► वृत्तसंस्था नवी दिल्ली
परीक्षा पद्धतीत सुधारणा, वारंवार होणाऱ्या पेपरफुटीच्या प्रकरणांसाठी जबाबदारी निश्चित करणे आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पक्ष (सीजेपी) येत्या सोमवारी म्हणजेच 20 जुलै रोजी संसदेवर मोर्चा काढणार आहे.
या मोर्चाला आता अन्य राजकीय पक्षांचेही पाठबळ मिळत आहे. सोमवारी आम आदमी पक्षाच्या शिष्टमंडळाने जंतरमंतरवर आंदोलकांची भेट घेत आपला पाठिंबा जाहीर केला.
गेल्या पंधरवड्यापासून राजधानी दिल्लीतील जंतरमंतरवर कॉकरोच जनता पक्षाचे आंदोलन सुरूच आहे. सोमवारी या आंदोलनाला आणखी बळ मिळाले.
दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्या आतिशी यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाचे शिष्टमंडळ आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (मार्क्सवादी) खासदार अमराराम यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते आंदोलनस्थळी पोहोचले. नेत्यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा देत परीक्षा पद्धतीत व्यापक सुधारणांची गरज असल्याचे सांगितले. त्यानंतर प्रतिनिधी मंडळाने केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीलाही पाठिंबा दिला.
दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिशी यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाच्या शिष्टमंडळात आमदार कुलदीप कुमार आणि माजी महापौर शेली ओबेरॉय यांचा समावेश होता. प्रतिनिधी मंडळाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची भेट घेतली आणि त्यांच्या मागण्या व समस्या ऐकून घेतल्या.
