Navi Mumbai Metro Expansion: नवी मुंबई शहरात गेल्या अनेक वर्षांपासून एक मार्गिका धावत होती. आता या पहिल्या मार्गिकेचा विस्तार होणार असून त्यासह दुसऱ्या मार्गिकेलाही मंजुरी मिळाली आहे. नवी मुंबईसह संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म.टा. वृत्तसेवा, नवी मुंबई: नवी मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. नवी मुंबई मेट्रो मार्गिका-१अ (बेलापूर ते सागर संगम) आणि मार्गिका-२ (पेंधर ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ट-४) या एकूण पाच हजार ५७५ कोटी रुपये खर्चाच्या मेट्रो प्रकल्प अहवालास राज्य सरकारने सोमवारी अंतिम मंजुरी दिली. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडमार्फत या प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाणार आहे.
संपूर्ण ‘एमएमआर’ला जोडणारा प्रकल्प
नवी मुंबई आणि आसपासच्या परिसराची लोकसंख्या सन २०२४मध्ये सुमारे १९.३० लाख इतकी होती. सन २०६१पर्यंत ती तब्बल ५२.१० लाखांवर पोहोचण्याचा अंदाज आहे. या वाढत्या लोकसंख्येची भविष्यातील गरज लक्षात घेऊन सर्वसमावेशक वाहतूक अभ्यासानुसार (सीटीएस) या नवीन मेट्रो मार्गिकांचे नियोजन करण्यात आले आहे. हा प्रकल्प केवळ अंतर्गत प्रवासासाठी नसून, संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्राला जोडणारा मुख्य दुवा ठरणार आहे.
राज्यातील सर्व मेट्रो प्रकल्पांमधील प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी आणि अंमलबजावणीला गती देण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या उच्चाधिकार समितीच्या कार्यकक्षेत हा प्रकल्प आणण्यात आला आहे. तसेच, याचा कालबद्ध कार्यक्रम पुढील १५ दिवसांत शासनाला सादर करण्याचे निर्देश ‘एमएमआरसीएल’ व सिडकोला देण्यात आले आहेत.
तिकीट दराचे अधिकार ‘एमएमआरसीएल’ला
नवी मुंबई मेट्रो मार्गिका-१च्या विद्यमान तिकीट दरांच्या आधारे, पुढील मार्गिकांसाठी नवीन भाडेसंरचना निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये दरवर्षी पाच टक्के वाढीचा प्रस्ताव आहे. सध्याच्या रचनेनुसार ० ते २ किमीसाठी १०, तर १० किमीपेक्षा जास्त प्रवासासाठी कमाल ४० रुपये तिकीट दर आकारला जातो. मेट्रो रेल्वे प्रत्यक्ष सुरू होण्यापूर्वी आर्थिक व्यवहार्यता तपासून यात आवश्यकतेनुसार बदल करण्याचे अधिकार शासनाच्या पूर्व मान्यतेने ‘एमएमआरसीएल’ला देण्यात आले आहेत.
प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये
एकूण लांबी : १७.९ किलोमीटर मार्गिका-१ अः ३.०२ किमी (बेलापूर ते सागर संगम) मार्गिका-२ : १४.७ किमी (पेंधर ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ट-४) एकूण स्थानके: १२ (सर्व उन्नत) प्रकल्प कालावधी : चार वर्षे
मेट्रो मार्गिका-१ वर सध्या बेलापूर टर्मिनल, सेक्टर ७, सिडको सायन्स पार्क, खारघर उतस्व चौक, सेक्टर ११, सेक्टर १४, सेंट्रल पार्क, पेठपाडा, सेक्टर ३४, पांचनंद, पेंधर अशी स्थानकं आहेत. त्यामुळे १- अ वर विस्तार झाल्यानंतर सागर संगम, सिडको एक्झिबिशन (सेक्टर ११) आणि सिबिडी बेलापूर येथे मार्गिका १सोबत इंटरचेंज असेल. दरम्यान मेट्रो मार्गिका २ वर तळोजा एमआयडीसी १, तळोजा एमआयडीसी २, कसाडी, कळंबोलीमध्ये सेक्टर ७ई, सेक्टर १३, सेक्टर २ ई, कामोठे येथे सेक्टर १०, खांदेश्वर अशी स्थानकं असतील. खांदेश्वर स्थानकावर रेल्वे आणि विमानतळासाठी कनेक्टिव्हिटी निर्माण होईल.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा