गणेशोत्सवात मोदक बनवताना सुंदर कळ्या पाडणे ही अनेकांसाठी अवघड गोष्ट असते.पण मोदकाचा साचा नसतानाही प्लास्टिकची जाड पिशवी किंवा शीट वापरून सुबक कळीदार मोदक बनवता येतो.काही सोप्या ट्रिक्सच्या मदतीने नवशिके, लहान मुले आणि वयोवृद्धही अगदी सुंदर मोदक तयार करू शकतात.

मोदकाची पारी तयार करताना महत्त्वाच्या टिप्स
मोदक बनवताना सर्वप्रथम पीठाची उकड व्यवस्थित मळलेली असणे आवश्यक आहे. उकड मऊ आणि लवचिक असेल तर पारी लाटणे आणि मोदकाला आकार देणे सोपे जाते. पीठ उघडे ठेवू नये. ते नेहमी ओल्या कापडाने किंवा झाकणाने झाकून ठेवावे. अन्यथा पीठ कोरडे होऊन त्याला भेगा पडू शकतात.एक छोटा उंडा घेऊन त्यावर अगदी थोडे तूप लावून हातावर मळून घ्यावे.
पारी करताना तुपाचा वापर कमी प्रमाणात करावा. जास्त तूप लावल्यास कळ्या एकमेकांना चिकटवणे कठीण होऊ शकते. गरज वाटल्यास हाताला थोडी पिठी लावावी. मोदकाची पारी करताना मध्यभाग किंचित जाडसर आणि कडांचा भाग तुलनेने पातळ ठेवावा. मध्यभाग खूप पातळ असेल तर मोदक वाफवताना किंवा बंद करताना खाली फुटण्याची शक्यता असते.पारी तयार झाल्यानंतर अंगठा आणि बोटांच्या साहाय्याने तिला वाटीसारखा खोलगट आकार द्यावा.
प्लास्टिकच्या पिशवीचा वापर
ज्यांना हाताने कळ्या पाडता येत नाहीत त्यांच्यासाठी ही अतिशय सोपी पद्धत आहे.यासाठी स्वच्छ, जाडसर प्लास्टिकची पिशवी किंवा प्लास्टिक शीट घ्यावी. अतिशय पातळ प्लास्टिक वापरू नये. पिशवीचा चौकोनी तुकडा करून घ्यावा. पारी त्यामध्ये ठेवून वरून दुसरा प्लास्टिकचा तुकडा ठेवावा. अगदी थोडे तूप लावून पारी मध्यम जाडीची लाटून घ्यावी.पारी खूप जाड किंवा खूप पातळ नसावी. आपण नेहमी मोदकासाठी जशी पारी करतो, तशीच मध्यम जाडीची पारी तयार करावी.आता वरचा प्लास्टिकचा तुकडा अलगद काढावा. पारीवर सारण ठेवून ती पुन्हा प्लास्टिकसह हलक्या हाताने गुंडाळावी. गुंडाळताना फार जोर लावू नये. पारी नाजूक असल्यामुळे ती फाटण्याची शक्यता असते.गुंडाळताना वरच्या टोकाला म्हणजेच मोदकाच्या नाकाच्या भागाला सुरुवातीला जास्त दाबू नये. फक्त कळ्या तयार झाल्यासारख्या हलक्या खाचा द्याव्यात. यामुळे प्लास्टिक काढल्यानंतर पारीवर सुंदर आणि एकसारख्या कळ्या दिसतात.शेवटी मोदकाचे नाक अलगद बंद करावे. ज्यांना अजिबात कळ्या पाडता येत नाहीत त्यांच्यासाठी ही पद्धत विशेष उपयोगी ठरते.
चमच्याच्या साहाय्याने कळ्या
कळ्या पाडता येतात, पण त्या एकसारख्या होत नाहीत, अशांसाठी चमच्याची ट्रिक उपयोगी आहे. प्रथम प्लास्टिकच्या शीटवर पारी लाटून घ्यावी. एका छोट्या वाटीच्या साहाय्याने पारीच्या मध्यभागी हलका गोल मार्क करावा. त्यानंतर चमच्याच्या अंदाजाने पारीवर समान अंतरावर चार भागांचे हलके मार्क करावेत. त्या चार भागांचे पुन्हा दोन-दोन भाग करावेत.
यामुळे पारीवर साधारण ८ ते १२ ठिकाणी कळ्या पाडण्यासाठी खूण तयार होते. मात्र पारी पूर्णपणे कापायची नाही. फक्त हलक्या खुणा करायच्या आहेत.यानंतर वरचा प्लास्टिकचा कागद काढून पारीवर थोडी पिठी लावावी. जिथे-जिथे मार्क केले आहेत तिथे बोटांनी चिमटी देऊन कळ्या तयार कराव्यात. अशा प्रकारे कळ्या एकसारख्या अंतरावर पडतात आणि मोदक अधिक सुबक दिसतो.काही वेळा ही पद्धत वापरल्यावर हाताला कळ्या पाडण्याची सवय लागते आणि नंतर मार्क करण्याचीही गरज भासत नाही.
तिसरी ट्रिक दोन वाट्यांचा वापर
लहान मुले आणि वयोवृद्ध व्यक्तींसाठी दोन छोट्या वाट्यांची पद्धत खूप सोपी आहे. दोन वाट्या घ्याव्यात, ज्यापैकी एक दुसऱ्यामध्ये सहज बसेल.छोटी वाटी घेऊन त्यात स्वच्छ प्लास्टिकची शीट ठेवावी. त्यावर मोदकाची पारी ठेवावी. हाताने पारी हलक्या दाबाने वाटीच्या आकारात पसरवावी. पारी कुठे जाड वाटत असेल तर त्या ठिकाणी हाताने हलका दाब द्यावा.गरज असल्यास दुसरी छोटी वाटी त्यावर ठेवून अगदी हलक्या हाताने दाबता येते. यामुळे पारीला व्यवस्थित आणि एकसारखा वाटीसारखा आकार मिळतो.यानंतर वरचा प्लास्टिकचा तुकडा काढून त्यात सारण भरावे. प्लास्टिकच्या साहाय्याने पारी अलगद वर आणून मोदक बंद करावा. जर कळ्या नीट पडल्या नाहीत तर चमच्याच्या साहाय्याने बाहेरून हलक्या खाचा पाडता येतात.
घरच्या घरी तयार करा मोदकाचा साचा
मोदकाचा साचा नसेल तर बटर पेपरच्या साहाय्याने घरच्या घरी एक सोपा साचा तयार करता येतो.यासाठी बटर पेपरचा चौकोनी तुकडा घ्यावा. तो घडी करून त्रिकोणी आकार द्यावा आणि गोल कापून घ्यावा. त्यानंतर पुन्हा काही घड्या घालून योग्य अंतरावर छोटे तिरके कट द्यावेत. कट अगदी मध्यभागापर्यंत न नेता ठरावीक अंतरावरच थांबवावेत.
पेपर उघडल्यानंतर मध्यभागी गोल आणि आजूबाजूला समान अंतरावर कट असलेला आकार तयार होईल. हाच आपल्या मोदकाच्या कळ्या पाडण्यासाठी घरगुती साचा म्हणून वापरता येतो.लाटलेली पारी या बटर पेपरवर ठेवावी. जिथे-जिथे पेपरचे कट आहेत, तिथे पारीला हलकी चिमटी द्यावी. प्रत्येक कटच्या मध्ये एक कळी तयार होत जाते. बटर पेपर अलगद बाजूला सरकत जातो आणि पारीवर सुंदर, समान अंतराच्या कळ्या तयार होतात.
कळीदार मोदक कसा बनवावा
मोदक बंद करताना घ्या काळजी
कळ्या पाडल्यानंतर सारण भरावे. आधी सारण भरून कळ्या पाडल्यास सारण हाताला लागून पारीवर डाग पडू शकतात. सारण भरल्यानंतर बोट स्वच्छ कापडाने पुसून घ्यावे आणि मोदक हळूहळू बंद करावा.मोदक बंद करताना घाई करू नये. गोल फिरवत हळूहळू मोदक बंद केल्यास कळ्या दबल्या जात नाहीत. मोदकाचे नाक तयार करताना आवश्यक असल्यास पाकळ्यांच्या बाजूला अगदी थोडे तूप लावावे. त्यामुळे पीठ मऊ होऊन नाकाला सुंदर चाफेकळी आकार देता येतो.मोदकाच्या नाकाचा भाग शक्य तितका पातळ ठेवणे चांगले. जाड नाक वाफवल्यानंतर नीट शिजण्यास अडचण येऊ शकते.

