अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची मुंबईत जेव्हा प्रचंड दहशत होती त्या काळात एक लेडी डॉन त्याला मुंबईत आव्हान द्यायची. या लेडी डॉनने अनेकदा दाऊदच्या तस्करीचा माल पोलिसांना पकडून देण्यात मदत केली होती. तिने अनेकदा दाऊदच्या आर्थिक नांग्या ठेचल्या. तसेच दाऊदला मारण्याचादेखील कट आखला. पण तिचाच भयानक शेवट झाला. या निडर लेडी डॉनची अंगावर काटा आणणारी स्टोरी आहे.

ज्येष्ठ पत्रकार एस. हुसेन झैदी यांच्या ‘माफीया क्वीन्स ऑफ मुंबई’ या पुस्तकात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याला मारण्याचा कट आखणाऱ्या लेडी डॉन सपना दिदीची सविस्तर माहिती सांगितली आहे. खरंतर सपना दिदी हिचं खरं नाव अशरफ खान असं होतं. अशरफ हिचं महमूद कालिया याच्यासोबत लव्ह मॅरेज झालं होतं. महमूद कालिया आणि अशरफ यांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. अशरफ महमूद सोबत खूप खूश असायची. महमूद तिची खूप काळजी घ्यायचा. दोघे एकत्र खूप फिरले देखील होते.
महमूद कालिया हा नेमकं काय काम करतो? याची अशरफला कल्पना नव्हती. पण महमूद कालिया याचा बॉस दुबईला असल्याची माहिती तिला त्याच्या बोलण्यातून जाणवली होती. महमूद कालियाचं खरं नाव महमूद खान असं होतं. पण त्याच्यासोबत काम करणारे मित्र त्याला कालिया म्हणायचे. त्यातून त्याचं नाव मेहमूद कालिया पडलं होतं. पण ते अशरफला आवडायचं नाही. अशरफला महमूद सोबतचे त्याचे जोडीदार देखील आवडायचे नाहीत.
दाऊद इब्राहिमचा खास होता महमूद कालिया
महमूद कालिया हा दाऊद इब्राहिमच्या खास लोकांपैकी एक होता. त्याला दाऊदने एक काम सांगितलं होतं. पण ते काम करण्यास त्याने नकार दिला होता. मेहमूदने आपल्या पत्नीला दुबईला जाण्याआधी एका गोष्टीची कल्पना दिली होती. आपण आता दुबईला पुन्हा जाणार नाही आणि करत असलेले कामही करणार नाही. सर्वसामान्यांपणे पत्नीसोबत आयुष्य घालणार असं ठरवल्याचे महमूदने सांगितलं. याच विषयी आपण दुबईला जावून आपल्या बॉसला सांगणार असल्याचं त्याने अशरफला सांगितलं होतं.
दाऊदने कालियाचा एन्काउंटर घडवून आणला
महमूद कालिया हा दुबईला दाऊदच्या भेटीसाठी गेला. त्याने दाऊदला काम करण्यास असमर्थता दर्शवली. त्यानंतर तो मुंबईच्या दिशेला परतला. महमूद कालियाने कामाला नकार दिल्याने दाऊदचा स्वाभिमान दुखावला गेला. त्यामुळे त्याने कालियाचा काटा काढवण्याचं ठरवलं. त्याच्या माणसांनी मुंबई पोलिसांना विमानतळावर महमूद कालिया येणार असल्याचं सांगत त्याचा एन्काउंटर घडवून आणला. महमूदला अशाप्रकारे संपवून दाऊदने आपल्या कामाला नकार दिल्याने काय परिणाम भोगायला मिळू शकतात, असा मेसेज त्याच्या हस्तकांना दिला.
अशरफवर दु:खाचा डोंगर कोसळला
दुसरीकडे मेहमूद कालियाला विमानतळावर घेण्यासाठी आलेली त्याची पत्नी अशरफ हिने डोळ्यांदेखत आपल्या पतीची हत्या होताना पाहिली. मुंबई विमानतळावरच्या एन्काउंटरनंतर महमूदचा मृतदेह तातडीने तिथून घेऊन जाण्यात आला होता. तिने महमूदचा खूप शोध घेतला. शेवटी तिला कुणीतरी माहिती दिली की, जे जे हॉस्पिटलच्या शवागृहात तिच्या पतीचा मृतदेह आहे. त्यानुसार ती तिथे गेली. पतीचा मृतदेह पाहून तिने हंबरडा फोडला. मृत पतीचा हात हातात घेऊन ती ढसाढसा रडू लागली.
अशरफला पतीच्या हत्येचं गूढ समजलं
महमूदला कब्रस्तानात अलविदा करुन अशरफ नातेवाईकांसोबत घरी परतत असताना तिला एक वृद्ध भेटला. त्याने आपलं स्वत:चे नाव उस्मान असं सांगितलं. त्याने महमूद कालिया काय काम करायचा? ते सांगितलं. तसेच त्याची हत्या कुण्याच्या इशाऱ्याने झाली याची कल्पना अशरफला दिली. दाऊदच्या सांगण्यावरुन त्याचा एन्काउंटर घडवण्यात आल्याचा दावा त्याने केला. हे ऐकून अशरफ प्रचंड संतापली. दाऊदचा सूड घेण्याची भावना तिच्या मनात आली.
उस्मानने अशरफला हुसेन उस्तराची दिली माहिती
उस्मानने यावेळी अशरफला या कामासाठी हुसेन उस्तरा मदत करु शकेल, अशी कल्पना दिली. त्यानुसार अशरफ हुसेन उस्तराच्या भेटीला गेली. तिने आपल्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती हुसेन उत्सराला दिली. तसेच आपल्याला दाऊदचा बदला घ्यायचा आहे, असं तिने सांगितलं. सुरुवातीला हुसेनला अशरफच्या बोलण्यावर हसू आलं. पण अशरफ भावनिक होऊन बोलत असल्याने मदतीचं आश्वासन दिलं.
हुसेन उस्तरा कोण होता?
हुसेन उत्सरा हा दाऊद इब्राहिमचा शत्रूच होता. त्याची टोळी डी-कंपनीच्या विरोधात काम करायची. तसेच तो पोलिसांचा खबऱ्या म्हणूनही काम करायचा. दाऊदचे जुगारी अड्डे, खंडणी उकळणे, डान्सबार, नाइट क्लब यांच्या विरोधात अचूक माहिती हुसेन उस्तरा पोलिसांना द्यायचा. त्यातून त्याला इनाम म्हणून काही रक्कम देखील मिळायची. तसेच त्याची स्वत:ची एक टोळी होती. ही टोळी दाऊदच्या विरोधात काम करायची.
उस्तरा नाव कसं पडलं?
हुसेन उस्तरा हा सुरुवातीला पाकिटमार होता. त्याने तरुणपणात पाकिट मारल्यानंतर त्याला भरपूर पैसे मिळाले होते. पण त्यांच्या पाकिटमार टोळीचा जो दादा होता त्याला त्याने अपुरे पैसे दिले होते. याची खबर त्यांच्या टोळीच्या दादाला कुणीतरी दिली. त्यावरुन त्या दादाने हुसेनला मारहाण केली. यावेळी हुसेनने त्याला खिशातला वस्तरा काढला आणि त्याच्यावर हल्ला केला. त्याने वस्तराने केलेल्या अचूक माऱ्यावरुन त्याचे नाव गुन्हेगारी विश्वात उस्तरा असं पडलं.
हुसेन उस्तराने दिलं अशरफला प्रशिक्षण
हुसेनने अशरफला त्याच्या इमारतीच्या बेसमेटमध्ये गन कशी चालवायची? याचं प्रशिक्षण दिलं. तसेच मार्शल आर्टचं देखील प्रशिक्षण दिलं. त्याच्या तालमीत अशरफ ही बेधडक बनली. तिने स्वसंरक्षणासाठी काय-काय करायला हवं ते सर्व शिकून घेतलं. अनेक आठवडे तिने उस्तराकडून प्रशिक्षण घेतलं.
अशरफ डॉन अरुण गवळीला भेटली
दरम्यान, हुसेनने अशरफला डॉन अरुण गवळी याच्याकडे पाठवलं होतं. त्या काळात अरुण गवळी हा दाऊद इब्राहिमचा विरोधातला मोठा आणि ताकदवान डॉन होता. अशरफने अरुण गवळीची भेट घेतली. तिने आपली व्यथा अरुण गवळीला सांगितली आणि मदतीची याचना केली. अरुण गवळीने तिच्या पतीच्या मृत्यूवर सहानुभूती व्यक्त केली. पण तिला मदत करण्यास अरुण गवळीने साफ नकार दिला. यामुळे अशरफ नाराज झाली.
अशरफने नाव बदललं, सपना ठेवलं
अरुण गवळीच्या भेटीनंतर अशरफने आपले नाव बदलून घेतले. सपना हे नाव हिंदू आणि मुस्लीम दोन्ही समाजात असतं. त्यामुळे आपलं नाव ऐकून आपल्याला कुणी मदत करणार नाही, असं होणार नाही, अशी समजूत तिने स्वत:च्या मनाला घातली. अशरफने स्वत:चं नाव सपना केल्यानंतर तिच्यामध्ये कमालीचा बदल झाला. बुरखा आणि सलवार कमीजमध्ये राहणारी अशरफ नंतर जिन्स पॅन्ट आणि शर्टवर राहू लागली. बाईकवर मुंबईत फिरायला लागली. ती हळूहळू गुन्हेगारी जगतात लेडी डॉन सपना दिदी म्हणून प्रसिद्ध झाली.
सपनाने दाऊदचा माल अनेकदा पकडवून दिला
हुसेन उस्तराने अशरफ उर्फ सपनाला आपल्या खबऱ्यांसोबत ओळख करुन दिली होती. त्या माध्यमातून तिने आपलं जाळं उभारत आपली टोळी उभी करण्यास सुरुवात केली. ती दाऊदच्या दोन नंबरच्या मालाची माहिती पोलिसांना द्यायची आणि माल पकडून देण्यात पोलिसांना मदत करायची. विशेष म्हणजे ती अज्ञात स्थळावरुन फोन करुन पोलिसांना खबर द्यायची. त्यामुळे तिचं नाव यामध्ये यायचं नाही.
दाऊदचे शस्त्रास्त्रे लुटले
पुढे उस्तरा आणि सपना हे नेपाळमध्ये गेले होते. तिथे देखील दाऊद इब्राहिमचे शस्त्र आणि इतर तस्करीचा सामाना लुटत त्यांनी दाऊदला धक्का दिला होता. तिथे काही जीवघेणे प्रसंग घडले आणि त्यातून दाऊदला जास्त तोटा देता येत नसल्याचं लक्षात आल्यानंतर दोघांनी मुंबईतच दाऊदच्या विरोधात काम करायचं ठरवलं.
उस्तरा आणि सपना यांच्यात ताटातूट
हुसेन उस्तरा आणि सपना मिळून आपल्याविरोधात काम करत असल्याची खबर दाऊदला लागली होती. त्यामुळे एकदा दाऊदची माणसं हे सपनाच्या मागे लागली. यावेळी सपना मदतीसाठी उस्तराकडे गेली. यावेळी उस्तराने सपनासोबत गैरवर्तन केलं. यामुळे दोघांमध्ये वाद झाला. यानंतर सपना कधीच उस्तराला भेटली नाही.
सपनाने स्वत:ची गँग बनवली, दाऊदला मारण्याचा कट
सपना दिदीने मग स्वत:ची टोळी मोठी केली. तिने दाऊद इब्राहिमला मारण्याचा कट आखला. त्यावेळी भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना पाहण्यासाठी दाऊदची हजेरी असायची अशी माहिती सपनाला मिळाली होती. त्यामुळे शारजाह क्रिकेट स्टेडियममध्ये तिच्या माणसांनी रेकी केली होती.
दाऊद नेमका कुठे बसतो, कुठून कसा चालत जातो, याची सर्व माहिती मिळवली होती. त्या अनुषंगाने सपनाने पूर्ण स्टेडियमचा आराखडा तयार केला होता. सपना ही देखील तिथे जाणार होती. पण त्याआधीच तिच्या टोळीतला एक जण फुटला. त्याने दाऊदच्या माणसांना माहिती दिली. यामुळे संतापलेल्या छोटा शकीलने तिला संपवण्याचा विडा उचलला.
छोटा शकीलच्या माणसांनी सपनाला निर्घृणपणे संपवलं
सपना 1994 मध्ये डोंगरीतल्या हुजरा मोहोल्यामध्ये राहायला गेली होती. त्यादिवशी ती आजारी होती. तिला ताप आल्याने रात्री दहाच्या सुमारास ती आपल्या घरात झोपली होती. सपना एकटी घरात झोपल्याची माहिती छोटा शकीलपर्यंत पोहोचली. अचानक हुजरा मोहल्लामध्ये एक व्हॅन आली. व्हॅनमधून गन आणि चाकूधारी काही माणसं उतरली. त्यांनी सपनाच्या घराचा दरवाजा तोडला आणि तिच्यावर अमानुष हल्ला केला. या हल्ल्यात ती मरण पावली.
पतीचा हत्येचा बदला घेण्यासाठी अशरफ सपना झाली होती. या दरम्यान हुसेन उस्तरासोबत वाद झाल्यानंतर तिने वेगळी टोळी तयार केली होती. याच काळात तिने एका पोलीस अधिकाऱ्यासोबत दुसरं लग्न केलं होतं. पण ते फार काळ टिकलं नव्हतं. तिने दाऊद इब्राहिमला अनेकदा मोठमोठे धक्के दिले होते. दाऊदचा बदला घेण्यासाठी तिने अतोनात प्रयत्न केले. पण अखेर 1994 मध्ये दाऊदच्या माणसांनी तिला निर्घृणपणे संपवलं.

