![]()
तिवसा येथे गुरुवारी सर्वपक्षीय व सर्व संघटनांनी एकदिवसीय बंद पाळला. दिल्लीत पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आला होता. या बंदला व्यापारी, विद्यार्थी, पालक, शिक्षक, शेतकरी, युवक आणि विविध सामाजिक संघटनांसह सर्वसामान्य नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सकाळपासूनच शहरातील मुख्य बाजारपेठ, व्यापारी संकुले आणि किरकोळ दुकाने बंद होती. व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवून विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. दुपारी १२ वाजता पेट्रोल पंप चौकात सर्वपक्षीय निषेध आंदोलनाला सुरुवात झाली. यात विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, विद्यार्थी संघटना, व्यापारी संघटना, युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी “पेपरफुटी बंद करा”, “विद्यार्थ्यांना न्याय द्या” आणि “भ्रष्टाचाराचा निषेध असो” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. जाहीर सभेत वक्त्यांनी शिक्षण व्यवस्थेतील कथित गैरप्रकारांवर तीव्र टीका केली. देशभरातील लाखो विद्यार्थी कठोर परिश्रम करून स्पर्धा परीक्षा देतात, मात्र पेपरफुटी आणि गैरव्यवहारामुळे त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. या आंदोलनात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), भारतीय कम्युनिस्ट पक्ष, शिवसेना, प्रहार जनशक्ती पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय बौद्ध महासभा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, छत्रपती संघटना यासह अनेक सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. पक्षीय मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी पेपरफुटीच्या घटनांचा निषेध केला आणि विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी एकत्र लढण्याचा निर्धार व्यक्त केला. दिल्लीतील आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या युवतीला दोन मिनिटे मौन बाळगून श्रद्धांजली अर्पण करून आंदोलनाची सांगता करण्यात आली. सभेनंतर आंदोलनकर्त्यांनी तिवसा येथील राष्ट्रीय महामार्गावर काही काळ रास्तारोको आंदोलन केले. यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागून वाहतुकीवर परिणाम झाला. पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत वाहतूक सुरळीत केली. आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तिवसा पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता.
Source link
पेपरफुटीविरोधात विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी सर्वपक्षीय एकजूट:तिवस्यात बाजारपेठ बंद, केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी
