Headlines

चन्नम्मानगर येथे विद्युत खांब कोसळला


त. भा. प्रतिनिधी

बेळगाव

मागील दोन दिवसांत बेळगाव शहरात सुरू असलेल्या वारा पावसामुळे विजेचे खांब कोसळत आहेत. बुधवारी राणी चन्नम्मानगर मेन रोड येथे विजेचा खांब कोसळल्याने नुकसान झाले. वीज वाहिन्यांसह आजुबाजूच्या विद्युत खांबांचेही नुकसान झाले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर मागील दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली. बुधवारी दुपारनंतर शहराच्या काही परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह धुवांधार पाऊस झाला. यामुळे झाडांच्या फांद्या कोसळून विद्युत वाहिन्यांचे नुकसान झाले. सायंकाळपर्यंत दुरुस्तीचे काम हेस्कॉमकडून सुरू होते.

राणी चन्नम्मानगर येथील हिंदुस्थान पेट्रोलियम कार्यालयाच्या परिसरातील रस्त्यावर वीज खांब कोसळला. यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. तात्काळ वीजपुरवठा बंद करून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. विद्युत वाहिन्यांसोबत इंटरनेट केबलचेही नुकसान झाले. त्यामुळे परिसरातील वीजपुरवठा पर्यायी मार्गाने सुरू करण्यात आला.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत