Headlines

एका रिअल इस्टेट डीलने पालटलं जितेंद्र याचंं नशीब,४.२५ लाखात घेतलेल्या ‘अपशकुनी’ बंगल्याची किंमत आज ४५० कोटी


मुंबई:गेल्या काही वर्षात बॉलिवूड सेलिब्रिटींच्या रिअल इंस्टेट गुंतवणुकीची बरीच चर्चा झाली. काही सेलिब्रिटींनी नव्यानं मालमत्ता खरेदी केली आहे, तर काहींनी बऱ्याच वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या प्रॉपर्टी डीलची पुन्हा चर्चा सुरू आहे.

बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते जितेंद्र यांनी केवळ अभिनयातच नव्हे, तर रिअल इस्टेटच्या जगातही आपली एक वेगळी आणि यशस्वी ओळख निर्माण केली आहे. चाळीतील एका छोट्या खोलीतून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास आज शेकडो कोटींच्या मालमत्तेपर्यंत पोहोचला आहे. अलीकडेच त्यांनी एका मुलाखतीत आपल्या पहिल्या मोठ्या प्रॉपर्टीच्या गुंतवणुकीचा एक रंजक किस्सा शेअर केला, जो सध्या सोशल मीडियावर आणि चित्रपटसृष्टीत चर्चेचा विषय ठरलाय.

१९५० च्या दशकातील प्रसिद्ध चित्रपट ‘बैजू बावरा’ फेम अभिनेते भारत भूषण यांच्याकडून जितेंद्र यांनी वांद्रे इथल्या पाली हिल भागातील एक बंगला अवघ्या ४.२५ लाख रुपयांत खरेदी केला होता. आज त्याच जागेची किंमत ४५० ते ५०० कोटी रुपयांच्या घरात पोहोचली आहे, असं त्यांनी सांगितलं.

चाळीतील १०x२० ची खोली अन् पाली हिलचा बंगला
आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देताना जितेंद्र म्हणाले, आम्ही गिरगावातील एका चाळीत १०x२० च्या छोट्या खोलीत ८ जण एकत्र राहायचो. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या आमच्यासाठी बंगला खरेदी करणं हे एका स्वप्नासारखं होतं. जेव्हा भारत भूषण गंभीर आर्थिक संकटात सापडले, तेव्हा ते स्वतः माझ्याकडे त्यांचा पाली हिल इथला बंगला विकण्याचा प्रस्ताव घेऊन आले. मी वडिलांशी चर्चा केली आणि ३,४५० स्क्वेअर फूट प्लॉटसह तो बंगला ४.२५ लाख रुपयांत खरेदी केला.

Maharashtra TimesSambhaji Sasane: लोकांना ‘द सई ताम्हणकर’ वाटते, पण तशी ती खऱ्या आयुष्यात नाहीय; सिनेमातल्या ‘राणी’बद्दल काय म्हणाला अभिनेता संभाजी ससाणे?

सलग ४ चित्रपट फ्लॉप अन् घराला मानले ‘अपशकुनी’

बंगल्यात राहायला गेल्यानंतर जितेंद्र यांच्या आयुष्यात अनपेक्षित वळण आलं. नवीन घरात शिफ्ट होताच त्यांचे सलग ४ चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाले. या अपयशामुळं जितेंद्र घाबरले. भारत भूषण यांच्याप्रमाणे आपलीही आर्थिक स्थिती खालावेल या भीतीनं त्यांनी तो बंगला ‘अपशकुनी’ मानला अन् बंगला सोडला.

लाकडातूनच निघाले खरेदीपेक्षा तिप्पट पैसे!तो बंगला सोडल्यानंतर काही वर्षांनी एका बिल्डरनं पुनर्विकासाचा प्रस्ताव दिला आणि जितेंद्र यांनी तो लगेच मान्य केला. जेव्हा तो जुना बंगला पाडण्यात आला, तेव्हा एक थक्क करणारी गोष्ट घडली.बंगल्याची मूळ खरेदी किंमत ही ४.२५ लाख होती. तर बंगल्यातील सागवान लाकूड विकून मिळालेली रक्कम ही ११.५ लाख होती. म्हणजेच जमीन आणि इमारतीचा विकास करण्याआधीच, केवळ जुन्या बंगल्यातील लाकूड विकून जितेंद्र यांनी मूळ गुंतवणुकीच्या सुमारे तिप्पट रक्कम वसूल केली होती, असंही जितेंद्रंनी सांगितलं.

Maharashtra TimesSachin Goswami: जरा मेंदू ताब्यात घ्या,वापरा, फ्रेश वाटतं; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम सचिन गोस्वामींनी सांगितली रामराज्याची व्याख्या

जितेंद्र यांनी त्या जागेवर ‘गौतम अपार्टमेंट्स’ नावाची इमारत बांधली.त्यांचा मुलगा तुषार कपूर यानं स्पष्ट केले की, आज त्याच इमारतीत एका फ्लॅटचा दर सुमारे ८५,००० रुपये प्रति स्क्वेअर फूट आहे. त्याची किंमत आता ४५० कोटींच्या जवळपास आहे. आपल्या या यशस्वी प्रवासावर बोलताना जितेंद्र म्हणाले, रिअल इस्टेटमध्ये नशीब खूप महत्त्वाची भूमिका बजावते. जसं लोक म्हणतात की शिर्डीला साईबाबांचे बोलावणं आल्याशिवाय जाता येत नाही, तसंच जमिनीचंही असते. तुम्ही जमिनीची निवड करत नाही, तर जमीन तुमची निवड करते.सुरुवातीला भीतीपोटी सोडलेला तोच बंगला पुढे जाऊन जितेंद्र यांच्या रिअल इस्टेट साम्राज्याचा पाया ठरला.