न्हावेली | वार्ताहर : मळगाव येथील कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिरात आयोजित ‘काव्यंजली’ या काव्यसंमेलनाला काव्यप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कोकणी, मालवणी आणि मराठी भाषेतील स्वरचित तसेच निवडक कवितांनी उपस्थितांची मने जिंकली. मळगाव इंग्लिश स्कूल व मळगाव हायस्कूलच्या इयत्ता पाचवी ते नववीतील विद्यार्थ्यांनी पाऊस आणि निसर्ग या विषयांवरील स्वरचित कविता आत्मविश्वासाने सादर करून श्रोत्यांची वाहवा मिळवली. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या प्रज्ञा मातोंडकर आणि ऋतुजा सावंत यांनीही स्वतःच्या कविता सादर केल्या. तसेच प्रज्ञा मातोंडकर यांच्या दोन कविता विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे सादर करून कार्यक्रमात वेगळीच रंगत आणली.
कार्यक्रमात दोडामार्गचे ज्येष्ठ मालवणी कवी रामचंद्र शिरोडकर यांच्या पावसावरील मालवणी कवितेने विशेष दाद मिळवली. त्यांच्या ठसकेबाज सादरीकरणाला रसिकांनी ‘वन्स मोअर’ची मागणी करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यानंतर त्यांनी सादर केलेल्या मराठी कवितेलाही भरभरून दाद मिळाली. शिरोडा येथील मुक्त वाचक स्वप्निल वेंगुर्लेकर यांनीही पावसावरील आणि मराठीतील अशा दोन कवितांचे प्रभावी सादरीकरण केले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तथा २६ काव्यसंग्रहांचे लेखक प्रकाश तेंडुलकर यांनी ‘कविता कशी लिहावी, कशी म्हणावी आणि कशी जगावी’ या विषयावर मार्गदर्शन करत नवोदित कवी आणि विद्यार्थ्यांना प्रेरणादायी विचार दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाचन मंदिराच्या कार्यवाहक सौ. स्नेहा महेश खानोलकर यांनी प्रभावीपणे केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वाचन मंदिराच्या संचालक मंडळासह सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. साहित्य, भाषा आणि विविध पिढ्यांचा सुंदर संगम घडवणाऱ्या काव्यंजलीने कविता ही केवळ शब्दांची मांडणी नसून मनांना जोडणारा सेतू असल्याची प्रचिती उपस्थितांना दिली.
