![]()
अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिराच्या दानपेटीत झालेल्या कथित चोरी आणि निधी अपहाराच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंची शिवसेना आता कमालीचा आक्रमक झाली आहे. या प्रकाराचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी आज दादर येथील ऐतिहासिक हनुमान मंदिरात (पुरातन वटवृक्ष मंदिर) ठाकरे गटाच्या वतीने ‘रामरक्षा आंदोलना’ची हाक देण्यात आली आहे. या ठिकाणी रामरक्षा स्तोत्र आणि हनुमान चालिसाच्या पठणासह महाआरती करून या राज्यव्यापी आंदोलनाचा शंखनाद केला जात आहे. सध्या पाऊस सुरू असून, या भरपावसात शिवसैनिक या आंदोलनासाठी उपस्थित राहिले आहेत. या रामरक्षा आंदोलनाचे आणि महाआरतीचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे, यात सहभागी होण्यासाठी थेट अयोध्येहून काही साधू-संत आणि महंत दादरमध्ये दाखल झाले आहेत. पक्षाचे प्रवक्ते आनंद दुबे यांच्यासह हे सर्व पंडित व महंत या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवणार असून, राम मंदिरातील अपहाराविरोधात आवाज उठवणार आहेत. दादरच्या पुरातन वटवृक्ष मंदिरात होणाऱ्या या आंदोलनाचे नेतृत्व स्वतः माजी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करत आहेत. त्यांच्यासोबत युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत यांच्यासह मुंबईभरातील शेकडो शिवसैनिक आणि पदाधिकारी उपस्थित आहेत. रामद्रोह म्हणजे हिंदूद्रोह, हिंदूद्रोह म्हणजे देशद्रोह या आंदोलनाची पार्श्वभूमी तयार करण्यासाठी ठाकरे गटाकडून काल (शनिवारी) एक आक्रमक टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. “रामद्रोह म्हणजे हिंदूद्रोह आणि हिंदूद्रोह म्हणजे देशद्रोह.” अस संदेश या टीझरमधून देण्यात आला. तसेच श्रीराम मंदिराच्या कथित लुटीच्या विरोधात आयोजित करण्यात आलेल्या या महाआरतीत तमाम रामभक्तांनी आणि शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन या टीझरच्या माध्यमातून करण्यात आले होते.
Source link
रामद्रोह म्हणजे देशद्रोह:राम मंदिरातील देणगी चोरीविरोधात ठाकरे गटाचे दादरमध्ये रामरक्षा आंदोलन, अयोध्येतील साधू-संतांचा सहभाग
