![]()
होर्मुझ सामुद्रधुनीतील परिस्थिती पुन्हा एकदा तणावपूर्ण बनली आहे. गेल्या २४ तासांत येथे तीन कच्च्या तेलाच्या टँकर्सवर (तेलवाहू जहाजे) भीषण हल्ले झाले आहेत. यामध्ये कतारमधील रास लाफान येथून गुजरातच्या दाहेजकडे येत असलेल्या ‘अल रकायत’ या टँकरवर ड्रोन हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात टँकरचे नुकसान झाले आहे, मात्र सुदैवाने टँकरवर असलेले ४ भारतीय कर्मचारी पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. कतारने या हल्ल्यासाठी इराणला जबाबदार धरले आहे. याशिवाय होर्मुझमध्ये सौदी अरबच्याही एका टँकरवर हल्ला झाला. यादरम्यान, भारतीय नौदलाच्या मदतीने कच्चे तेल घेऊन येणारा ‘ओमेगा ट्रेडर’ हा टँकर होर्मुझमधून सुरक्षित बाहेर पडला. या जहाजावर २३ कर्मचारी असून, त्यामध्ये १५ भारतीय आणि ८ फिलिपाइन्सच्या नागरिकांचा समावेश आहे. दुसरीकडे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला एक तासात उद्ध्वस्त करू,असे म्हटले आहे. त्याला प्रत्युत्तर देत ट्रम्पना युद्धबंदी कराराची आठवण करून दिली आहे. नाटो समिटपूर्वी ट्रम्प म्हणाले- ग्रीनलँडवर अमेरिकेचे नियंत्रण असले पाहिजे तुर्कियेची राजधानी अंकारा येथे सुरू असलेल्या नाटो परिषदेपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पनी पुन्हा ग्रीनलँडवर दावा केला. ग्रीनलँडवर अमेरिकेचे नियंत्रण असायला हवे, कारण ते अमेरिकेच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले. ट्रम्प यांनी मान्य केले की, त्यांच्या या विधानामुळे नाटो सदस्य देशांसोबतचे संबंध बिघडू शकतात.ट्रम्प यांनी तुर्कियेला एफ-३५ फायटर जेट विकण्याबाबत निर्णय घेणार असल्याचे सांगितले. रशियाची एस-४०० ही संरक्षण प्रणाली खरेदी केल्यामुळे तुर्कियेवर घालण्यात आलेले निर्बंध हटवण्याचे संकेतही ट्रम्प यांनी यावेळी दिले. या परिषदेत युरोपची सुरक्षा, युक्रेन युद्ध, रशियाच्या सायबर व हायब्रिड हल्ल्यांचा धोका, होर्मुझ सामुद्रधुनीची सुरक्षा आदींवर चर्चा होईल. ‘रिवेरा प्लॅन’ला हमासची संमती हमासने २ दशकांनंतर गाझाची सत्ता सोडण्याची तयारी दर्शवली आहे. हमासने ट्रम्प यांच्या ‘रिवेरा प्लॅन’लाही संमती दिली. गाझाचा संपूर्ण कारभार अमेरिका समर्थित हंगामी समिती ‘एनसीएजी’कडे सोपवण्यास तयार असल्याचे हमासने म्हटले आहे. हमास प्रशासनाचे प्रमुख अल-फर्रा यांनी पदाचा राजीनामा देऊन सांगितले की, सरकारी व्यवस्था हस्तांतरित करण्याची तयारी पूर्ण झाली आहे. मात्र, हमासने शस्त्रे सोडण्याचे अद्याप मान्य केलेले नाही. इस्रायल आणि अमेरिका मात्र याच अटीवर ठाम आहेत. ट्रम्पचा ‘रिवेरा प्लॅन’ काय? ट्रम्प यांचा गाझा रिवेरा प्लॅन म्हणजे युद्धाने उद्ध्वस्त गाझाला समुद्रकिनाऱ्यालगत लक्झरी झोन बनवण्याची योजना आहे. यात रिसॉर्ट, हॉटेल, स्मार्ट सिटी, रस्ते व पर्यटन पायाभूत सुविधा करण्याचा प्रस्ताव आहे. यात २० लाख गाझावासीयांना स्थलांतरित करण्याची योजना आहे. सर्वोच्च नेते खामेनी यांची अंत्ययात्रा मंगळवारी कोम शहरात पोहोचली. येथे जमकरान मशिदीत त्यांना निरोप दिला.बुधवारी अंत्ययात्रा इराकच्या कर्बला व नजफला जाईल. इराणने खामेनी यांच्या अंत्ययात्रेला भारताने लावलेल्या उपस्थितीबद्दल आभार मानले. भारताबाबत इराणी दूतावासाने म्हटले की, इराणची जनता भारताची ही मैत्री विसरणार नाही.
Source link
पुन्हा तणाव:होर्मुझ पुन्हा तापले; भारताकडे कतारहून येणाऱ्या टँकरवर हल्ला, 24 तासांत 3 जहाजांवर निशाणा
