सावंतवाडी/ वार्ताहर : माजगाव उद्यमनगर येथील ओमकार फूड्स प्रोसेसिंग युनिटच्या इमारतीच्या छतावर सुकत घातलेले सुमारे ५० किलो कोकम चोरीस गेल्याची तक्रार युनिटचे मालक प्रदीप शेवडे यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिली आहे. या चोरीत अंदाजे ३० हजार रुपयांचे नुकसान झाले असून, हा प्रकार १५ जुलैच्या रात्री घडल्याचे उघडकीस आले आहे.
श्री. शेवडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षद हिंगे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोज राऊत आणि हवालदार अनिल धुरी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
फॅक्टरीच्या आवारात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये संशयित चोरट्यांचे फोटो कैद झाले आहेत. ही चोरी स्थानिक भागातीलच कोणीतरी केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, त्या अनुषंगाने पोलिसांकडून संबंधित संशयितांचा शोध सुरू आहे.
