माशेल : माशेल, कुंभारजुवे आणि परिसरातील संगीतप्रेमी रसिकांसाठी भक्तिगीत, भावगीत, सुगमगीत आणि नाट्यगीतांचा सुरेल नजराणा घेऊन ‘संगीत संध्या’ हा विशेष सांगीतिक कार्यक्रम गुरुवार, दि. 3 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6.30 वाजता श्री शांतादुर्गा कुंभारजुवेकरीण देवस्थान, माशेल येथे आयोजित करण्यात आला आहे.
दैनिक तरुण भारत आणि कला व संस्कृती संचालनालय, गोवा सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच श्री शांतादुर्गा कुंभारजुवेकरीण संस्थान, माशेल यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमात भक्तिसंगीत, भावसंगीत तसेच मराठी संगीत रंगभूमीवरील लोकप्रिय नाट्यगीतांची सुरेल मैफल रसिकांना अनुभवता येणार आहे. विविध प्रकारच्या संगीताचा संगम असलेल्या या कार्यक्रमातून गोमंतकीय रसिकांना दर्जेदार सांगीतिक अनुभवाची पर्वणी मिळणार आहे.
‘संगीत संध्या’मध्ये नामवंत गोमंतकीय गायक डॉ. प्रवीण गावकर, पल्लवी पाटील, आरती गावडे आणि देव दळवी आपल्या सुमधुर गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध करणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. गोविंद भगत करणार आहेत.
वाद्यसाथीमध्ये दत्तराज शेट्ये (तबला), योगेश रायकर (ताल), पवन वळवईकर (पखवाज), दत्तराज म्हालशी (हार्मोनियम) यांचा सहभाग असून मिनानाथ केरकर ध्वनिसंयोजनाची जबाबदारी सांभाळणार आहेत. गायनासोबतच ताल, लय आणि वाद्यसंगतीचा समृद्ध अनुभव रसिकांना या मैफलीत घेता येणार आहे.
या कार्यक्रमासाठी भाजप गोव्याचे राज्य माध्यम संयोजक व प्रवक्ते तसेच खोर्ली मतदारसंघाचे जिल्हा पंचायत सदस्य सिद्धेश श्रीपाद नाईक यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
संगीताच्या विविध प्रवाहांचा आनंद देणारी ही ‘संगीत संध्या’ रसिकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे. माशेल, कुंभारजुवे आणि परिसरातील संगीतप्रेमींनी या सांगीतिक कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
