![]()
अमरावती जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने स्वीकारलेल्या निविदा तीन महिने उलटूनही न उघडल्याने सुशिक्षित बेरोजगारांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. याप्रकरणी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) विनय ठमके यांच्याकडे तक्रार नोंदवली आहे. युवक काँग्रेसचे माजी प्रदेश सचिव समीर जवंजाळ आणि अमरावती विधानसभा अध्यक्ष वैभव देशमुख यांनी सुशिक्षित बेरोजगार कंत्राटदारांच्या वतीने ही तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या मते, या दिरंगाईमुळे जिल्हा परिषदेतील निविदा प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात अडकली असून, प्रलंबित निविदा तात्काळ उघडण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनानुसार, जिल्हा परिषदेने काही कामांसाठी १८ एप्रिल २०२६ रोजी निविदा प्रसिद्ध केली होती. विहित मुदतीत अनेक सुशिक्षित बेरोजगार कंत्राटदारांनी निविदा प्रक्रिया पूर्ण केली, परंतु त्या अद्याप उघडण्यात आलेल्या नाहीत. निविदा भरणाऱ्यांनी वारंवार विचारणा करूनही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. विशिष्ट कंत्राटदारांनाच काम मिळावे यासाठी हे जाणूनबुजून केले जात असल्याचा आरोप संबंधितांनी केला आहे. निविदा उघडण्यास होत असलेल्या विलंबामुळे जिल्हा परिषदेअंतर्गतचे रस्ते, इमारती, पाणीपुरवठा आणि इतर विकासकामे रखडली आहेत. याचा थेट फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. शासन निधी उपलब्ध असतानाही केवळ प्रशासकीय दिरंगाईमुळे विकासकामे थांबणे ही गंभीर बाब आहे. काही मोजक्या ठेकेदारांना लाभ मिळावा यासाठी निविदा प्रक्रिया जाणीवपूर्वक रखडवली जात असल्याची चर्चा जिल्हा परिषदेत सुरू आहे. यामुळे संपूर्ण निविदा प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासनावर बाह्य राजकीय हस्तक्षेपाचा संशय व्यक्त केला जात आहे. जर असे नसेल, तर प्रशासनाने तात्काळ निविदा उघडून सर्व शंका दूर कराव्यात, असेही ठमके यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान सांगण्यात आले. दरम्यान, निविदा प्रक्रिया अधिक काळ रखडवून विकासकामांना अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्यास तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा इशारा युवक काँग्रेसने दिला आहे. जनतेच्या विकासाच्या आड येणाऱ्या कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाचा पर्दाफाश करण्यात येईल आणि आवश्यकतेनुसार वरिष्ठ स्तरावर तक्रार करण्यात येईल, असेही त्यांनी म्हटले आहे. अतिरिक्त सीईओ विनय ठमके यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी जवंजाळ आणि देशमुख यांच्यासह जिल्हा कार्याध्यक्ष अनिकेत डेंगळे, बडनेरा विधानसभा अध्यक्ष आशिष यादव, प्रियल मोहोळ, प्रवीण अमृतकर, हर्षल साखरकर, हरीश देशमुख आणि सलमान खान उपस्थित होते.
Source link
अमरावती जिल्हा परिषदेच्या निविदा तीन महिन्यांपासून प्रलंबित:बांधकाम विभागाच्या दिरंगाईमुळे सुशिक्षित बेरोजगार आक्रमक, सीईओकडे तक्रार
