Headlines

माजी पंतप्रधान चंद्रशेखर जन्मशताब्दीनिमित्त परिसंवादास चांगला प्रतिसाद:अरुण श्रीवास्तव: समाजवादी विचार पुढे नेण्याची आज गरज




माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पुण्यात ‘चंद्रशेखर: विचार आणि सद्यस्थिती’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या परिसंवादाला चांगला प्रतिसाद मिळाला. ज्येष्ठ समाजवादी नेते अरुणकुमार श्रीवास्तव यांनी समाजवादी विचार पुढे नेण्याची आज कधी नव्हे इतकी गरज असल्याचे मत व्यक्त केले. एस. एम. जोशी फाऊंडेशन, नवी पेठ, पुणे येथे रविवारी हा परिसंवाद पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजवादी नेते आणि चंद्रशेखर यांचे सहकारी अरुणकुमार श्रीवास्तव होते. माजी खासदार दानिश अली, ज्येष्ठ नेते उल्हास पवार, शेतकरी नेते दिलीप (तात्या) पाटील आणि कमलताई पायगुडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. वक्त्यांनी चंद्रशेखर यांच्या राजकीय विचारांवर, लोकशाही मूल्यांवर आणि सद्यस्थितीतील त्यांच्या विचारांच्या प्रासंगिकतेवर सखोल चर्चा केली. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या झेलम परांजपे यांचा संदेश वाचून दाखवण्यात आला. रघुनाथ ससाणे यांनी सूत्रसंचालन केले, तर संजय गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. संदेश दिवेकर, अन्वर राजन, दत्ता पाकिरे, बी. आर. माडगूळकर आणि साधना शिंदे यांचीही प्रमुख उपस्थिती होती. अरुणकुमार श्रीवास्तव यांनी चंद्रशेखर यांच्या वैचारिक वारशाचे जतन करण्याच्या गरजेवर भर दिला. ते म्हणाले की, चंद्रशेखर यांच्या भारत यात्रेमुळे देशातील सामाजिक वास्तव, ग्रामीण भारत आणि सामान्य जनतेचे प्रश्न राष्ट्रीय पातळीवर पोहोचले. महात्मा गांधी आणि लोहिया यांच्यानंतर चंद्रशेखर यांनी युवा पिढीला दिशा दिली. त्यांच्या नेतृत्वाखाली कामाचे आणि निर्णयाचे स्वातंत्र्य होते, जे आज दुर्मिळ आहे. समाजवादी विचार पुढे नेण्याची आज नितांत गरज असून, येणाऱ्या पिढीसाठी समाजवादी विचार आणि उपक्रम देण्याची आवश्यकता आहे. जन्मशताब्दीनिमित्त एक हजार कार्यक्रमांचा संकल्प करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. यावेळी बोलताना उल्हास पवार यांनी सांगितले की, चंद्रशेखर यांनी ‘तरुण तुर्क’ म्हणून परखड आणि बंडखोर भूमिका घेतल्या, तसेच देशहित जपले. त्यांनी संसदीय कामकाजाला प्रतिष्ठा दिली आणि गरीब व समाजवादासाठी लढा दिला. आज असे नेतृत्व दिसत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. जनता पक्षाच्या काळात सत्तेत आलेला संघ आता खाली उतरायला तयार नाही, असे ते म्हणाले. माध्यमे गुलाम झाली असून, जनता शांत बसली आहे. अशा परिस्थितीत चंद्रशेखर यांची वैचारिक बैठक आठवते. नितीशकुमार यांच्यासारखी तडजोड चंद्रशेखर यांनी केली नसती, असेही पवार यांनी नमूद केले.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत