Kurla LBS Marg Waterlogging: मुंबईत थोडा पाऊस सुरू झाला की कुर्ला एलबीएस मार्ग जंक्शनमध्ये लगेच पाणी तुंबते आणि संपूर्ण परिसरातील वाहतूक विस्कळीत होते. महापालिका या समस्येवर उपाय काढण्यासाठी १३.१९ कोटींच्या कामाचा प्रस्ताव मांडणार आहे.
म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई: दरवर्षी पावसाळ्यात पाणी तुंबण्याची समस्या भेडसावणाऱ्या कुर्ल्यातील एलबीएस मार्गावरील सोनापूर लेन जंक्शन आणि काळे मार्ग परिसराला दिलासा मिळण्याची शक्यता आहे. या भागातील पूरस्थिती कमी करण्यासाठी पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमता वाढवण्यात येणार आहे. या कामासाठी मुंबई महापालिका १३ कोटी १९ लाख रुपये खर्च करणार असून, यासंदर्भातील प्रस्ताव आज, गुरुवारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी मांडला जाणार आहे.
मुंबईत पावसाळ्यातील पाणी तुंबण्याची समस्या कमी करण्यासाठी महापालिकेकडून पर्जन्य जलवाहिन्यांच्या जाळ्यात टप्प्याटप्प्याने सुधारणा केली जात आहे. मुंबईतील काही सखल भागांत समुद्राला भरती नसतानाही पाणी साचते. भरतीच्या वेळी पाणीपातळी वाढल्यास या भागांत पूरसदृश परिस्थिती निर्माण होते. अशा वेळी पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमता महत्त्वाची ठरते. याच पार्श्वभूमीवर कुर्ल्यातील काही भागांतील पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमता वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कुर्ल्यातील सोनापूर लेन-एलबीएस मार्ग जंक्शन आणि काळे मार्ग-काजूपाडा पाइपलाइन रस्ता परिसरात मुसळधार पावसाच्या वेळी मोठ्या प्रमाणावर पाणी साचते. सध्या अस्तित्वात असलेल्या पर्जन्य जलवाहिन्यांचे आकारमान कमी असल्याने पावसाचे पाणी वेगाने वाहून जाण्यास अडचण येते. त्यामुळे दरवर्षी या भागात वाहतूक विस्कळीत होते आणि पूरसदृश परिस्थिती निर्माण होते. महापालिकेच्या कुर्ला विभागातील ठाणे केबिन नाला प्रणालीशी संबंधित काळे मार्ग आणि सोनापूर लेन परिसरातील पर्जन्य जलवाहिन्या, कॅच पिट्स तसेच संबंधित संरचनांची पुनर्रचना व सुधारणा करण्यात येणार आहे.
या परिसरातील पावसाचे पाणी सुंदरबाग नाला, काजूपाडा पाइपलाइन मार्ग आणि एलबीएस मार्गावरील जलवाहिन्यांद्वारे वाहत जाऊन मिठी नदीला जोडलेल्या अशोक लेलँड आउटफॉलपर्यंत पोहोचते. जलवाहिन्यांचे रुंदीकरण, पुनर्रचना आणि सुधारणा झाल्यास पावसाच्या पाण्याचा निचरा अधिक वेगाने होईल. मुसळधार पाऊस झाल्यास किंवा मिठी नदीने इशारा पातळी ओलांडली तरी या परिसरात पाणी तुंबण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे.
ग्रॅण्ट रोड येथील नाना चौक स्कायवॉकवर लवकरच नवे सरकते जिने बसवण्यात येणार आहेत. या स्कायवॉकवरील सध्याचे दोन सरकते जिने अनेक वर्षांपासून बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. सरकत्या जिन्यांसह स्कायवॉकवर संरक्षक बंदिस्त छतही उभारण्यात येणार आहे. या कामासाठी मुंबई महापालिका ४ कोटी १६ लाख रुपये खर्च करणार असून, यासंदर्भातील प्रस्ताव गुरुवारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी मांडला जाणार आहे. नाना चौक येथील सध्याचे दोन्ही सरकते जिने ग्रॅण्ट रोड पश्चिम रेल्वे स्थानकाशी जोडलेल्या स्कायवॉकचा भाग आहेत. मात्र हे सरकते जिने दीर्घकाळापासून बंद आहेत. महापालिकेच्या पाहणीत ते दुरुस्तीच्या पलीकडे गेल्याचे स्पष्ट झाले. तसेच, बंदिस्त छत, रेलिंग आणि इतर भागही जीर्ण झाले आहेत.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा