पश्चिम चंपारण (बिहार) : एखाद्या व्यक्तीच्या अंत्ययात्रेत साधारणपणे शोकाकुल वातावरण आणि शांतता पाहायला मिळते. मात्र, बिहारमधील पश्चिम चंपारण जिल्ह्यातील नौतन प्रखंडातील डबरिया मकरीटोला गावात एका वृद्धाची अंत्ययात्रा चक्क ढोल-नगाऱ्यांच्या गजरात आणि ऑर्केस्ट्रा डान्ससह काढण्यात आली. या अनोख्या अंत्ययात्रेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, परिसरात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.
डबरिया मकरीटोला येथील रहिवासी छठू पटेल यांचे निधन झाले. रविवारी त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. मात्र, ही अंत्ययात्रा नेहमीच्या पद्धतीपेक्षा पूर्णपणे वेगळी होती. अंत्ययात्रेच्या पुढे ढोल-नगारे आणि वाद्यवृंदाचा गजर सुरू होता, तर मागे ऑर्केस्ट्रा कलाकार नृत्य सादर करत होते.
अनोखी अंत्ययात्रा पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. अनेकांनी या संपूर्ण प्रकाराचे व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद करून सोशल मीडियावर शेअर केले. त्यानंतर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.
‘वडिलांची शेवटची इच्छा पूर्ण केली’
छठू पटेल यांचा मुलगा मुकेश पटेल यांनी या अनोख्या अंत्ययात्रेमागील कारण सांगितले. त्यांच्या वडिलांनी जिवंत असताना आपल्यानंतर कुटुंबीयांनी रडत-शोक करत बसू नये, तर आनंदाच्या वातावरणात आपली अखेरची विदाई करावी, अशी इच्छा व्यक्त केली होती.
“माझ्या वडिलांची इच्छा होती की, त्यांच्या अंत्ययात्रेच्या वेळी वातावरण दुःखमय नसावे. त्यांच्या इच्छेचा आम्ही आदर केला आणि ढोल-नगारे व ऑर्केस्ट्रासह त्यांना आनंदाने अंतिम निरोप दिला,” असे मुकेश पटेल यांनी सांगितले.
घटनेवर संमिश्र प्रतिक्रिया
दरम्यान, अंत्यसंस्काराच्या वेळी अशा प्रकारे ऑर्केस्ट्रा डान्स आणि जल्लोष केल्याने परिसरात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही नागरिकांनी याला पारंपरिक अंत्यसंस्काराच्या पद्धतीच्या विरोधात असल्याचे सांगत प्रश्न उपस्थित केले आहेत. तर काहींच्या मते, वडिलांची शेवटची इच्छा पूर्ण करून मुलांनी त्यांना अनोख्या पद्धतीने आदरांजली दिली आहे.
या अनोख्या अंत्ययात्रेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
