Headlines

दोन वेळचा वर्ल्ड चॅम्पियन वेस्ट इंडिज अडचणीत, 2027 वनडे वर्ल्डकपमधील पात्रतेचा मार्ग कठीण! कारण काय?


West Indies 2027 World Cup Qualification : वेस्ट इंडिज पुन्हा वनडे वर्ल्डकपमधून बाहेर पडणार का? अफगाणिस्तानच्या विजयामुळे दोन वेळच्या विश्वविजेत्याची थेट पात्रता जवळपास संपुष्टात आली असून आता पुढचा मार्ग कठीण झाला आहे.

West Indies 2027 World Cup
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : एकेकाळी वनडे क्रिकेटवर राज्य करणारा वेस्ट इंडिज संघ सध्या मोठ्या संकटात सापडला आहे. १९७५ आणि १९७९ असे सलग दोन वर्ल्डकप जिंकणाऱ्या या संघाला आता २०२७च्या वनडे वर्ल्डकपसाठी थेट पात्रताही मिळवता येत नाहीये. अफगाणिस्तानने आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत मिळवलेल्या विजयामुळे वेस्ट इंडिजच्या थेट पात्रतेच्या आशांना आणखी मोठा धक्का बसला आहे.

अफगाणिस्तानच्या एका विजयाने इंडिजला धक्का

२०२७चा वनडे वर्ल्डकप दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे होणार आहे. यजमान दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे यांना थेट स्थान मिळाले आहे. उर्वरित आठ जागा आयसीसी वनडे रँकिंगच्या आधारे निश्चित होणार आहेत.

यासाठी ३० सप्टेंबर २०२६ ही कट ऑफ तारीख आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेनंतर वेस्ट इंडिज ७३ गुणांसह दहाव्या स्थानावर आहे. दुसरीकडे अफगाणिस्तान ९० गुणांसह सातव्या क्रमांकावर आहे.

Maharashtra TimesMumbai T20 League : आता मुंबई टी-२० लीगमध्ये ९ संघ! MCAनं नव्या टीमसाठी निविदा मागवल्या, कोणत्या खेळाडूंना मिळणार संधी?
अफगाणिस्तानने आयर्लंडला दुसऱ्या वनडेत ९२ धावांनी पराभूत केले. राशिद खानने या सामन्यात ३६ धावा देत सहा विकेट्स घेतल्या. या निकालामुळे वेस्ट इंडिजसाठी थेट पात्रतेचा मार्ग आणखी कठीण झाला आहे.

२०२३मध्येही वर्ल्डकपला मुकले होते

वेस्ट इंडिजची ही परिस्थिती पहिल्यांदाच निर्माण झालेली नाही. २०१९च्या वर्ल्डकपसाठीही त्यांना थेट पात्र होता आले नव्हते. त्यानंतर २०२३मध्ये तर त्यांना वर्ल्डकपमध्ये प्रवेशच मिळवता आला नाही.

झिम्बाब्वेमध्ये झालेल्या क्वालिफायरमध्ये सुपर सिक्स टप्प्यात वेस्ट इंडिजला झिम्बाब्वेकडून पराभव पत्करावा लागला. त्यानंतर स्कॉटलंडविरुद्ध विजय मिळूनही त्यांचे वर्ल्डकपचे स्वप्न पूर्ण झाले नाही.

Maharashtra TimesTeam India : जय शहा यांचं ठरलं होतं की द्रविडनंतर लक्ष्मण कोच, मग गंभीरची निवड कशी झाली? VVS लक्ष्मणकडून खुलासा

भारताविरुद्धची मालिका निर्णायक ठरणार?

वेस्ट इंडिजला आता भारताविरुद्ध तीन वनडे सामने खेळायचे आहेत. या मालिकेला २७ सप्टेंबरपासून सुरुवात होईल. दुसरा सामना ३० सप्टेंबर, तर तिसरा सामना ३ ऑक्टोबरला होणार आहे.

मात्र, भारताविरुद्ध ३-० असा विजय मिळवला तरी वेस्ट इंडिजची थेट पात्रता निश्चित होईलच असे नाही. कट ऑफपर्यंतची रँकिंग आणि इतर संघांचे निकालही महत्त्वाचे ठरणार आहेत.

दोन वेळचा चॅम्पियन पुन्हा क्वालिफायर खेळणार?

वेस्ट इंडिजने वनडे वर्ल्डकपच्या सुरुवातीच्या काळात आपला दबदबा निर्माण केला होता. १९७५ आणि १९७९मध्ये त्यांनी सलग दोन विजेतेपदं मिळवली. मात्र, १९८३मध्ये भारताने त्यांचा पराभव केल्यानंतर त्यांना पुन्हा वनडे वर्ल्डकप जिंकता आलेला नाही.

आता परिस्थिती इतकी बदलली आहे की दोन वेळचा विश्वविजेता थेट वर्ल्डकपसाठी पात्र होण्यासाठीही संघर्ष करत आहे. त्यामुळे २०२७मध्ये वेस्ट इंडिज थेट खेळणार की पुन्हा एकदा क्वालिफायरच्या मार्गाने जावे लागणार, याकडे क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा