पाटणा : बिहारमध्ये महिला विद्यापीठाची स्थापना केली जाणार आहे. या खास विद्यापीठात केवळ विद्यार्थिनींनाच प्रवेश मिळेल आणि कुलगुरुंपासून सर्व कर्मचारी महिलाच असतील, अशी घोषणा मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी केली आहे. तसेच त्यांनी महिला रोजगार योजनेच्या अंतर्गत 5 लाख महिलांच्या खात्यांमध्ये जवळपास 600 कोटी रुपये डीबीटीच्या माध्यमातून जमा केले आहेत. मुख्यमंत्री चौधरी यांनी समृद्ध महिला समृद्ध बिहार अभियानाचा शुभारंभ केला आहे. यावेळी त्यांनी 2030 पर्यत जीविका दीदींच्या विकासाकरता सरकार जवळपास 20 हजार कोटी रुपये खर्च करणार असल्याचे सांगितले आहे. तर चौधरी सरकारने बुधवारी महिला अन् मुलींकरता तीन मोठ्या योजनांचा शुभारंभ केला होता. यात बेटी स्टार्टअप चॅलेंज, बालिका पीएचडी फेलोशिप आणि शाळा-महाविद्यालयांनजीक पोलीस दीदी तैनात करण्याची घोषणा केली होती. पोलीस दीदींकरता 4700 दुचाकी वाहने सरकारने पुरविली आहेत. तर बेटी स्टार्टअप चॅलेंज अंतर्गत महिलांना स्वत:चा उद्योग पुढे नेण्यासाठी सरकार 2 लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत करणार आहे.
