Bhuleshwar Cha Raja Ganesh Idol Accident : संकेतने अखेरच्या क्षणीही गणपती बाप्पाची मूर्ती वाचवण्याचा प्रयत्न केला होता. त्याने त्या भव्य मूर्तीला दोन्ही हातांनी सावरण्याचा प्रयत्न केल्याचा व्हिडिओ पाहून नेवशे कुटुंबीयही भावूक झालं.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : ‘भुलेश्वरचा राजा’ ही मुंबईतील २२ फूट उंच गणेश मूर्ती आगमन मिरवणूक सुरु असताना कोसळून झालेल्या अपघातात दोघा जणांना प्राण गमवावे लागले. या अपघातात मृत्युमुखी पडलेला ३३ वर्षीय संकेत नेवशे हा मंडळाचा मुख्य आधारस्तंभ आणि व्यवस्थापक होता. संकेतचा भाऊ सिद्धेश नेवशे याच्या मनात कोणाविषयी राग नाही, त्याला कोणालाही जबाबदार ठरवायचं नाही, उलट शेवटच्या क्षणीही बाप्पाला सावरण्यासाठी सहज पुढे सरसावलेल्या आपल्या भावाची दृश्यं त्याच्या डोळ्यासमोरुन हटत नाहीयेत.
शेवटचा व्हिडिओ समोर
शनिवारी रात्री ‘भुलेश्वरचा राजा’ गणेश मूर्ती कोसळली तेव्हा संकेत तिच्या खाली दबला गेला. घटनास्थळावरील व्हिडिओ नंतर पाहिल्यावर त्याच्या कुटुंबीयांना समजलं की, शेवटच्या क्षणी संकेतने नेमके काय केले होते. त्याने त्या भव्य मूर्तीला दोन्ही हातांनी सावरण्याचा प्रयत्न केला होता. हा व्हिडिओ पाहून नेवशे कुटुंबीयही भावूक झालं.
“ती गोष्ट समजल्यावर मला आश्चर्य वाटले. ती मूर्ती इतकी सुंदर, अन् भव्य होती की आपण तिला एक इंचही हलवू शकत नाही, हे ध्यानात येतं. संकेतने मात्र पुढे जाऊन ती दोन्ही हातांनी धरण्याचा प्रयत्न केला. आमचा संकेत असाच होता. ऊर्जेने भरलेला आणि कोणालाही आधार द्यायला पुढे सरसावणारा” असे संकेतचा भाऊ सिद्धेश नेवशे याने ‘मुंबई मिरर’ला सांगितले.
संकेतसाठी या वर्षीची मूर्ती विशेष जिव्हाळ्याची होती. मंडळातर्फे परंपरेने साधारण १६ फूट उंचीच्या मूर्ती आणल्या जात असत. शिल्पकार अनिकेत देसाई यांच्याशी सुरुवातीला १८ फूट उंचीच्या मूर्तीबाबत चर्चा झाली होती, परंतु संकेतने त्यापेक्षा मोठी मूर्ती असावी असा आग्रह धरला. अखेरीस ती मूर्ती साधारण २२-२३ फूट उंचीची बनली.
सिद्धेशने आठवण सांगितली की, मूर्ती मोठी करण्याचा निर्णय घेताना काहीशी साशंकता होती. त्यांनी संकेतला सांगितले होते की, आपण जे करत आहोत, त्याची कदाचित पुनरावृत्ती कधीच होणार नाही. तरीही ती भव्य मूर्ती मंडळात आणण्याच्या प्रक्रियेत संकेतचा सक्रिय सहभाग राहिला.
शिल्पकाराचा कुठलाही दोष नाही
ज्या कलाकाराने ती मूर्ती घडवली, त्याला या दुर्दैवी घटनेसाठी दोष द्यावा, असे सिद्धेशला वाटत नाही. वाहतुकीसाठी आवश्यक ती खबरदारी घेतल्यानंतर, शिल्पकार अनिकेत देसाई आणि त्यांच्या टीमचे सदस्य मूर्तीसोबतच्या प्रवासात सहभागी झाले होते. सिद्धेशने सांगितले की, आधार देणारे खांब आणि रॉड्स कुठे लावले आहेत, याची माहिती त्यांनी दिली होती आणि प्रवासाचा बराचसा टप्पा पूर्ण होईपर्यंत ते स्वतः तिथे उपस्थित होते.
“या घटनेसाठी मला कोणालाही दोष द्यायचा नाही. याचा शिल्पकार किंवा इतर कोणत्याही व्यक्तीशी काहीही संबंध नाही” असे सिद्धेश म्हणाला. “कोणी आणि का त्यांचे नाव घेऊन त्यांना दोष द्यायला सुरुवात केली, हे मला समजत नाही. उलट त्यांनी मदतच केली होती. यात त्यांची काहीही चूक नाही.” ही दुर्घटना नेमकी कशामुळे घडली, याचा पोलीस तपास करत आहेत.
पोलीस तपास सुरु
प्राथमिक निरीक्षणांनुसार, मूर्तीला आधार देणाऱ्या एका रॉडचे वेल्डिंग तुटलेले आढळले आहे आणि रचनेच्या आत ओलावाही दिसून आला आहे; तरीही, तपास अद्याप सुरु असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
“संकेतच सर्व काही पाहत होता—देखभाल आणि आर्थिक व्यवस्था अशा दोन्ही आघाड्यांवर त्याने मोलाचा आधार दिला होता,” असे सिद्धेश म्हणाला. “आणि कदाचित, मूर्ती कोसळताना निर्माण झालेल्या त्या गोंधळाच्या परिस्थितीतही संकेत तसाच राहिला. त्याने काहीतरी अयोग्य घडताना पाहिले आणि बाप्पाची मूर्ती पेलण्यापलिकडे प्रचंड मोठी असूनही, केवळ सहजस्फूर्तीने त्याने मदतीचा प्रयत्न केला.” असे सिद्धेश म्हणाला.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा