Headlines

अचलपूर तालुक्यातील वडुरावासीयांचे जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन:घरकुल योजनेच्या लाभासाठी प्रशासनाकडे तातडीने मागणी




अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातल्या पांढरी ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या वडुरा गावातील रहिवाशांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदन दिले आहे. घरकुल योजनेचा लाभ तातडीने मिळावा, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. सामाजिक कार्यकर्ते सुनील घटाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले. निवेदनानुसार, संबंधित कुटुंबे आदिवासी आणि गरीब असून, गेल्या १५ वर्षांपासून झोपड्यांमध्ये राहत आहेत. त्यांच्या झोपड्या नाल्याच्या काठावर असल्याने साप आणि इतर विषारी प्राण्यांच्या सततच्या वावरामुळे त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. तसेच, झोपड्यांच्या दोन्ही बाजूंनी वीज वाहिन्या गेल्याने अपघाताची भीतीही कायम आहे. या कुटुंबांकडे घराचा कोणताही अधिकृत पुरावा नसल्यामुळे त्यांना घरभाडे पावतीही मिळत नाही. ही कुटुंबे भूमिहीन असून, त्यांचा उदरनिर्वाह मजुरीवर चालतो. गावात ई-क्लासची जमीन उपलब्ध असतानाही ती एका व्यक्तीच्या ताब्यात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करून ती जमीन ताब्यात घ्यावी आणि पात्र लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देऊन निवारा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. या निवेदनावर गावकऱ्यांच्या सह्या असून, प्रशासनाकडून तातडीने सकारात्मक निर्णयाची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत