माणिकीच्या डाव्या पुढच्या पायाला अनेक वर्षांपासून दुखापत आहे. त्यामुळे तिला नीट चालता येत नाही. तिच्या शरीरावर अनेक जखमा आहेत आणि त्या जखमांमध्ये संसर्ग झाला आहे. तिच्या शरीरात पाण्याची कमतरता आहे. ती खूप अशक्त झाली आहे. तसेच एका डोळ्याने तिला नीट दिसतही नाही.
माणिकीची प्रकृती दिवसेंदिवस खालावत असल्याचं लक्षात आल्यानंतर तिचे मालक रुची चेतिया यांनी तिला चांगले उपचार मिळावेत यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीकडे मदतीची विनंती केली. त्यांनी माणिकीला जामनगरमधील ‘वंतारा’ येथे हलवण्याची मागणी केली. त्यानंतर आसाम आणि गुजरात सरकार तसेच संबंधित समितीने परवानगी दिली आणि माणिकीला सुरक्षितपणे वंतारामध्ये आणण्यात आलं.
वंतारामध्ये आता तज्ज्ञ डॉक्टर तिच्यावर उपचार करत आहेत. तिच्या पायाचा त्रास कमी करण्यासाठी औषधोपचार, ॲक्युपंक्चर आणि पाण्यातील व्यायाम (हायड्रोथेरपी) केला जाणार आहे. याशिवाय तिला सकस आहार दिला जाईल आणि तिच्या शरीरावरील जखमांवरही विशेष उपचार केले जातील. तिला लवकरात लवकर बरे करून पुन्हा निरोगी आयुष्य मिळावं, यासाठी डॉक्टरांचे प्रयत्न सुरू आहेत.
उपचारांबरोबरच माणिकीच्या आरामाचीही विशेष काळजी घेतली जाणार आहे. वंतारामध्ये तिच्यासाठी मऊ मातीची आणि नैसर्गिक वातावरणाची व्यवस्था करण्यात आली आहे, त्यामुळे तिच्या दुखापत झालेल्या पायावर कमी ताण येईल. तिला पोहण्यासाठी आणि आराम मिळावा यासाठी नैसर्गिक तलावही उपलब्ध आहेत. तसेच तिला आवडणारं नैसर्गिक अन्न मिळेल आणि इतर हत्तींसोबतही राहता येईल. त्यामुळे ती हळूहळू पूर्वीसारखी निरोगी होण्याची आशा आहे.
वंताराच्या प्रवक्त्यांनी आसाम आणि गुजरात सरकार तसेच संबंधित अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत. त्यांनी माणिकीचे मालक रुची चेतिया यांचेही योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्याबद्दल कौतुक केलं. आता माणिकीला लांबचा प्रवास करत वेदना सहन कराव्या लागणार नाहीत. वंतारामध्येच तिची कायमस्वरूपी काळजी घेतली जाईल. तिला रोज योग्य उपचार, सकस आहार आणि सुरक्षित वातावरण मिळणार असल्याने तिचं उर्वरित आयुष्य अधिक सुखकर आणि आनंदी होईल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.
वंतारा ही अनंत अंबानी यांनी सुरू केलेली प्राणी संरक्षण आणि संवर्धनासाठी काम करणारी संस्था आहे. जखमी, आजारी किंवा संकटात सापडलेल्या प्राण्यांना वाचवणे, त्यांच्यावर उपचार करणे, त्यांना पुन्हा निरोगी बनवणे आणि आयुष्यभर त्यांची काळजी घेणे, हे या संस्थेचं मुख्य उद्दिष्ट आहे.
वंतारामध्ये अत्याधुनिक वन्यजीव रुग्णालये आहेत. येथे जगातील सर्वात मोठ्या हत्ती रुग्णालयांपैकी एक रुग्णालयही आहे. प्रत्येक प्राण्याच्या गरजेनुसार त्याच्यावर उपचार केले जातात. तसेच सरकार आणि इतर संस्थांच्या मदतीने जगभरातील वन्यजीवांच्या संरक्षणासाठीही वंतारा काम करत आहे.
