Headlines

सगुण-निर्गुण: ध्येयनिष्ठा – gajanan natekar sagun nirgun article on dedication to goal


सभ्यतेची आणि लोकलज्जेची चौकट सांभाळतच उदात्ततेच्या आणि समर्पणाच्या चर्चा सामान्यतः लोक करत असतात.

sagun nirgun
सगुण निर्गुण(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
-डॉ. गजानन नाटेकर

शहराच्या गजबजलेल्या चौकामध्ये, सिग्नलच्या बाजूला तो तरुण उभा होता. त्याची सडपातळ शरीरयष्टी, विशिष्ट पेहराव, हातातील पुस्तके यांमुळे जाणाऱ्या-येणाऱ्यांची नजर सहजच त्याच्याकडे जात होती. त्याला पटलेल्या धर्ममताचा तो अनुयायी होता, हे सहजच कोणाच्याही ध्यानात यावे.

त्या धर्माच्या उदात्त विचारसरणीचा प्रसार करण्याचे ध्येय त्याने बाळगले होते. त्यानुसार तो तेथे निःसंकोचपणे उभा होता. मुद्दाम येणाऱ्या-जाणाऱ्यांच्या मागेही तो जात नव्हता. त्याच्या वयाची तरुण मुले आपले व्यावहारिक बस्तान बसवण्याच्या तयारीत गढून गेलेली असताना, त्याचे असे ध्येयासाठी निरपेक्षपणे झोकून देणे माझ्यासाठी खूपच नवलाचे होते. त्याच्या त्यागशील वृत्तीला आणि धैर्याला मनोमन नमस्कार केला. अशा रीतीने, लोकरीतीचा अनुनय न करता, लोकापवादाला न जुमानता, ध्येयनिष्ठ होण्यामागची ऊर्मी काय बरे असावी? यामागे कदाचित पुण्यसंचय, ईश्वरी कृपेला पात्र होण्याची इच्छा ही कारणेही असू शकतील. अशा व्यक्तीला पाहून नाक मुरडणाऱ्यांचीही समाजात काही कमी नाही. ‘लोक काय म्हणतील?’ ही भीती ओलांडून पटलेले उघड कृतीत आणणे ही काही तितकी सोपी गोष्ट नाही.

पण, खरा प्रश्न वेगळाच आहे. उदात्त ध्येय आणि महान विचारसरणीचा प्रसार खरोखरच असा ठरवून होत असतो का? ते विचार स्वतःमध्ये पूर्णपणे उतरवून तसे प्रगत जीवन जगणारी व्यक्ती, तिने मुद्दाम त्या विचारांचा प्रसार नाही केला, तरी आपोआपच त्या ध्येयप्रसाराचे माध्यम बनत असते. जसे, अतिशय सुदृढ आणि कमावलेले शरीर असणारा माणूस पाहूनच इतरांच्या मनात व्यायामाची प्रेरणा निर्माण होते.

आपल्या व्यक्तिमत्त्वातले हीन काढून टाकून प्रगत होण्याची ऊर्मी फुलवणे, हेच सर्व सद्ग्रंथांचे प्रयोजन आहे; पण नुसते ग्रंथातील शब्द प्रेरणा देत नाहीत. त्यासाठी मूर्तिमंत गुणसंपन्न व्यक्तीच लागत असते. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटल्याप्रमाणे, कळी पूर्णपणे विकसित होऊन उमलल्यानंतर भ्रमरांना आमंत्रण द्यावे लागत नाही. ते सुगंधाचा माग काढत येतात. आपण स्वतःच्या ठिकाणी ज्ञान आणि सद्गुणांनी पूर्ण उमलून जाणे हीच डोळस ध्येयनिष्ठा नाही का?

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा