Headlines

प्रकल्प रखडला… खर्च तीन पटीने वाढला


900 कोटींचा प्रकल्प दहा वर्षांत पोहोचला 2500 कोटींवर 

► त. भा. प्रतिनिधी

बेळगाव

एखादा प्रकल्प रखडला तर त्यासाठी लागणारा निधी दुपटीने वाढत जातो. परंतु बेळगावमधील एक प्रकल्प आठ ते दहा वर्षांपासून रखडल्याने त्याची प्रोजेक्ट कॉस्ट तब्बल तीन पटीने वाढली आहे. त्यामुळे प्रकल्पाला झालेल्या विलंबामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशातील पैसा खर्च करावा लागणार आहे. बेळगाव-धारवाड व्हाया कित्तूर या रेल्वे मार्गाच्या बाबतीत तीन पटीने खर्च वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

बेळगाव-धारवाड व्हाया कित्तूर हा 73 कि. मी.चा नवा रेल्वे मार्ग केला जाणार आहे. सध्या असलेला बेळगाव-धारवाड व्हाया लोंढा या लोहमार्गाचे अंतर अधिक असून तो घनदाट जंगलातून जातो. त्यामुळे रेल्वेच्या वेगावर मर्यादा येत आहेत. त्यामुळे देसूर-कित्तूरमार्गे नव्या रेल्वे मार्गाला मंजुरी देण्यात आली. यासाठी धारवाड जिल्ह्यातील 210 एकर तर बेळगाव जिल्ह्यातील 1378 एकर जमीन संपादित केली जाणार आहे.

या नव्या रेल्वे मार्गामुळे रेल्वेची गती तर वाढणारच आहे, त्याचबरोबर अंतर कमी होणार असल्याने इंधनाचा खर्चही मर्यादित होणार आहे. या रेल्वे मार्गासाठी नैत्य रेल्वेकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. परंतु भूसंपादन वेळेत न झाल्याने हा प्रकल्प रखडला गेला. अद्यापही भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही.

प्रकल्पाला मंजुरी मिळाली त्यावेळी या प्रकल्पाचा खर्च 927 कोटी रुपये येणार होता. परंतु यासाठी आठ ते दहा वर्षांचा कालावधी लोटल्याने या प्रकल्पाचा खर्च आता तीन पटीने वाढला आहे. सध्या बांधकामाचे वाढलेले दर, वाढलेली मजुरी या सर्वांचा परिणाम सद्य:स्थितीत 2500 कोटी रुपये खर्च येण्याची शक्यता आहे. सध्याची भूसंपादनाची परिस्थिती पाहता अजूनही काही दिवस हा प्रकल्प रखडला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

भूसंपादनावर एक नजर

बेळगाव जिल्ह्यातील 621 एकर भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. परंतु नुकसानभरपाई अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. उर्वरित 779 एकर  भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. धारवाड जिल्ह्यात 210 एकर जमिनीचे दोन टप्प्यात संपादन केले जाणार आहे. यापैकी केवळ 48 एकर संपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या प्रकल्पाच्या नुकसानभरपाईसाठी राज्य सरकारकडून 50 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यापैकी 21 कोटी रुपये लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले आहेत. तर 29 कोटी रुपये अद्याप वाटप करणे बाकी आहे.

 



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत