापन
मोगऱ्याला फुले यावीत यासाठी पाणी देण्याचे प्रमाण योग्य असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. विशेषतः थंड वातावरणात वारंवार पाणी देऊ नये. जास्त पाण्यामुळे मातीमध्ये ओलावा वाढतो आणि बुरशीजन्य रोग होण्याची शक्यता निर्माण होते. माती थोडी कोरडी झाल्यानंतरच पाणी द्यावे. पाण्याचा अतिरेक टाळल्यास मुळांची वाढ चांगली होते आणि झाड अधिक जोमाने फुलते.
पुरेसा सूर्यप्रकाश द्या
मोगऱ्याला सूर्यप्रकाश खूप आवडतो. दिवसातून किमान दोन ते तीन तास तरी थेट सूर्यप्रकाश मिळणे आवश्यक आहे. ज्या ठिकाणी पुरेसा प्रकाश मिळत नाही, तेथे झाडाची वाढ होते; परंतु फुलधारणा कमी होते.म्हणून कुंडी अशा जागी ठेवावी जिथे सकाळचे ऊन मिळेल. सूर्यप्रकाशामुळे झाडाला आवश्यक ऊर्जा मिळते आणि नवीन कळ्या तयार होण्यास मदत होते.
मोगऱ्याला फुले येण्यासाठी उपाय
झाडासाठी घरी खत कसं तयार करावे
मोगऱ्याला फुले येण्यासाठी महागडी रासायनिक खते वापरण्याची गरज नसते. आपल्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेल्या काही वस्तू झाडासाठी अतिशय उपयुक्त ठरू शकतात.
१. हळद
हळद ही नैसर्गिक अँटीसेप्टिक आहे. अर्धा चमचा हळद कुंडीतील मातीमध्ये मिसळल्यास मातीतील बुरशी, कीटक आणि रोगकारक घटकांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.हा उपाय साधारणपणे पंधरा दिवसांतून एकदा करता येतो. त्यामुळे झाडाची मुळे निरोगी राहतात आणि वाढ चांगली होते.
२. मेथी दाण्यांची पावडर
मेथी दाण्यांमध्ये अनेक प्रकारची जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. व्हिटॅमिन ए, बी, सी तसेच कॅल्शियम, पोटॅशियम, लोह, मॅग्नेशियम यांसारखे घटक झाडाच्या वाढीसाठी फायदेशीर ठरतात.एक चमचा मेथी दाण्यांची पावडर मातीमध्ये मिसळल्यास झाडाला आवश्यक पोषण मिळते. हा उपाय देखील पंधरा दिवसांतून एकदा करता येतो.
३. निमखली किंवा निंबोळी पेंड
निमखली ही मातीसाठी उत्कृष्ट सेंद्रिय खत मानली जाते. त्यामध्ये नैसर्गिक कीडप्रतिबंधक गुणधर्म असतात. एक चमचा निमखली मातीमध्ये मिसळल्यास झाडाला पोषण मिळते आणि मुळांवरील कीड नियंत्रणात राहते.
खत दिल्यानंतर लगेच पाणी देऊ नका
मेथी पावडर किंवा निमखली यापैकी कोणतेही खत दिल्यानंतर लगेच पाणी देऊ नये. मातीमध्ये आधीच ओलावा असल्यास हे घटक हळूहळू मातीमध्ये मिसळून झाडाला लाभदायक ठरतात. लगेच पाणी दिल्यास त्यांचा प्रभाव कमी होऊ शकतो

